#कथाविश्व
मध्यंतरी माझ्या मुलासाठी पुण्याबाहेरील एक स्थळ आलं होतं. मुलगी दिसायला बऱ्यापैकी होती, शिक्षण पण ठीकठाक झालं होतं, मुलगी जॉबला वगैरे नव्हती, तिच्या घरची परिस्थिती पण तशी बेताचीच होती.
आम्हाला पण काही जहागिरदाराची किंवा आयटी तत्सम डिग्री घेतलेली कमावती मुलगीच हवीय अशी अपेक्षा नव्हती. मुलगी कामाला असेल तर ठीक आणि नसेल तरी ठीक, असा काहीसा आमचा विषय होता, आणि आहे. आणि म्हणूनच एकंदरीत सगळं काही अगदी आमच्या मनासारखं होतं.
आम्हाला मुलगी पसंत पडली होती, पण हे सगळं फक्त व्हाट्सएपच्या माध्यमातून सुरू होतं. मुलीचा फोटो आणि बायोडाटा पाहून झाला होता, पण त्यांची आणि आमची समोरासमोर भेट किंवा फोनाफोनी वगैरे झाली नव्हती. त्यानंतर मध्यस्थांच्या मार्फत त्यांचा आम्हाला निरोप मिळाला, त्यांना मुलगा पसंत आहे, आपण लवकरच बैठक घेऊयात.
या गोष्टीला जवळपास आठवडा उलटून गेला असेल, तरीही तिकडून आम्हाला काही निरोप आला नाही. म्हणून सहजच.. मध्यस्थी असणाऱ्या व्यक्तीला मी फोन लावून त्याबाबत विचारणा केली. तर तो व्यक्ती अगदी संकोचाने मला म्हणाला.. तुमचं इंटरकास्ट मॅरेज आहे म्हणून त्यांनी स्थळ नाकारलं आहे.
#कथाविश्व
माझा आंतरजातीय विवाह झाला आहे, मी हिंदू कुंभार तर माझी बायको हिंदू राजपूत आहे, आणि मुलाच्या मॅरेज बायोडाटामध्ये आम्ही त्याचा तसा स्पष्ट उल्लेख केला आहे, यातील काहीएक लपवून वगैरे ठेवलं नाही. कारण पुढे जाऊन काही शंका कुशंका निघण्यापेक्षा अगोदरच स्पष्ट सांगितलेलं बरं.
खरं तर आजच्याला जातपात विषय फारसा उरला नाहीये असं आपण समजत असलो तरी, त्याबाबतचे काही छुपे अजेंडे अजूनही तग धरून आहेत, हे या अनुषंगाने मला पुन्हा एकदा जाणवून आलं.
ठीक आहे.. तसा निरोप आल्यावर आम्ही तो विषय जागेवर सोडून दिला, शेवटी प्रत्येकाचा चॉईस असतो, त्याबाबत आपण कोणालाही जोर जबरदस्ती करू शकत नाही.
त्यानंतर साधारणपणे तीन-चार महिन्यांनी माझ्या मुलाला त्याच मुलीचा मेसेज आला. तुमचं स्थळ आम्हाला पसंद होतं, वैयक्तिक मला सुद्धा तुम्ही फार आवडला होता. पण आमच्या एका नातेवाईकाने तुमच्या आईवडिलांचं इंटरकास्ट मॅरेज झालं आहे असं सांगितलं, त्यामुळे सगळा घोळ झाला.
त्यावर माझा मुलगा म्हणाला..दुसऱ्या कोणी सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, माझ्या मॅरेज बायोडाटा मध्ये आम्ही तसा स्पष्ट उल्लेख केला होता, तो तुम्हाला दिसला नाही का.? आणि.. माझी आई कुंभाराची नसली, तरी माझा बाप कुंभाराचाच आहे, इतकं पुरेसं नाहीये का.?
माझ्या बायोडाटा मध्ये सगळं काही नमूद केलं असल्याने, याबाबत तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी दोषी ठरवून, आता आमची बोळवण करण्यासाठी कोणाचं तरी नाव पुढे करण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि हो.. अजून एक गोष्ट मला समजली नाही, हे सगळं समजायला तुम्हाला तीन-चार महिने लागले.?
