#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍मराठी साहित्य #👍लाईफ कोट्स वाचाल तर वाचाल
भय इथले..
©️®️ ज्योती रानडे
अरविंदराव लेले किर्ती हॅास्पिटलच्या रूम नंबर १० मधे ॲडमिट झाले होते. त्यांचा मुलगा सागर जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आला तेव्हा फक्त एकच रूम मोकळी होती.
रूम नंबर १०!!
अटेंन्डींग डॅाक्टर राजू कुलकर्णी अरविंदरावांचे जिगरी दोस्त होते. डॅाक्टर कुलकर्णींनी पर्याय नाही म्हणून त्यांना १० नंबरच्या खोलीत ठेवले पण दुसरी एखादी रूम केव्हा मोकळी होणार आहे याची त्यांनी लगेच चौकशी सुरू केली. दहा नंबरच्या खोलीत ॲडमिट झालेला पेशंट कधीही बरा होऊन घरी जात नाही ही “अफवा” त्यांच्या कानावर होतीच. ही केवळ अफवा आहे हे नेहमी सांगणारे डॅाक्टर कुलकर्णी आता मात्र विषाची परीक्षा कशाला घ्या म्हणत दुसरी खोली बघत होते पण त्या आठवड्यात दुसरी एकही रूम मोकळी होणार नव्हती.
दोन आठवड्यापूर्वी गणू शिंदे दहा नंबरच्या खोलीत ॲडमिट केला तेव्हा सिरिअस नव्हता. परंतु दोनच दिवसात त्याची तब्येत ढासळली होती. “काळी आकृती दिसते” म्हणत गणू बेशुद्ध झाला तो कधीच शुध्दीवर आला नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रचार करणारे डॅा कुलकर्णी देखील अवाक् झाले होते. आता त्यांचा जिगरी दोस्तच तिथे ॲडमिट झाला होता. बोलाफुलाला गाठ पडून त्याचं काही बरंवाईट होऊ नये या विचारात ते घरी चालले होते.. तेवढ्यात फोन आला…
“अरविंदराव रेस्टलेस झालेत. लगेच या.”
डॅा कुलकर्णी तातडीने दहा नंबरला गेले. अरविंदरावांना धाप लागली होती. डॅाक्टरनी योग्य औषधोपचार करून त्यांचा श्वासोच्छवास नॅार्मलला आणला व ते त्या खोलीतच शांत बसून राहिले.
रुग्णांना बरं करण्यास ही खोली खरचं मदत करत नाही? काळी आकृती दिसते इथे? त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. दहा नंबर मधून किती रूग्ण बरे होऊन गेले आहेत त्याची चौकशी सुरू केली. दहा पेशंट गेले आणि दोन बरे झाले.
त्यांनी दहा नंबरला नेहमी काम करणाऱ्या सर्व नर्सेस व कर्मचाऱ्यांना बोलावले. वेस्ट इंडीज हून मुंबईत येऊन राहिलेला रिचर्ड तसा नवा होता पण त्याचे काम उत्तम होते. मुंबईतच लहानाचा मोठा झाल्याने तो मराठी उत्तम बोलत असे.
“सर, काळी आकृती येती व माणसाला घेऊन जाती बघा” शंकर म्हणाला. तो खोलीची साफसफाई करत असे.
“काय हो सिस्टर? सिरिअस पेशंटच इथे ॲडमिट केले जातात का?” कुलकर्णी सिस्टर गायकवाड कडे बघत होते.
“सर, सगळे सिरिअस नव्हते पण इथं ॲडमिट केलं ना की ते सिरिअस होतात.” सिस्टरच्या आवाजात प्रामाणिकपणा होता.
“ठीक आहे. जा तुम्ही.” कुलकर्णी म्हणाले.
अरविंदरावांना न्युमोनिया झाला होता. ॲंटीबॅायोटिक्स चांगलं काम करतील अशी आशा होती. सर्व ट्रिटमेंट अगदी व्यवस्थित सुरू होती. कुलकर्णी त्या खोलीत बसून राहिले. सागर व त्याची आठ वर्षाची मुलगी राणी भेटायला आले होते.
“शी! किती घाणेरड्या रूम मध्ये आजो ला ठेवलय? अंधारी आहे ही रूम..भीती वाटते मला इथं” राणीचे शब्द कुलकर्णी ऐकत होते.
आजूबाजूला बघताना कुलकर्ण्यांना जाणवलं की दहा नंबरची खोली इतर खोल्यांपासून तशी लांब आहे. एक लहान खिडकी आहे पण त्यातून फारसा सुर्यप्रकाश येत नाही त्यामुळे खोली अंधारी वाटते. खिडकीचे गडद तपकिरी रंगाचे पडदे कातरवेळ अधिकच गडद करतात. त्या खोली जवळ माणसांची वर्दळ फारशी जाणवत नाही त्यामुळे पेशंटला फार एकटं वाटू शकेल..
