ShareChat
click to see wallet page
*भुलाबाईची गाणी'* आमच्या लहानपणी भुलाबाईच्या सणाची व गाण्यांची वेगळीच मजा असायची. हल्ली आता ही मजा पहायला भेटत नाही.सारं टिपीकल व बेगडी वाटते.असं वाटते या लोकसंस्कृतीचे वाहक असलेल्या सणाला हल्ली बेगडीपणाच रूप शिल्लक राहिलं की काय?असं वाटायला लागतं.आज पुन्हा भुलाबाईच्या निमित्तानं लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. भाद्रपद महिन्याच्या सरत्या शेवटी गणपती,दसरा व नवरात्र सणाच्या समाप्ती नंतर भाद्रपद पौर्णिमा दिवशी अशा भूलाबाई महाराष्ट्रात घरोघरी बघायला मिळतात. पूर्वी अशा तयार रंगरंगोटी केलेल्या मुर्त्या आमच्या खेडेगावात नसायच्या. नदीकाठावरील कुंभाराच्या पजायावरची लूसलूसीत माती घेऊन व मस्त त्यात घोड्याची लीद मिसळून पाणी टाकून एकजीव केल्यानंतर छान भुलाबाई बनवायचो. हातानं भुलाबाई तयार करून ज्वारीचे टपोरे दाणे डोळे म्हणून लावायचो.व दुकानातून आठान्याचा गेरवाचा रंग आणून भुलाबाई रंगवून उन्हात वाळवून. माळीला अशा भुलाबाई महाराष्ट्रातील घराघरात बसवत. पुजा, अर्चा करत.पाच गावरान ज्वारीच्या धांड्याची हिरवीगार खोपडी असायची.आता हे गावरान ज्वारीचे धांडे ही गावाकडं दुर्मिळच झाले आहेत. काल अमरावतीच्या गांधी चौकात एका टेम्पोत धांड्याचे पेंडकं विकणारा बसलेला दिसला तर सहज म्हणून विचारले तर सत्तर रुपये खोपडी होती. गावरहाटीत फुकटात कोणाच्याही शेतात पाच धांडे सहज उपलब्ध होत.कोणाची मना नसायची. फुकटात उपलब्ध असणारी खोपडी शहरात आता विकत घ्यावी लागते. तेव्हा भुलाबाईला आजच्या सारखी फराळाची सुविधा उपलब्ध नसायची.तरी घरच्या शेतातलं धान्य म्हणजे भाजलेले मुग, हरभरे, सूर्यफूल,काकडी आयते,धापळे,कुरडयाच्या भाजलेलं कूट,पोंगा पंडित,डीस्को गोळ्या,संतरा गोळया असं खिरापती राये.पण त्यातही ते ओळखण्याची वेगळी मजा होती. सरते शेवटी गाणी आम्ही म्हटल्यावर खिरापतीचा डब्बा हलवून आतला पदार्थ ओळखायचा तो पर्यंत खाण्याची आतूरता मनाला लागून रहायची.आम्ही आठदहा घरं बहिणीसोबत फिरायचं .बस मस्त पोट भरलं म्हणजे घराची वाट धरायची. पोरीत पोरगं मिठाचं गाडगं असं काही हिणवायची तरी या निरागस मनाला खाण्यापुढे कशाचीही पर्वा नसायची.असं बेफिकीर जीवन होतं.या भाद्रपद महिन्यात आजच्या दिवशी भुलाबाई आपल्या माहेरी येते अशी आख्यायिका आहे. त्या भुलाबाईची यथासांग सहज उपलब्ध होणारी झेंडूची फुले वाहून पूजा अर्चा केली जायची. तीला मस्त खीर पुरीचा कानोला नाहीतर गुळाची पोळी, दुधाची बासुंदी,भजे,कुरोळयां नैवेद्य म्हणून दाखवल्या जाते. दररोज भुलाबाईच्या मंडपात लहान लहान मुलंमुली एकत्र गोळा होतात व भुला बाईची गाणी म्हणतात. मग आळीपाळीने एकमेकांकडे भुलाबाईंची गाणी म्हणण्यासाठी शेजारच्या पाजारच्या काकुचं घरा -घरातून मानाचं आमंत्रण मुलांना यायचं. *पहिली गं पुंजाबाई देवादेवा शहादेव,साथीला खंडोबा,खेळी खेळली मंडोबा. खंडोबाच्या राणीबाई वरसा वरसा अवसनी. अवसनीचं पाणी जसं गंगेचं पाणी. गंगेच्या पाण्याला ठेवीयला कंठ राणा भुलाबाईचे बाळ हनुमंत* *भाद्रपदेचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला. पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला. माहेर घेऊन पाट बसायला विनंती करते यशोदेला.भुलाबाई भुलाबाई पाळणा पहा, पुढच्या वर्षी लवकर या.