@sp35
@sp35

🌿🌿 आयुर्वेद संजीवनी 🌿🌿

आरोग्य विषयक माहितीसाठी फॉलो करा.

#

⚕️आरोग्य

♦️♦️ स्त्रीसंप्रेरके स्त्रीसंप्रेरके चार प्रकारची असतात. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, गर्भसंप्रेरक, दूधसंप्रेरक असे मुख्य प्रकार सांगता येतील. यांतील गर्भसंप्रेरक गरोदरपणाच्या काळात व दूधसंप्रेरक स्तनपानाच्या सुरुवातीस काम करतात आणि इतर वेळी ती नसतात. गर्भसंप्रेरक सुरुवातीच्या काही आठवडयांत स्त्रीबीजांडातून तर नंतरच्या महिन्यात वार व गर्भाच्या आवरणातून येते. इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही मासिक पाळीसाठी व स्त्रीत्वाच्या इतर शरीरक्रियांना आवश्यक असतात आणि ती स्त्रीबीजांडातून येतात. दोन्ही बाजूंची बीजांडे काढून टाकली तर स्त्रीत्वाची अनेक लक्षणे व क्रिया बंद पडतात. म्हणून निदान एका बाजूचे तरी स्त्रीबीजांड असणे आवश्यक असते. पाळी थांबल्यावर स्त्रीबीजांडातून ही संप्रेरके पाझरण्याचे प्रमाण कमी होते, पण पूर्ण थांबत नाही. स्त्रीसंप्रेरकाची रक्तातील पातळी मासिक चक्राप्रमाणे थोडी बदलते आणि तेवढया फरकानेही काही स्त्रियांना त्रास होतो. उदा. मासिक पाळीच्या आधी काही स्त्रियांना 'पाळीआधीचा त्रास' जाणवतो. पाळी कायमची थांबताना होणारा त्रास हा बहुतांशी स्त्रीसंप्रेरकांच्या घटत्या प्रमाणामुळे होतो. स्त्रीसंप्रेरके कृत्रिमरित्या बनवता येतात व स्त्रीजननसंस्थेच्या निरनिराळया तक्रारींमध्ये यांचा उपयोग होतो. हा उपयोग कसा होतो हे थोडक्यात पाहू. पाळीच्या चक्रामध्ये मासिक स्रावाच्या चार दिवसांनंतर रक्तातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचे प्रमाण हळूहळू वाढू लागते. दोन पाळयांच्या साधारण मधोमध बीजनिर्मिती होते. त्यानंतर हे प्रमाण हळूहळू घटू लागते. स्त्रीसंप्रेरकांचे प्रमाण ठरावीक पातळीच्या खाली गेले, की गर्भपिशवीच्या आत तयार झालेले अस्तर एकसंध राहू शकत नाही, ते टाकून दिले जाते व परत पाळी येते. म्हणूनच पाळीच्या चक्रातील अनेक बिघाडही कृत्रिम संप्रेरके वापरून दुरुस्त करता येतात. उदा. पाळी लवकर लवकर येणे, अंगावरून अतिशय कमी किंवा जास्त जाणे,अनियमित पाळी, दोन पाळयांच्या मध्ये अंगावरचे जात राहणे, इत्यादी अनेक प्रकारांमध्ये या कृत्रिम संप्रेरकांचा औषध म्हणून उपयोग होतो. 🌱 पाळणा लांबवण्यासाठी पाळणा लांबवण्यासाठी ज्या गोळया वापरतात तीही कृत्रिम संप्रेरकेच असतात. या गोळया पाचव्या दिवसापासून 21दिवसांपर्यंत घेतल्यास स्त्रीबीजनिर्मिती होत नाही व बीजरहित पाळी येते. यासाठी जरा जास्त शक्तीच्या गोळया वापरल्या जातात. त्यामुळे संप्रेरकांच्या शरीरातील नेहमीच्या पातळीपेक्षा अधिक पातळी गाठली जाते. या पातळीच्या फरकावरच बीजांडातून स्त्रीबीज बाहेर पडणे अथवा न पडणे अवलंबून असल्याने या संततीप्रतिबंधक गोळयांनी स्त्रीबीज बाहेरच पडत नाही व ते मासिक चक्र 'निर्बीज' जाते हा उपाय जवळजवळ शंभर टक्के हमखास आहे, पण यात अनेक प्रकारे काळजी घ्यावी लागते. या स्त्रीसंप्रेरकांमुळे रक्तदाब वाढणे, वजन वाढणे, हृदयावर ताण, रक्तात गाठी होणे, स्तनांचा कर्करोग वाढणे, इत्यादी त्रास संभवतात. म्हणून या गोळया सरसकट देण्याