#नाना पाटेकर फॅन 😍😍😘😘🙏
Happy birthday to you🌹 🎂👏
नाना पाटेकर ७५ वर्षांचा झाला. पडद्यावर आक्रस्ताळा, माथेफिरू , वेडसर, विकृत, खुनशी नाना ७५ वर्षांचा झाला. त्याच पडद्यावर धीरगंभीर, थंड डोक्याचा, विचारपूर्वक पाऊल उचलणारा नाना ७५ वर्षांचा झाला. क्रूर, हलकट उलट्या काळजाचा आणि वेडसर, विकृत, खुनशी म्हणजे 'परिंदा' मधला नाना. आणि क्रूर, हलकट उलट्या काळजाचा पण धीरगंभीर, थंड डोक्याचा, विचारपूर्वक पाऊल उचलणारा नाना म्हणजे 'माफीचा साक्षीदार', 'अंगार' ते 'जंगलबुक' (सिनेमातला) नाना.
नानाने आता व्हिलन यापुढे तरी करू नयेत. वर उल्लखिलेल्या प्रकारची कोणतीही भूमिका असो, नाना छातीत धडकी भरविणार, तो पडद्यावर नको नको करून सोडणार, तो तुमच्या हृदयावर बलात्कार करणार. सर्व संपल्यावर हिटलरने इव्हा ब्राऊनबरोबर आत्महत्या केली. याने 'अंगार' मध्ये नीना गुप्ता आणि अपंग मुलाला आनंदाने विष घातलेलं चॉकलेट तेही तिला सांगून सवरून खायला दिलं. नाना कसं जमवता हे सगळं? एवढा हलकटपणा येतो कुठून? आणि 'सिंहासन'मध्ये स्वतःच्या बायकोचं अफेअर हताशपणे पचवून वर चार पैसे मिळतात म्हणून जयराम हर्डीकरला दगडाने ठेचून मारतोस? नाना जराही लाज नाही का वाटली?
नाना पाटेकरवर बंदी आणावी एवढी घाणेरडी कामं त्याच्याकडून होण्याची शक्यता असताना 'प्रहार' सिनेमा आला. आभाळाएवढे उपकार आहेत नाना पाटेकरचे हिंदी सिनेमावर. सिनेमात मध्यमवयीन अभिनेता 'नायक' असू शकतो हा विश्वास 'प्रहारा'ने दिला. आधीच्या घाणेरड्या भूमिकांमध्ये सिस्टीम 'चालवणारा', नाना आता सिस्टीमने आधी गांजणारा मग तिच्यावर सूड उगवणारा नायक झाला. 'अंकुश'चा 'रवींद्र केळकर' आता अधिक मॅच्युअर्ड झाला होता. त्यानंतर आलेल्या 'क्रांतिवीर'ने सगळं बदलून टाकलं. नानाचा बाप दाखवेलला प्रत्यक्षात परेश रावल त्याच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होता. त्याच्या खुनाने आणि पुढच्या दंगलींनी प्रताप पेटून उठतो. सर्वार्थाने ढिसाळ असणारा हा सिनेमा (अंतिम इच्छा म्हणून जाहीर फाशी, त्यात याचं भाषण हा बावळटपणाचा कळस) भारतीय सिनेमाने ज्या दोन गोष्टी समाजाला दिल्या त्या मनापासून करतो. एक म्हणजे व्यवस्थेविरुद्ध उठणारा नायक, आणि आपल्यावर जबर अन्याय होऊन समजा समोर पर्यायच नसेल तर आपणही असं करू हा किमान विश्वास.
नाना पाटेकरने त्या दशकात दोन सर्वात मोठ्या अभिनेत्यांबरोबर पडदा खाल्ला. एक राजकुमार आणि दुसरा अमिताभ बच्चन. दोघांच्या डायलॉग्ससाठी एकेकाळी पब्लिकने जीव टाकलेला तिकडे नानाच सरळसरळ भाव खाऊन गेला. जाळून मारताना, डोकं फोडताना नानाने भीडभाड बाळगली नाही तिकडे अमिताभला "वह फौजी के लिये ठीक है, तुम जैसे भगौडे की नही" असं सुनावणं हा डाव्या हाताचा मळ.
