ShareChat
click to see wallet page
*👩‍❤️‍👨तुझं माझं जमेना!👩‍❤️‍👨* *अहो, चहा घ्या.. म्हणत रसिकाने सोहम समोर चहा ठेवला.. न्यूजपेपर वाचण्यात गढून गेलेल्या सोहमने तिची दखल घेली नाही हे पाहून ती जरा मोठ्या ने म्हणाली.. 'गार होईल घ्या आधी'..* *'ऐकलय, बहिरा नाहीये मी'! हातातला न्युजपेपर बाजूला ठेवत तो बोलला.. ती आत निघून गेली.. काहीतरी फुटल्याचा आवाज ऐकून ती दचकून बाहेर आली.. तर चहाचा कप फुटलेला आणि चहा फरशीवर सांडलेला..* *'काय झालं'? तिनं घाबरून विचारलं...* *'हा असा चहा करतात? ना साखर ना पत्ती'.. तो ओरडला.* *'अहो, म्हणून कप फेकत का कुणी'?* *'अख्खा रविवार खराब केला माझा'... कपाळावर अठया आणत तो तणतणला.* *'अहो मी मुद्दाम साखर कमी टाकली'..* *'का? मला डायबिटीस आहे'? तो जोरात वसकला.* *'तसं नाही पण.. साखर चांगली नाही न'.. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच तो गरजला..* *'ए फालतू लेक्चर देऊ नको हा... साधा चहा करता येत नाही'.* *मुळात सुगरण असलेल्या तिला हे वाक्य जिव्हारी लागलं.. अन् सकाळी- सकाळी दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. तिला वाटलं मीच का नमतं घेऊ सतत.. ह्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा करत अर्धदीक आयुष्य लोटलं. जावई आला, नातवंडं झाली.. कळणार कधी ह्या माणसाला? आज तीही पेटली इरेला!* *शब्दाने शब्द वाढला. इतका की त्या मानापमान नाट्यात आजवर घडून गेलेल्या सत्राशेसाठ गोष्टी अन् दोन्हीकडचे नातेवाईकही घुसळले गेले. शेवटी 'ती बॅग भरून माहेरी निघून जाते' म्हणाली तर 'खुश्शाल जा' म्हणाला. जरासं आठवून परत बोलला 'कोणी विचारतं का ते तरी बघ आधी.'* *तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आई नाहीये आता! बाबा तर त्याही आधी गेले!! भाऊ, वहिनी .. नकोच!! कुठे जावं? जावयाच्या घरी ... नकोच ते.. पण करू काहीतरी... मनाला धीर देत तिने घरातली कामं मार्गी लावली, अन् काही न बोलता टेबलवर त्याच्यासाठी पोळीभाजीचा डबा वरणभाताचा कुकर अन् ताटवाटीही काढून ठेवली.. स्वतःसाठी पोळी भाजी डब्यात भरून घेत आता तरी इथून निघायचंच हे तिनं मनाशी पक्क केलं...* *कसे तरी बॅगेत कपडे कोंबले. डब्यात साठवलेले काही पैसे आणि मोबाईल पर्स मध्ये टाकून अन भरल्या डोळ्यांनी घरावरून एकवार नजर फिरवून ती निघाली.* *तो बेफिकिरपणे टीव्ही बघत राहिला. अवाक्षर ही न बोलता तिनं दाराबाहेर पाऊल टाकलं! त्याने थांबवावं ही इच्छा होती, मात्र खात्री नव्हतीच!* *ह्यांचं हे अतीच झालं. खरं तर माझंच चुकलं. मीच हे होऊ दिलं. हे मोठे साहेब अन मी..? तिने डोळ्याला पदर लावला. सतत पुढे पुढे नाचून अगदी आयतोबा करून ठेवलं मी. सगळं हातातल्या हातात देऊन वर ओरडाही सहन करत राहिले. समोरच्याला किंमत द्यावी हे कधीच कळलं नाही ह्यांना. ह्यांची, ती टेन्शनं, ह्यांना येतो, तो थकवा.. जगात सर्वात त्रासलेला एकमेव मनुष्य म्हणजे हाच. सगळ्या जगाची जबाबदारी जशी ह्यांच्याच शिरावर! मग बाकी काय मेणाचे पुतळे? भावभावना नाहीच आम्हाला! तिची मनातली बडबड काही थांबत नव्हती. नुसते पैसे कमावले म्हणजे जग नाही जिंकल हो तुम्ही! तुमच्याशी लग्न केलं हा हा गुन्हाच झाला माझा! मी रोबोट नाही घरातली, की चावी दिलेलं एखादं खेळणं. तुम्हाला राग आला की त्याचा निचरा करण्याची जागा! सतत चिडत राहायचं माझ्यावर?? मनातला कचरा फेकायची जागा आहे का मी??