* *तुमच्या अंगात पिवळी चोळी.... गं पिवळी चोळी| नणंद भावजया दोघी जणी दोघी जणी घरात नाही तिसरं कुणी शिंक्यातल लोणी खाल्लं कोणी... तेच खाल्लं वहिनींनी....कारल्याचा वेल लाव ग सून बाई मग जा आपुल्या माहेरा...यादव राया राणी रुसून बैसली कैसी* अशी लोकगीतातली गाणी म्हणून सारी गल्ली दणाणून जायची.काही ठिकाणी मराठवाड्यात या सणाला हादगा भोंडला म्हणतात.. ही भुलाबाईच्या कुळाचा उद्धार करत सासरची माहेरची गाणी म्हणून फेर धरून आनंद साजरा करतात. कधीकधी या बिच्याऱ्या भुलाबाईच्या नशीबी सासुरवास ही या लोकगीतातून दिसून येतो. *असं माहेर सुरेख बाई खेळायला मिळतं| अस सासर द्वाड बाई कोंडूनी मारीतं* पूर्वी मुलामुलींची लग्ने लहान वयात व्हायची.... त्यामुळे ही माहेरची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती ती अस्वस्थता गाण्यातून आपणास हमखास जाणवयाची......एखादी अज्जाद,अच्याट सासू जास्त माहेरी जाऊ द्यायची नाही.मग ती आठवण अशा गाण्यातून व्यक्त होत करायची. अशी ही लोकगीते मनाला सुखावणारी असाययी .आता गेले ते दिवस असेच म्हणावेसे वाटते.ज्याच्या त्याच्या वावरात कडब्याची धांडे असायची आता तं धांडे ही पहायला भेटत नाहीत. आम्ही रस्त्यानं अशी गावातून कडब्याची भरलेली बैलबंडी जातांना दिसली रे दिसली की धुरकऱ्याच्या चोरून लपून मागून चढून डावडाव करून दोनतीन धांडे ओढून त्याचे पेरकुंड करून खिशात मस्त रचून रस्त्यानं खात खात जायचो..नाही तं गव्हाणीतले धांडे हुसकून ती उसा सारखी दातांनी फोडायचो. पाहता पाहता सरतेशेवटी भुलाबाईच्या विसर्जनाचा दिवस यायचा. तो दिवस म्हणजे आयुष्यातला सर्वात दुःखदायी असायचा.धांडयाच्या खोपडीत मोठ्या थाटामाटात आपल्या कुटुंबासह विराजमान झालेल्या भुलाबाईचं विसर्जन करायला मन धजावयाचं नाही. नुकताच पावसाळा संपत आल्याने नदीले चांगलंच टोंग्या, मांड्या पाणी हमखास रहायचं.लहान लहान पोरं,पोरी भांवडाचा हात पकडत नदीकाठावर मस्त भुलाबाई टोपलीत घेऊन व भुलाबाई उपाशी राहू नये म्हणून तीच्या संग शिदोरी बांधून आरती करून पाण्यात सोडून द्यायची. आम्ही दोन चार पोट्टे नदीच्या काठावर मगरीसारखे शिदोऱ्या पकडायला तयारीतच रहायचो.. भुलाबाईच्या शिदोऱ्या पकडायले. पोरी आम्हाले बुवाऱ्या वाणाचे,गवशे,नकटे काय-काय नाही त्या शिव्या द्यायची पण खायच्या पुढं कशाचीही पर्वा नसायची.आम्ही दोन चार शिदोऱ्या पकडून मस्त नदीच्या जवळच्या थंडगार गाळावर किंवा झाडाखाली मस्त हाणत बसायचो. त्यामध्ये भजे कुरोळयां,कधी गुळाचे कान्होले,अनारसे चिवडा,आयते, चटणी,पोळी रहायची.शिदोऱ्या खाल्ल्यावर मस्त खरकळीत पाण्यात तासनतास पोहत बसायचो. शेणामातीच्या गीलाव्यानं सारवलेल्या सपरीत तडवावर मस्त संध्याकायी दिवाबत्तीत करून थुंग्या -थुंग्यानं घरोघरी म्हटलेली ही गाणी अजूनही मनाच्या कोपऱ्यात जशीच्या तशी आजही जोपासून ठेवली आहेत. काय मस्त लोकसंस्कृती होती. हल्ली हे सर्व आता विरळ होत चाललं आहे.आता मात्र नाईलाजाने हक्काचा गाव सोडून रोजगाराच्या शोधात शहराकडे पांगलेली लोकं वरून शांत दिसत असली तरी ती नक्कीच शांत नाहीत.शहरात राहूनही ह्या आठवणींच्या इंगळया त्यांच्या मनाला मात्र कायमच्या डसत रायतात, गड्या आपुला गाव बरा यांची प्रकर्षाने आठवण आल्याशिवाय राहत नाही एवढं मात्र खरं. #भुलाबाई चे गाने
भुलाबाई चे गाने - ShareChat

More like this