मराठी घरांमध्ये नाना पाटेकर ठाऊकच होता. 'भालू' हा त्याचा पहिला मोठा रोल. म्हटलं तर हिरोईनच्या साडीला हात घालणं हा मुख्य कामाचा भाग. पण त्याचं अस्तित्व सिनेमाभर जाणवलं. लहानपणी एवढं वाटलं की 'भालू' तिच्या आसपास नसेल तर हा येऊन काहीतरी करून जाईल. आणि घडतंही तसंच. त्यात त्याचे 'भालू'बरोबरचे हाणामारीचे प्रसंग मस्तच झाले होते. सलग काही मिनिटं एक माणूस आणि एक कुत्रा यांच्यातले हाणामारीचे प्रसंग बघितल्यास ऍक्शनच्या बाबतीत मराठी सिनेमा ४५ वर्षांपूर्वी किती पुढे होता हे जाणवेल. जे भालू नसताना नानाचं भय वाटायचं तेच जंगलबुक कार्टून बघताना 'शेरखान' विषयी वाटायचं. हा कधीही कुठूनही येईल ही भीती. नानाचा एवढा सुंदर उपयोग करून घेतल्याबद्दल या मालिकेचे धन्यवाद मानावेत.
मराठी सिनेमाबद्दल चांगलं मत असावं असे प्रसंग फार नाहीत. आणि मराठी अभिनेते तगडेच असतात यावर दुमत नाही. रासवट व्यक्तिमत्व आणि त्यात लोभसपणा आणि बेफाट अभिनय हे मराठी अभिनेत्याचं वैशिष्ट्य. त्याची सर्वात थोर उदाहरणं म्हणजे नाना पाटेकर आणि दुसरा अशोक सराफ.
हे करता करता नाना पाटेकरला विनोदाचीही देणगी आहे हा सर्वात मोठा शॉक होता. (प्रथम संशय राजू बन गया जंटलमनमध्ये आला, त्याचा कोर्टातील प्रसंग) अनेकांना आवडणार नाही पण याचं सगळ्यात खतरनाक कॉम्बो होतं ते म्हणजे 'ब्लफमास्टर'चा चंद्रकांत पारेख. सिनेमा अभिषेकचा होता आणि त्यात रितेश देशमुखही सॉलिड भाव खाऊन गेलेला हे मान्य. पण 'चंदू' हा अभिषेकचा सर्वात मोठा 'डाऊनफॉल' ठरतो (जो रास्ता मैने चुना है, और जहाँ जाने की तुम सोच रहे हो, उसपर आखिर में चंद्रकांत पारेख खडा है). सिंहासन, जंगलबुक, अंगार, परिंदा, भालू मध्ये जे नाना करतो तेच चंद्रकांत पारेख अभिषेक आणि जवळच्या मुलींबरोबर करतो. शेवटी तो 'इमेज इमेज' म्हणून जे ओरडतो त्याचा लॉंगशॉट घेतलाय. पडदा व्यापून टाकणाऱ्या आणि लार्जर दॅन लाईफ असू शकणाऱ्यांना असे लॉंगशॉट भाग्याला येतात. आणि त्यानंतरची त्याची खरी ओळख कळते तो लपून बसण्याचा प्रसंग खाल्लाय त्याने. १९९० च्या दशकात नाना स्टार होता. पुढे २००० च्या दशकात तो अभिषेक असो किंवा जॉन अब्राहम यांच्याबरोबर पडदा खात होता. यात एक बघावं लागेल म्हणजे नाना अनेक ठिकाणी ठिकाणी सामान्य मध्यमवर्गीयच होता पण समोरचे अभिनेते तोलामोलाचे किंवा मग व्यक्तिमत्वात जबर घ्यावे लागायचे (अपवाद शाहरुख). वेलकमचा उदय शेट्टी चंदू पारेखच्या जवळपास जातो. कंट्रोल उदय आणि त्याचा हसण्याचा प्रसंग तर मिम झाला. पण तेच जेंव्हा फिरोज खान येतो तेंव्हा त्याची बॉडी लँग्वेज जी बदलते ती धक्कादायक असते. (everyone is the gangster until the real gangster comes)
नानाला व्यक्तिमत्वाची देणगी नव्हती. सडसडीत देहयष्टी आणि भेदक डोळे. पण स्वतःला 'राखण्यात' जे नानाने श्रम घेतले ते कोणीही अभ्यास करावा असेच आहेत. अनेक लोक त्याचं श्रेय 'प्रहार' आणि लष्करी प्रशिक्षणाला देतात. पण ते करण्यामागे नानाला व्यायामाची आवड होती हे कसं नाकारणार? त्यामुळे व्यक्तिमत्वात पुढे भासदस्तपणा आला. त्याच्या मारामाऱ्या खऱ्या आणि नैसर्गिक वाटत. पण देऊळ सिनेमात एक प्रसंग आहे. सोनाली कुलकर्णी जमिनीवर बसते आणि हा फोनवरून एकदा तिला ओलांडतो. मग ती पायाचा अंगठा पकडते हा त्याहीवरुन उडी मारतो. मग ती त्या आडव्या हातावर अजून एक हात आडवा धरते (लहानपणी हे खेळून तोंड फुटलेले बरेच असतील) हा त्याहीवरुन उडी मारतो. हे सगळं फोनवर बोलताना. साठी उलटली होती आणि हे पडद्यावर चालू असताना नाना पडला असता तर सोनालीचं काय झालं असतं? पण नानाचा फिटनेस ही शंकाही मनात येऊ देत नाही.
आवाज ही नानाची ओळख झाली. निव्वळ आवाज हे शस्त्र म्हणून वापरायचं सौभाग्य माझ्यामते तरी फक्त इतर दोघांना मिळालं. एक अमिताभ बच्चन. दुसरा अमरीश पुरी. डायलॉग्सपायी तर दिलीपकुमारसाठीही लोकांनी जीव टाकला. राजकुमारचा उल्लेख झाला आहेच. पण खर्जातला आवाज ज्याला वर वर पाहता मॉड्युलेशन्स नाहीत पण ती ते डायलॉग्स म्हणायला गेले तरच स्पष्ट जाणवतील. यांचे आवाज खालच्या पट्टीत मोठे होतात. त्यात नुसता 'थ्रो' नसतो तर स्पष्ट शब्दोच्चारही असतात. आज शरद केळकर मास्टर क्लास आहे, अभिषेक बच्चन आहे, थोडा वेगळा पण खर्ज असणारा आशुतोष राणा आहे, सैफ अलीचे उच्चार कमालीचे स्पष्ट असतात, तसाच बोमन इराणी आणि पूर्वी कबीर बेदी (आठवा टायगर्स ऑफ सुंदरबन), रझा मुराद. पण ओमपुरी, अमरीश पुरी आणि द अमिताभ हे यातले खरे हिरे. नाना पाटेकर यांच्यात बसतो. "प्लिज" आणि "सॉरी" सुद्धा हुकुम सोडायच्या शैलीत. "डोन्ट" म्हटल्यावर समोरच्याची हिंमत होऊ नये काही करण्याची. या खर्जाचाही तळ गाठला असेल तर 'गुलाम ए मुस्तफा' मध्ये नमाज अदा करताना. पण हेच करताना जंगलबुकचा १९९२-९३ चा शेरखान आणि २०१६ चा शेरखान नानाच होता हे कसं विसरणार? यशवंतरावाच्या सिनेमात लहान मुलांना गोष्टी सांगणारा प्रेमळ नाना, प्रकाश आमटेंच्या सिनेमातला हताश नाना पुन्हा जंगलबुकचा शेरखान होतो? सहजपणे 'अकेला'चा जीव घेणारा शेरखान नाही तर परिंदा आणि अंगारमधला नाना होता हे माझं ठाम मत आहे.
बरं हे एवढं सगळं असताना मध्येच मूकबधिर माणसाची भूमिका. एका सिनेमात तोच मनिषासमोर खलनायकी नाना तर दुसऱ्या सिनेमात तिचा हेकेखोर बाप जो शेवटी सर्वांसमोर आपल्या आयुष्यभराच्या चुकांची कबुली देतो तेही वाक्य न उच्चारता. भन्साळी काय करून गेलास रे बाबा.
इंद्रकुमारने 'राजा' काढला. परेश रावलची अभिनय क्षमता टायटॅनिक आहे हे दाखवणारा हा सिनेमा होता. त्याआधी बरंच शूटिंग नाना पाटेकरने केलं होतं. काही प्रसंग बघितले आणि इंद्रकुमारला समजलं हे प्रकरण अति गंभीर होत जाणार आहे, त्याला त्रास होऊ लागला. परेश रावळच्या व्यक्तिमत्वाचा वापर जो विनोदासाठी करायचा आहे तो नानाचा करता येणार नाही हे त्याने ताडलं. इंद्रकुमारने नानाला काम न करण्याची विनंती केली. नानाने एकही पैसा न घेता सिनेमा सोडला. 'वॅक्सीन वॉर'चा बलराम भार्गव असलाच होता. प्रत्येकवेळी समोरच्याला दोन ऑप्शन्स देणारा, एक माझं ऐक, दुसरं, तुला दुसरा पर्यायच नाहीये.
हॅप्पी बर्थडे नाना डार्लिंग.
Santosh bachhav.