* *ती रडवेली झाली. स्वमग्न अवस्थेत ती रिक्षेत बसली खरी... पण कुठे जायचं हे ठरलंच नव्हतं.* *'मॅडम कहा जाना है'?..* *रिक्षेवाल्याच्या बोलण्यानं ती भानावर आली. क्षणभर तिला कळेना, थोडं सावरून म्हणाली, चलो बस स्टँड...* *विचारांती तिने कॉलेजच्या जिवलग मैत्रिणीला, राधाला फोन लावला,' हॅलो राधा, मी रसिका'.. तिचं बोलणं पुरं होण्यापूर्वीच राधा बोलली, 'हाsय, रसिका, अग पत्ता कुठेय तुझा? किती दिवसांनी आवाज ऐकतेय तुझा.. बोल ना कशी आहेस? काय म्हणतेस? ए भेटू ना आपण'...* *'अग हो हो ऐक तर खरं.. राधाचं बोलणं ऐकून तिचं मन खरंतर सुखावलं होतं. 'घरी आहेस का तू आत्ता.. 'ओहो.. म्हणजे तू मला भेटायला येत आहेस! हो ना!.. सखे, खुशाल ये! अग, विक्रम गेलाय आठ दिवसांच्या दौऱ्यावर. दोन दिवस राहायलाच ये ना... मज्जा करू!' राधा खूष होत बोलली.* *'ऐक ना राधा, अग मी येतेय तुझ्याकडे खरंच... आपली घरं तशी बर्यापैकी लांब आहेत, तुझा अड्रेस सेंड कर ना व्हाट्सएपला'* *रसिकाला आंधळा मागतो एक अन देव देतो दोन डोळे असं झालं* *'अग आमचे ड्रायव्हर काका येतील तुला घ्यायला, पाठवू ना'..* *राधा खरंच भेटीसाठी आतुर होती, हे लक्षात आल्याने रसिका मनोमन खूष झाली.'अग नको, मी निघालेय घरातून आलरेडी... असं म्हणत तिने फोन ठेवला.* *घरात तो एकटाच होता. ती गेल्यावरही दोन तास धुसपुसत होता. मला उलटून बोलते! 'हिची हिम्मत झालीच कशी दाराबाहेर पाऊल टाकण्याची? जाऊन जाऊन जाशील तरी कुठे? बसेल एखाद्या मंदिरात अन येईल घरी! सरड्याची धाव कुंपणापर्यंत! आव तर असा आणत होती की जसं काही आयुष्यभर तोंड बघणार नाही, बरं झालं पडली घराबाहेर आता खरी किंमत कळेल माझी! आहेस कुठे म्हणावं? त्रासिका कुठली! तो कुच्छित पणे हसला. हिला रसिका नाही त्रासिकाच म्हणणार मी आता...* *क्षणभर त्याला हसू आलं. दुपारी पोटातले कावळे ओरडू लागले, तसा तो किचनमध्ये डोकवला.. डायनिंग टेबलवर सगळं व्यवस्थित ठेवलेलं पाहून त्याचा इगो सुखावला. पोळी भाजी वाढून घेत तो टीव्ही पुढे येऊन बसला. जेवून तृप्त झाला. एवढ्या रागातही भाजी भारी बनवली हिने... त्याच्या मनात आलं. खरंतर कप फेकला नव्हता मी.. निसटला होता चहा ओतताना बोट भाजलं अन् कप पडला खाली.. पण थोडं बोललो तरऐकून घ्यायचं ना, एवढं नाटक कशाला?.. येईल संध्यााळपर्यंत.. कुठे जाणारे? त्यानं स्वतःलाच खात्री दिली.