बाकी काही नाही तर निदान खोली तरी प्रसन्न वाटायला हवी. त्यांनी काही गोष्टी बदलायचं ठरवलं. आपल्या पत्नीस, मेधास, सांगून झुळझुळीत क्रिम कलरचे पडदे लावले. त्या पडद्यावर बरेच छोटे सुर्य व बॅार्डरला सुर्यफुलं अशी नक्षी होती. मेधाने एक सुंदर वॅालपेपर छतावर लावला. निळ्या आकाशात दिसणारं इंद्रधनुष्य व प्रकाशाच्या दिशेनं उडणारे पक्षी डोळे उघडताच पेशंटला दिसतील असा! त्यानं पेशंटचं मन प्रसन्न होईल याची तिला खात्री होती.
कोणताही जीवाची जगण्याची उमेद एकटेपणाने कमी कमी होऊ लागते. त्यातच आजारानं विकलं झालेलं शरीर उरलं सुरलं मनोधैर्य खच्ची करतं..डॅा कुलकर्णी मुळचे पंढरपूरचे. विठ्ठलाच्या दारी अभंग ऐकत, टाळ मृदुंगाच्या गजरात कित्येक एकाकी वृद्ध लोक कसे देहभान हरपून रमून जातात हे त्यांनी लहानपणापासून बघितले होते. त्यांनी उत्तम अभंग गाणाऱ्या नारायण कर्णिक यांना बोलावून दहा नंबरच्या खोलीच्या बाहेरील कॅारिडॅारमध्ये संध्याकाळच्या कातरवेळी अभंग गायन ठेवले..
“आता कोठे धावे मन…
तुझे चरण देखलिया..”
नारायणाच्या सुरेल अभंगाच्या गजरात सारं हॅास्पिटल विठ्ठलमय होऊन गेलं. कर्णिकांच्या भक्तीरसानं ओथंबलेल्या आवाजाने कित्येक जीवांना वेदनेचाही काही अंशी विसर पडला. विठू माऊली समोर दिसू लागली..
कुलकर्ण्यांनी स्टाफला एकत्र केलं व सांगितलं, “अभंग सुरू होताच माझ्या डोळ्यादेखत दहा नंबरच्या खोलीतील काळी आकृती वितळत गेली व तिथे विठोबा दिसू लागला.. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तुम्हीही दर्शन घेऊन या!”
सगळा स्टाफ आश्चर्याने ऐकत होता.. अचानक दहा नंबरकडची रहदारी वाढली होती. बरेच जणांना तिथे विठोबा दिसू लागला होता. दहा नंबरची खोली, तिथले नवे पडदे, छतावरचं जीवनाची ओढ लावणारं इंद्रधनुष्य, मंद जळणारे नवे दिवे, अभंगातून पोचणारे तुकाराम नामदेवांचे अर्थपूर्ण शब्द आणि मेधाने उत्साहाने आणून ठेवलेला ताज्या निशिगंधाच्या फुलांचा वास मन प्रसन्न करत होता.
अरविंदराव बरे होऊन घरी चालले होते.
“राजू, किती आणि काय काय केलंस माझ्यासाठी! तुझे फार उपकार आहेत!” अरविंदरावांनी कुलकर्ण्यांचे दोन्ही हात हातात घेतले होते..
“अरे राजू, ती काळी आकृती पहिल्या दिवशी दिसली ती नंतर कधी दिसली नाही बरका. काय केलंस नक्की?”अरविंदरावांना राहवेना.
“काही नाही रे. रिचर्ड ब्लडवर्क साठी येतो ना..आता त्याचं काळेपण हा त्याचा दोष नाही..कदाचित अर्धवट जाग्या अवस्थेत पेशंट त्याला काळी आकृती म्हणत असला तर म्हणून मी त्याची ड्यूटी बदलून नवीन माणूस नेमला एवढचं! आणि एकदा असं काही कानावर आलं की लोकच अशा अफवा पसरवतात म्हणून मी पण पसरवलं की तिथे आता विठ्ठल दिसतो आहे!
खरंतर पेशंटना अनेक प्रकारचे भास, भ्रम होत असतात. पण या खोलीतून माणसं बरी होऊन घरी जात नाहीत हे ऐकून मी पण खरतर हादरलो होतो.. कारण माणसाला जे दिसतं.. जे उमगतं.. त्या पलिकडे असं बरंच काही आहे ज्याचा अर्थ आपल्या लिमिटेड कपॅसिटीला कळत नाही.. पण मी अत्यंत प्रयत्नाने ही अफवा दूर करणार आहे. मन एकदा अंधश्रद्धेला बळी पडलं तर मग भय इथले संपत नाही.. अशी अवस्था होते. हे भय मला संपवायचं आहे.. आपल्या हातात जे आहे ते सगळं मी केलं आणि माझ्या विठ्ठलाने मला साथ दिली!” कुलकर्णी प्रसन्न हसले.
अरविंदरावांचा डिस्चार्ज होताच लगेचच एक कॅन्सर पेशंट दहा नंबरला ॲडमिट झाला होता. सत्य संकल्पाचा दाता विठ्ठल असतो या विश्वासाने डॅा. कुलकर्णी नवे आव्हान स्वीकारत कामाला लागले..
दहा नंबरच्या खोलीचे भय संपवण्यासाठी व तेथील पेशंट वाचवण्यासाठी!!
©️®️ ज्योती रानडे