येवढं बोलून माझ्या मुलाने आमच्या परस्परच त्या मुलीला लग्नासाठी स्पष्टपणे नकार कळवला.
त्यानंतर देखील त्या मुलीने मेसेज करून माझ्या मुलाला बरीच गळ घातली, यामागे नेमकं काय कारण होतं.? त्याचं स्पष्टीकरण आम्हाला पुढे मिळालं.
काही कामानिमित्त त्या मुलीच्या घरी आलेल्या एका पाहुण्यांसमोर सहजच काही विषयावर चर्चा होत असताना, मधेच त्या पाहुण्याने त्यांच्या मुलीच्या लग्नाचा विषय काढला, मुलीचं लग्न अजून ठरलं की नाही.?
त्यावेळी ही लोकं बोलून गेली.. मध्यंतरी पुण्यातील अमुक एक स्थळ आलं होतं, पण मुलाच्या आईवडिलांचा आंतरजातीय विवाह झाला असल्याने, आम्ही ते स्थळ नाकारलं.
त्या संभाव्य व्यक्तीने.. नाकारलेलं स्थळ कोणतं होतं असं त्यांना विचारलं, तेंव्हा त्यांनी आमच्या मुलाचा मॅरेज बायोडाटा त्यांना दाखवला.
तेंव्हा त्या व्यक्तीने कपाळावर हात मारून घेतला. आणि म्हणाला.. अहो, एका अनावश्यक कारणावरून तुम्ही इतकं चांगलं स्थळ नाकारलं.? मला स्वतःला मुलगी असती तर अगदी हसतमुखाने मी यांना माझी मुलगी देऊ केली असती.
एकुलता एक स्मार्ट मुलगा आहे, चांगला उच्चशिक्षित आहे, स्वतःचं घर आहे, मनमिळाऊ आणि सगळ्या सुखांनी संपन्न असं हे कुटुंब आहे, मी या कुटुंबाला चांगलं ओळखतो, असं स्थळ तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही. मुलाचे आईवडील तर अगदी देवासारखे आहेत, खूप सुखात राहिली असती तुमची मुलगी.
हे सगळं ऐकून झाल्यावर.. आता बाकी त्यांना फार पश्चाताप झाला, पण आता ते कोणत्या तोंडाने बोलणार.? असा काहीसा विषय होऊन बसला होता. त्यानंतर मला त्या मध्यस्थांचा फोन देखील आला, ( त्या पाहुण्या मार्फत मध्यस्थांना वरील सगळा विषय समजला होता. ) पण त्यानंतर देखील आम्ही त्यांना स्पष्ट नकार कळवला.
कारण.. सुरवातच चुकीची झाल्यावर, शेवट कसा चांगला होईल.?
स्वतःची बुद्धी न वापरता, स्वतः कसलीही चौकशी न करता, कोणीतरी काहितरी सांगितलेल्या जुजबी माहितीवर इतका विश्वास ठेवण्यात कोणता शहाणपणा आहे.? जी लोकं स्वतः घ्यायचे निर्णय इतरांवर सोडून देत असतील, त्यांच्यावर विश्वास ठेवत असतील, अशा लोकांशी सोयरीक करण्यात काय अर्थ आहे.? एवढाच विषय असेल.. तर त्यासाठी बाजारात प्रायव्हेट डिटेक्टिव्ह उपलब्ध आहेत, दोन पैसे खर्च करून त्यांच्याकडून चौकशी करून घ्यावी, पण अशी आंधळी कोशिंबीर खेळण्यात काय अर्थ आहे.? केवळ त्यामुळे.. मी देखील त्या विषयाला लगेच पूर्णविराम देऊन टाकला.
खरं सांगायचं म्हणजे.. या कारणामुळे माझा मुलगा खूप रागे भरला होता, आपल्या आईबापाला चुकीचं बोललेलं कोणाला सहन होईल.? आणि स्पेशली आईच्या बाबतीत बोललेलं तर बिलकुल सहनच होऊ शकत नाही.
आपण म्हणतो.. समाजातील जातपात संपली आहे, पण नाही..त्याची पाळंमुळं प्रत्येक समाजात अजूनही घट्ट रुतून बसली आहेत.!!
✒#PΔΠDIT_PΩTTΣR
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉✨ #🎭Whatsapp status