* *इकडे रसिकाला राधाने कुठे ठेवू अन कुठे नको असं केलं होतं. रसिकाच्या मनावरचा ताण नकळत पळून गेला. ती खऱ्या अर्थाने रिलॅक्स झाली! राधाने त्यांच्या कॉमन चार मैत्रिणीना फोन करून बोलवून घेतले. सगळ्या एकत्र जमल्या. गाणी, गप्पागोष्टी अन् बरच कायकाय प्लॅन करताना रात्रीचे आठ वाजून गेले ते कळलंही नाही. राधाने रात्रीची जेवणाची पार्टी दिली. राधाने सर्व मैत्रिणींना रात्री तिच्याकडे मुक्कामाला राहा अशी रिक्वेस्टही केली आणि रसिका दोन दिवस तिच्या घरी रहाणार असल्याची घोषणाही केली.. एकटी शमा मुक्कामासाठी तयार झाली.. तर तिच्या बोलण्यावर अवाक झालेली रसिका तिला म्हणाली, 'अग, मला घरी सोड आता.. झाली की पार्टी, गप्पा सगळंच.. हे एकटे आहेत घरी.. हाल होतील खाण्याचे.. पण राधाने काही ऐकून घेतले नाही . तू जिजूना फोन लाव की मी बोलू? असा प्रश्न तिने केला.* *नाही मी बोलते असं म्हणत रसिका थोडी बाजूला गेली. मात्र सोहमचा एकही फोन न आल्याने खट्टू झालेल्या रसिकाने नवरा आजच्या एका मुक्कामासाठी हो म्हणालाय हे त्याला फोन न लावताच मैत्रिणी मध्ये जाहीर केलं..* *इकडे 'हा' ही बेचैन झाला.. अंधार पडला कशी नाही आली ही घरी? गेली असणार लेकीकडे.. राहिलही रात्रभर कदाचित. काही नको फोन करायला लगेच.. गेली तशी येईल परत. जोरात भूक लागल्याने त्यानं राजनला त्याच्या मित्राला बाहेर जेवायला जाण्याबद्दल फोन लावला.* *जेवून घरी परतला तसं त्याने सवयीने बेलचं बटण दाबल अन् ती घरात नाही हे लक्षात आलं.. तो दार उघडून आत आला, त्याची घरभर नजर फिरली त्याला घर उदास अन् मुकं भासलं. बेडरूम मधल्या टेबलवर हातातला मोबाईल ठेवताना त्याचं लक्ष त्यांच्या दोघांच्या फोटो कडे गेलं.. तो जरा गहिवरला. किती सुरेख दिसतेय ही.. तिला न्याहाळताना तो किंचित अपराधी झाला. कुठे गेली असेल ही.. त्याने न राहवून तिला फोन लावला.. आऊट ऑफ रेंज होता.. प्रियाकडेच गेली असणार.. कुठे जाणार नाहीतरी? त्यानं पुन्हा मनाची समजूत घातली.* *तिच्यावर सकाळी भडकलेल्या त्या निखाऱ्याची पुरती राख झाली होती. बेड वर पडला खरा पण बेडवरची तिची रिकामी जागा पाहून त्याला झोप लागेना.. खरंच इतकं रितेपण यावं हिच्या नसण्याने... मी फारच ओरडतो का हिच्यावर? ती कधीच काही बोलत नाही... कसली डिमांडही नसते तिची. पण मीही पुरेपूर सुखात ठेवतो की तिला.. काही कमी पडू दिलं तिला आजवर? हा, आता थोडा चिडका आहे मी.. थोडं ओरडून बोलतो... घ्यावं की ऐकून.. घाव पडतात का मनावर.. शेवटी घर तिचं संसार तिचा.. तीच राणी ह्या घराची.. मी तर नस्तोही घरात...* *सकाळ झाली तसं बायको घरात नसल्याची सोहमला जाणीव झाली. खरंच लेकिकडे, प्रिया कडेच गेली असेल ना ही... की भावाकडे गेली असेल?. . बघुया... आता आधी चहा करायला हवा.. रोज हातात आयता येणारा चहा आज त्याला स्वतःला बनवावा लागणार होता.* *गेल्या २५ वर्षात तो गॅसकडेच काय... किचन मध्ये ही फिरकला नव्हता. साधं चहा करणं एक मोठा टास्क होऊन बसला. चहासाठी आधी दूध आणावं लागणार होतं. दूधवाला येऊन गेला, तेव्हा महाशय झोपेत होते. शेवटी, चहा बाहेर घ्यावा असं ठरवून तो आवरून ऑफिस ला निघून गेला. लंच ब्रेक मध्ये मुलीला फोन लावला.. 'हॅलो प्रिया, बेटा, कशी आहेस? तुझ्या आईला फोन दे ना जरा'...* *बायकोवर ओरडणारा नवरा पोटच्या मुलीशी बोलताना किती हळवा होऊन जातो! 'पपा मी बरी आहे, ममा इकडे येणार होती का? काय झालं सांगा न'?...* *ती काळजीत पडलेली पाहून तो म्हणाला, 'अग नाही म्हणजे हो ती दोन दिवस राजूमामाकडे राहून मग तुझ्याकडे येणार होती. तू काळजी करू नकोस, मी बोलतो तिच्याशी'.* *'ओके पपा' म्हणत मुलीने फोन ठेवला, तसा तो विचारात पडला, ही कुठे गेली असेल खरंच? . .त्यानं राजुला फोन लावला. बरंचसं इकडंच तिकडंच बोलल्यावर रसिका तिथे आली नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. आता मात्र त्याच धाबं दणाणलं! इगो बाजूला ठेवत आता बायकोला फोन करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.* *इकडे रसिकाचं ही मधून मधून फोन कडे लक्ष जात होतं. फोन न आलेला पाहून ती आतल्या आत घुसमटत होती. इतकं बेपर्वा असावं माणसानं? काहीच घेणं देणं नाही.. आयुष्य एकदम शून्य झाल्यासारखं तिला वाटून गेलं. डोळ्यातलं पाणी कसंबस थोपवत ती वरवर रिलॅक्स असल्याचं दर्शवत होती. मनातलं वादळ डोळ्यात उतरू द्यायचं नव्हतं तिला... तब्येत तर बरी असेल ना ह्यांची? मनात विचार चमकून गेला... पण.. मीच का करू ह्याची काळजी? ह्याना तर काहीच फिकीर नाही माझी! आता तीला स्वतःची कीव ही येत होती अन वाटत होतं, ह्या माणसासाठी मी इतकी वर्ष जीव जाळला?? कोणत्या मातीचा बनलाय हा? दुष्ट! भावनाशून्य!..* *अन् एकदाचा फोन वाजला! रसिका ने अधाशा सारखी मोबाईल वर झडप घालत फोन उचलला.* *'हॅलो रसिका, अग कुठे आहेस काल पासून? किती फोन केले तुला? हॅलो, बोल ना रसिका.. त्याच्या बोलण्यातली आर्तता तिला जाणवली. ती काही बोलणार तेवढ्यात राधाने फोन अलगद स्वतच्या हातात घेतला आणि ती म्हणाली..* *'हॅलो, जीजू, मी राधा, रसिका ची मैत्रीण, आम्ही जरा ट्रिप प्लॅन केलीय.. आज निघतोय.. दोन दिवसांनी परतू घरी.. हरकत नाही ना'..त्याला यावर काय बोलावं कळेना.. 'हरकत नाही पण रसिकाला फोन द्या ना प्लीज'..* *'अहो, जाऊ न मी'.. तिने मुद्दामच विचारलं.* *'जा तू... पण मला काल जरा ताप होता.. सकाळी दवाखान्यात जाऊन आलो.. पण हरकत नाही, तू जा.. मी करतो म्यानेज'... ही गोळी मात्र बरोबर लागू पडली.. 'अहो नाही मी येतेय घरी लगेच... माझा जीव लागेल का गेले तरी'..* *'बरं तुला वाटतं तस कर'.. राधाने पुन्हा फोन हातात घेतला अन् ती म्हणाली, 'काहीही हा जिजू, खोटं बोलू नका, निमूटपणे माझ्या घरी या आणि बायकोला घेऊन जा...* *आम्ही जेवणासाठी थांबतोय... मी अड्रेस सेंड केलाय माझा'...* *'बरं बरं, आलोच अर्ध्या तासात' म्हणत सोहम ने फोन ठेवला...* *कधी एकदा रसिकाला भेटतो आणि घरी घेऊन येतो असं त्याला झालं.* *नवरा बायकोच नातं म्हणजे तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना! भांड्याला भांडं लगायचच हे ही तितकंच खरं! नाही का?* 👴🏻🧕🏻👩‍❤️‍👨🧕🏻👴🏻 #✍🏽 माझ्या लेखणीतून

More like this