आई....
आज अंजलीचा बऱ्याच दिवसांनी फोन आला, "संध्याकाळी भेटायला येते. तुझ्याशी बोलायचं आहे" म्हणाली.... माझं मन भूतकाळात एकदम खूप मागे गेलं.
तेव्हा आम्ही पाचवीत शिकत होतो. अंजली, उषा आणि मी, आम्ही तिघी मैत्रिणी. अंजलीची आई बरेच दिवस आजारी होती, आणि नंतर ती गेलीच... तिची आजी गावाकडे असायची. पण सून आजारी असल्याने ती पुण्याला आली.
आई गेल्यानंतर अंजलीला फार वाईट वाटले. आम्हालाही... आम्हाला जमेल तसं ऊषा आणि मी तिला सांभाळत होतो. आजी घरी होती. ती प्रेमाने तिचं सारं करायची. हळूहळू अंजली नॉर्मल झाली. परीक्षा, अभ्यास, खेळ, असं नेहमीचं रूटीन सुरू झालं.
असेच काही महिने गेले.. आणि एके दिवशी अंजलीने मला आणि उषाला घरी बोलावले. एका कोपऱ्यात नेऊन ती म्हणाली, "आधी देवाची शपथ घ्या.. तुम्ही हे कोणाला सांगणार नाही..."
"अगं पण झालं काय ?"
रडवेल्या आवाजात ती म्हणाली, "बाबा नवीन आई घेऊन येणार आहेत..."
बाप रे, आम्ही हबकलोच...
"म्हणजे, तुला आता सावत्र आई येणार ?"
"हो ना गं ...." असं म्हणून ती रडायलाच लागली. काय करावं आम्हाला सुचेचना..
सावत्र... या शब्दाशी आमचा कधी संबंधच आला नव्हता.... तेव्हा आमच्या वर्गात कोणालाच सावत्र आई नव्हती...
आता आपल्या मैत्रिणीला सावत्र आई येणार... आता तिचं कसं होणार?.. ही चिंता आम्हाला लागली. तिने देवाची शपथ घातली होती त्यामुळे कोणाला सांगता पण येत नव्हते...
आमच्या तिघींचं चिमुकलं भावविश्व पार हादरून गेलं होतं... आणि याला काही उपाय आमच्याकडे नव्हता. तिला आता तिची सावत्र आई छळणार... त्रास देणार... तिला मारणार... उपाशी ठेवणार.. वगैरे... असचं आमच्या मनात यायला लागलं.
कोणीतरी म्हटलेलं अंजलीनी ऐकलं की.... "आता लग्न केलं नाही तर तीन वर्ष परत करता येत नाही म्हणे."
म्हणजे काय, हे पण आम्हाला समजले नाही.
दोन दिवस गेले आणि तिची नवी आई आली.
आम्हाला प्रचंड उत्सुकता... त्यामुळे आम्ही मुद्दाम वही द्यायचं निमित्त करून तिच्याकडे गेलो. 'तिला' पाहायला... मनात दडपण, भिती होती.. कशी असेल सावत्र आई ? तिच्याशी कसं बोलायचं?
पण... नवीन आई इतरांची आई असते तशीच दिसत होती. ती आमच्याशी बोलली. आमची नावं विचारली. ईतकंच नाही तर तिने आम्हाला लाडु खायला दिला. "अंजलीशी खेळायला येत जा" असेही म्हणाली..
आम्हाला कसला अंदाजच येईना.. आमच्या तिघींचा एकच विषय.. नवीन आई... आम्ही अंजलीला अनेक प्रश्न विचारत होतो.. खोटं वाटेल, पण आम्ही तिचा डबा पण तपासून बघत होतो. तो व्यवस्थित असायचा. त्यामुळे आम्हाला जरा बरे वाटले.
आता इतर मैत्रिणींनाही हे समजले होते. त्यामुळे त्या पण तिला विचारायच्या.. तिला उत्तर देतांना थोडं अवघडच वाटायचं....
