@chintulocal
@chintulocal

Sandeep Kumar

nothing

#

🙏भक्ती स्टेट्स

२२ जुलै गुरू आपल्याला अंतिम सुख दाखवितात. एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती. 'ती काढण्याकरिता मी आत उडी मारतो,' असे तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, 'तू असे करू नकोस, आत पडून बुडून जाशील.' तरीपण तो ऐकेना, एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले, पण तो ऐकेना, मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले. आता, मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का ? "एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला, त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते ?" असे म्हणाल का ? नाही ना ? तर मग गुरू करी काय करीत असतो ? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते; म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकले, तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. आपण तर चांगले शिकले-सवरलेले; त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर; तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरूने सांगितले, 'लग्न करू नकोस', तर आपण 'लग्न कधी होईल' म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो. आणि शेवटी तर 'गुरूला समजतच नाही' असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते ! सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानीत असतो. पण अंतिम सुख काय, हे गुरूला कळत असते. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो. तेव्हा, आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरू आज्ञा करतो म्हणजे काय करतो ? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्‍न करतो. भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही. ती काय, सहज दूर करता येतात; पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ति भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात. एकाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे, त्याप्रमाणे, संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे, ते भक्तिला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते. २०४. प्रापंचिक जन विषयप्राप्तीसाठी झटतात. पण विषय  मागूनही जो देत नाही, त्यापासून परावृत्त करतो, तो संत.  #🙏भक्ती स्टेट्स
155 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

🙏भक्ती स्टेट्स

२१ जुलै वेदाप्रमाणे नामही अनादी, अनंत, अपौरुषेय आहे. शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामद्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यांपैकीं काहीच साध्य होणे शक्य नसल्याने, भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की, साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते; आणि तेरा कोटी जप केला असता, भगवंताचे दर्शन होते. मला आपण महत्त्व देऊ नका; पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो, ते ज्ञानेश्वरमहाराज, एकनाथमहराज, तुकाराममहाराज, आणि समर्थ रामदासस्वामी, यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील, हे शक्यच नाही. वेदांना जे परमात्मस्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्‌रूपाने जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून 'नाम घ्या' असे सांगितले. वेद भगवंताचे वर्णन करतात. नामदेखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी 'हरिः ॐ' असते, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि, तसे नाम अनादि. जसा वेद हा अपौरुषेय, तसे नाम हे अपौरुषेय. जसा वेद हा अनंत, तसे नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले, म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहाराविहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ॐ चा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की, आपण नाम घेत जावे. किंबहुना, आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपले लक्ष शब्दांकडे असावे. आपण नेमके तेवढेच विसरतो. नाम घेणार्‍या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की, 'मी नाम घेतो आहे' हे सुद्धा विसरून जा. २०३. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा  उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते.  #🙏भक्ती स्टेट्स
275 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

🙏भक्ती स्टेट्स

२० जुलै नामांतच राहे समाधान । ही सद्‌गुरूची आहे खूण ॥ रामापायी ठेवावे मन । त्यासी कर्तव्य नाहीं उरले जाण ॥ देहभोग आजवरी नाही सुटला कोणाला । त्याचा त्रास मात्र नाहीं रामभक्ताला ॥ तुम्हाला आता करण्याचेंच नाही काही । भाव ठेवा रामापायीं ॥ नामांतच राहे समाधान । ही सद्‍गुरूची आहे खूण ॥ रामास जावें अनन्य शरण । कृपा करील तो दयाघन ॥ देह सोडावा प्रारब्धावर । ज्या ज्या वेळी जें जें होईल तो मानावा आनंद ॥ दृश्याते नाहीं मानूं सत्य । रामरूपीं ठेवावें चित्त ॥ विषयासी नाही देऊं थारा । दया येईल रघुवीरा ॥ नाहीं देवाजवळ मागूं दुजें जाण । तुमचे नामीं लागो मन । ऐसें प्रार्थिता जो झाला । राम कृपा करील त्याला ॥ नाहीं भंगूं द्यावें समाधान । रामापायीं ठेवावें मन ॥ लोभ्याच्या मनांत जसें वित्त । तसें साधकाचें नामांत चित्त ॥ एवढे ज्यानें केलें काम । त्याला नाहीं रामाचा वियोग ॥ पाण्यांवाचून जसा मासा तळमळतो । तसें नामाशिवाय व्हावें मन ॥ एक मानावी आज्ञा प्रमाण । नाहीं याहून दुसरें साधन आण ॥ साधनाच्या आटाआटी । नाही देह करू कष्टी ॥ रामावांचून नाही कोणी सखा । त्याला नाहीं कोठें धोका ॥  प्रपंची ज्याचा राम सखा । भय चिंता दुःख नाहीं देखा ॥ रामसेवेपरतें हित । सत्य सत्य नाहीं या जगांत ॥ मनानें होऊन जावें भगवंताचे । त्यानें खास केलें सार्थक जन्माचे ॥ सर्व कर्ता राम । हा भरवसा ठेवावा ठाम ॥ राम कर्ता हा ठेवितां विश्वास । काळजीचें कारण उरत नाहीं खास ॥ रामरायाचें सान्निध्य राखता । भय, चिंता, शोक, यांची नाही वार्ता ॥ सतत करावें नामस्मरण । सर्व इच्छा राम करील पूर्ण ॥ नामाचें चिंतन, भगवंताचें ध्यान, गुरुआज्ञा प्रमाण । तीच गुरुपुत्राची आहे खूण । नाहीं यावांचून दुसरें स्थान । जिथें राहे समाधान ॥ रामापायीं व्हावें लीन । याहून नाहीं दुसरें लिहिणें जाण ॥ आतां याहून दुजे नाही करणें काहीं । असा भाव ज्यानें ठेविला हृदयीं । त्याला राम नाहीं राहिला दूर ॥ रामाविण न मानावे हित । त्यानेंच जोडेल भगवंत ॥ नाहीं करूं देहाचा कंटाळा । राम ठेवील त्यांत राहावें सदा । जे जे होतील देहाचे हाल । ते ते परमात्म्यापासून आले असें जाणावें ॥ नाहीं करूं काळजीला । मी नाही सोडलें तुम्हांला ॥ ज्याची वाटते महति । त्याचेंच चिंतन होय चित्तीं ॥ रामावांचून न ठेवा दुजा भाव । चित्तास येईल तेथेंच ठाव ॥ देहासकट माझा प्रपंच जाण । हा रामा तुला अर्पण । ऐसें वाटत जाणें चित्तीं । कृपा करील रघुपति ॥ सर्व ठिकाणीं पाहावें अधिष्ठान । तेणें मिळेल मनास समाधान ॥ २०२. रामापायीं ठेवा मन । नाम घ्यावें रात्रंदिन॥ #🙏भक्ती स्टेट्स
337 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

🙏भक्ती स्टेट्स

१९ जुलै साधनाची चार अंगे. मी जेव्हा भजन करीत असे, त्या वेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसे तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे, आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी तुम्हाला सांगतो आहे. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावे आणि ते घालविण्याचा प्रयत्‍न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून, दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषाकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसर्‍याच्या डोळ्यातले कुसळसुद्धा मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते, हेच चुकते. आपण दुसर्‍याचे दोष सांगू नयेत, आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस, आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणे दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असे तुम्ही करीत जा, म्हणजे तीन महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल. चित्तशुद्ध होण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत ? आपण पाहू गेलो तर संत आपल्याला ओळखता येतील का ? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का ? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच संत होईल. समर्थांनी सांगून ठेवले आहे की, जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात, तेच ते होत असे समजावे. त्यांनी चार गोष्टी करायला सांगितल्या आहेत : एक, निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी. त्यानेच निर्गुणरहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान, कलियुगात यथाशक्ति अन्नदान करीत जावे. त्याचे महत्त्व फार आहे. चौथी गोष्ट म्हणजे भग्वन्नामस्मरण अखंड ठेवणे. परमात्मप्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर, काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटते, त्यांना गुरू भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी ? गुरू एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते, त्यानेच गुरू भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरुआज्ञेपरते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ, आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानीमनीही येत नाही. २०१. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे. #🙏भक्ती स्टेट्स
161 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

🙏भक्ती स्टेट्स

१८ जुलै साक्षित्वाने राहाणार्‍याला दुःखाची बाधा नाही. देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे 'मी देही आहे' ही भावना आहे तोपर्यंत, काळजी राहणारच. काळजी मनातून असते. जोवर संशय फिटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, तोवर काळजीही मनाला सोडीत नाही. कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे. पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल, भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही. मनुष्यजन्म येऊनही भगवंताची प्राप्ती नाही झाली, तर जिवाचे फार नुकसान आहे. भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे. एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो, आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत, तर त्या संकटांची भिती नाहीशी करतात. संकटापेक्षा संकटाची भितीच आपल्याला फार घाबरवून सोडते. 'आपल्याला हे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या,' असा संतांचा एकच हेतू असतो. संत विषयावर मालकी गाजवितात. जगाला जिंकणे एक वेळ सोपे, पण स्वतःला जिंकणे कठीण आहे. संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात. संत साक्षित्वाने जगात राहतात, आणि साक्षित्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही. संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून, आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत. वास्तविक, संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो, त्याचे संशय आपोआप दूर होतात. जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे. समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते. म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे, त्याने फार धडपड करू नये.जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावे. कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत; ते तिथेच ठेवावेत. घरातले वातावरण शुद्ध आणि निःसंशयाचे असावे. भोळेपण एकप्रकारे चांगले; ती भाग्याची गोष्ट आहे. जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असते; जसे कल्याणस्वामींच्या अंगी होते. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे; पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता, भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते. त्या वेळी शरीरसुद्धा बरे राहायला, आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलांत मिसळावे, थट्टा-विनोद करावा; काहीही करावे पण आनंदात राहावे. ज्याचा आनंद कायम टिकला, त्याच्याच जन्माचे सार्थक झाले. २००. समाधान ही परमेश्वराची देणगी आहे. ती मिळविण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय. #🙏भक्ती स्टेट्स
477 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

🙏भक्ती स्टेट्स

१७ जुलै गुरूने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे. एकदा एक बाई बाळंतीण झाली, आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली, तेव्हा मुलाला ही माझी आई, आणि त्या बाईला हा माझा मुलगा, हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो आहोत. खरे म्हणजे, आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत; ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरतो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो. पण विषयच जरे खोटे, तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार ? आणि जे सुख मिळते, तेही अंती खोटेच ठरते ! म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ति करता येते. जिथे विषयविरक्ति झाली तिथेच भक्तिला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो. तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो. म्हणून, तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. गुरूने सांगितल्या शिवाय जे जे साधन कराल, ते ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले, तरी ते व्यर्थ जातील. कारण, गुरू व्यतिरिक्त जी खटपट, ती फारशी उपयोगी नसते. गुरूने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरूला गौणपणा दिल्यासारखे झाले ! वास्तविक पाहता गुरू हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे, ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो, आणि गुरू सांगेल तेच साधन खरे वाटू लागते. गुरू तरी नाम हेच सत्य असे सांगतो, आणि नामस्मरणाला आणखी दुसर्‍या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय, हे अक्षरशः खरे आहे. गुरूने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो, त्यानेच गुरुआज्ञा प्रमाण मानली असे होते, आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणाला तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा. आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळविण्यासाठी धडपड करतो, तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही. १९९. सद्‍गुरुआज्ञाप्रमाण । हेच साधनांतील साधन जाण ॥ #🙏भक्ती स्टेट्स
344 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

🙏भक्ती स्टेट्स

१६ जुलै गुरुआज्ञापालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही. परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे. मध्येच दुसरा मार्ग घेतला, तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले, तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला सोडीत नाही ही गोष्ट निराळी. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले, त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरूवर सोपवून तुम्ही मोकळे झाला, गुरुआज्ञेशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही. पण तुम्हाला असे वाटते कुठे ? विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय, दोन्ही त्याज्यच; त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याज्यच. मी कोण हे आधी जाणले पाहिजे; परमात्मा कोण ते मग आपोआपच कळते. दोघांचेही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे, आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण 'जाणतो' म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते; त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मस्वरूप व्हायला ? यालाच 'साधू होऊन साधूस ओळखणे' किंवा 'शिवो भूत्वा शिवं यजेत्' असे म्हणतात. आता, कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत. ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघातरूपाने उद्‍भूत होतात; नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते. म्हणून परमात्मरूपाला विरोधी असे संस्कार घालवून, आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे. जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो, तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही. देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे; त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे. याहून दुसरे काय मिळवायचे ? मी सुखाचा शोध केला, आणि ते मला सापडले. म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग म्हणजे, भगवंताचे अनुसंधान होय. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही समाधानी रहा. जे मी सुरुवातीला संगितले तेच मी शेवटी सांगतो : तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरे काय मिळवायचे ? १९८. आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे. न होईल त्याचा राम कैवारी आहे. #🙏भक्ती स्टेट्स
144 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..