काल संध्याकाळी ऑफिसमधून घरी जायला निघालो. डोक्यात दिवसभराच्या कामाचा ताण होता आणि एका महत्त्वाच्या क्लायंट मीटिंगची तयारी सुरू होती. घाईघाईत मी एक रिक्षा पकडली. संपूर्ण प्रवासात मी माझ्या ॲपलच्या महागड्या स्मार्टफोनवर ईमेल्स चेक करण्यात आणि फोनवर बोलण्यात मग्न होतो.
माझ्या सोसायटीच्या गेटवर रिक्षा थांबली. मी खिशातून पाकिटातले पैसे काढून भाडं दिलं आणि डोक्यात असलेल्या विचारांच्या नादात घाईघाईने रिक्षातून उतरलो. लिफ्टमध्ये गेल्यावर अचानक मला जाणीव झाली की माझा मोबाईल माझ्या खिशात नाही. बॅगेत पहिले तेव्हा तिथे पण नाहीये. माझ्या पायाखालची जमीनच सरकली! त्या फोनमध्ये माझा सगळा डेटा, बँक डिटेल्स आणि ऑफिसचे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट्स होते. मी धावतच खाली आलो, पण ती रिक्षा कधीच निघून गेली होती. मला रिक्षाचा नंबरही आठवत नव्हता. मी वॉचमनच्या फोनवरून माझ्या नंबरवर कॉल करू लागलो, पण फोन सुद्धा उचलला जात नव्हता. मीच ऑफिसमध्ये असताना मोबाईल सायलेंटवर ठेवला होता, त्यामुळे उचलला गेला नसावा.
मी पूर्णपणे हताश झालो होतो. इतका महागडा फोन परत मिळण्याची शक्यता जवळजवळ शून्य होती. मी पोलिसात तक्रार करायचा विचार करत होतो. साधारण अर्ध्या तासाने, तीच रिक्षा माझ्या सोसायटीच्या गेटवर परत आली. त्यातून एक साधारण ४०-४५ वर्षांचे रिक्षाचालक दादा उतरले. त्यांच्या हातात माझा तोच चकचकीत स्मार्टफोन होता.
मी धावत त्यांच्याकडे गेलो. माझा जीव भांड्यात पडला. मी त्यांचे आभार मानू लागलो आणि पाकीट काढून त्यांना बक्षीस म्हणून ५०० रुपये देऊ लागलो.
त्यांनी नम्रपणे हात जोडले आणि म्हणाले, "नको साहेब, पैसे नकोत. मगाशी तुम्ही उतरलात आणि पुढचं भाडं मिळालं. त्या प्रवाशाला बसवताना मला सीटवर हा फोन दिसला. तुमचा चेहरा आणि सोसायटी आठवत होती, म्हणून परत आलो."
मी म्हणालो, "अहो दादा, हा फोन खूप महागडा आहे. तुम्ही परत आणून दिलात, हेच खूप मोठं आहे. प्लीज, हे पैसे ठेवा."
तेव्हा त्या रिक्षाचालकाने जे उत्तर दिलं, ते ऐकून मी स्तब्ध झालो. त्यांनी आपला स्वतःचा जुना, स्क्रीन फुटलेला साधा कीपॅड वाला फोन खिशातून काढला आणि म्हणाले, "साहेब, माझा स्वतःचा फोन गेले वर्षभर असा फुटलेला आहे. नवीन घ्यायची ऐपत नाही. आज जर मी हा फोन चोरला, तर घरी जाऊन माझ्या पोराच्या डोळ्यात डोळे घालून त्याला 'खोटं बोलू नकोस, चोरी करू नकोस' हे संस्कार कसे शिकवू? साहेब, गरिबीत जगतोय, पण इमानाने जगतोय. हीच आमची श्रीमंती."
त्यांच्या त्या वाक्याने मला खूप मोठी चपराक लगावली. आपण सुशिक्षित लोक अनेकदा छोट्या छोट्या फायद्यासाठी तत्त्वांशी तडजोड करतो, पण एक कमी शिकलेला रिक्षाचालक मात्र आपल्या संस्कारांशी प्रामाणिक होता.
परिस्थिती कितीही गरिबीची असली, तरी प्रामाणिकपणा सोडू नका. कारण पैसा आज आहे, उद्या नाही. पण तुमची सचोटी आणि चारित्र्य हीच तुमची खरी ओळख असते. जगात अजूनही चांगली माणसं आहेत, म्हणून हे जग चाललंय.🙏
#☺️सकारात्मक विचार #☺️उच्च विचार #🙂माणुसकीच नात