आता लक्षात येतं, त्या कोवळ्या वयात नव्या आईला स्वीकारणं तिला किती जड गेलं असेल... तसेच तिच्या आईचीही अवस्था काय असेल ते आता... या वयात आम्ही समजू शकतो...
काही दिवसानंतर ती म्हणाली... "माझ्या अक्षरावरून नवी आई मला आज रागावली. मला रोज शुद्धलेखन काढायला सांगितले आहे."
मी म्हटलं, "हो का... यासाठी आई रागावली... मग ठीक आहे..."
एकदा ती म्हणाली... "आई सारखा अभ्यास घेते. आई पाढे म्हणून घेते..."
"जाऊदे पण मारत नाही ना ?"
"नाही गं, मारतबीरत नाही," ती म्हणाली..
आम्हाला जरा बरे वाटले. "अगं माझी पण आई मला अभ्यासावरून रागवते......" ऊषा तीला म्हणाली..
असं होता होता.. अंजली सावरली..
सहामाही परीक्षेत तिला चांगले मार्क मिळाले. बाईंनी तिच्या अक्षराचं कौतुक केलं.
दुसरे दिवशी तिने सांगितलं, आई तिच्यासाठी गंमत आणणार आहे बक्षीस म्हणून... मग हळूहळू अंजलीची नव्या आईशी गट्टीच जमली. आधी ती नवी आई म्हणायची, नंतर नुसती 'आई' म्हणायला लागली... काही दिवसांनी तर खऱ्या आईलाही विसरली.... इतकी त्या दोघींची जवळीक झाली. आम्हालाही तिची आई आवडायला लागली.
आता वाटतं.. काही शब्दांचं असं असतं की ते ऐकल्यावर आपल्या मनात त्याची प्रतिमा तयार झालेली असते. ती लगेच समोर येते. त्याप्रमाणे आपले मन प्रतिसाद द्यायला लागते .शब्दांचं मनावर एक गारुडच असतं...
'सावत्र' हा शब्द असाच.. आमच्या लहानपणी भीतीदायकच वाटायचा.. त्याची दहशतच वाटायची.. त्यात उत्तानपाद राजा, त्याच्या दोन राण्या, सुरुची आणि सुनीती, आणि ध्रुव बाळ ही कथा प्रत्येकाला माहीत असायची. त्यामुळे सावत्र म्हणजे दुष्ट, त्रासदायक असंच एक चित्र आमच्या मनात होतं..
वय वाढेल तसं.... अर्थात हळूहळू शहाणपण येत जातं.. शब्द आणि त्यांचे अर्थ समजायला लागतात... त्यातला भाव लक्षात येतो.
अंजली आली... आज आईच्याच विषयी ती बोलायला आली होती.
"तुम्ही दोघींनी मला त्यावेळेस किती आधार दिला गं... तो आता फार जाणवतो. फारच अवघड होती ती वेळ..."
"अगं तुझं दु:ख केवढं मोठं होतं हे तेव्हाही आम्हाला समजत होतं."
"नीता.. नुकतीच आई गेली. तिने माझं आयुष्य फुलवलं, समृद्ध केलं.... अजून एक खूप फार मोठी गोष्ट तुला सांगायला आज मुद्दाम तुझ्याकडे आलेली आहे ..." हे म्हणतांना अनावर होऊन ती रडायला लागली. रडत रडत म्हणाली, "आई गेल्यानंतर बाबांनी सांगितलं की माझ्यावर अन्याय नको म्हणून आईने तिला स्वतःचं मूल होऊ दिलं नाही...... आणि हे मला कधी सांगायचं नाही असंही तीने बजावलं होतं.. सांग, कसे पांग फेडू गं त्या माऊलीचे नीता...."
आम्ही दोघी धाय मोकलून रडत होतो.... कितीतरी वेळ आम्ही हातात हात घेऊन बसलो होतो.. नि:शब्द ...
सावत्र - सख्खं असं काही नसतंच.. हे नुसते शब्दांचे खेळ ...आई ही आईच असते.. एवढंच खरं......
©®नीता चंद्रकांत कुलकर्णी #आई