ShareChat
click to see wallet page
search
#कोजागिरी पौर्णिमा #🌕कोजागिरी पौर्णिमा🥛 कोजागरी पौर्णिमा.. पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री "को जागर्ति" ( म्हणजे "कोण जागत आहे" ) असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. आश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे. बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे , त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. उपोषण , पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र , बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव - पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात. ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र , स्कंद , नंदीश्वर , ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी , मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण , हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी. विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा - अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते. पौराणिक कथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो , ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये ( व्रजमंडळ ) भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा ( महारासलीला ) केली होती. वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.श्रीकृष्ण आणि राधा यांची विशेष उपासना केली जाते. कोजागरी पौर्णिमा मसाला दूध या दिवशी दूध आटवून त्यात केशर , पिस्ते , बदाम , चारोळी , वेलदोडे , जायफळ , साखर वगैरे गोष्टी घालून , लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची "आश्विनी" साजरी करतात. कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात , नाचणी , वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा . या दिवशी नवीन तांदळाचा भात , खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात, अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली दिसते. घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमे ला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य , भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमे ला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. ( नवेचे अनेकवचन नवी ) म्हणजे आंब्याच्या पानात भात , वरी , नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी.) दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्यावरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते. लक्ष्मीपूजन श्लोक.. सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम् | परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये || भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी || सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते || नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये | या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् || ॐ महालक्ष्म्यै नम: प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि या श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमा व्रत कथा.. प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. ~~ डॉ. सौ. सुवर्णा ताई सुधीर सूत्रावे ! 🌹🙏|| ॐ श्री तुळजाभवानी देव्यै नमः ||🙏🌹 संकलन : मल्हारीदास
कोजागिरी पौर्णिमा - ShareChat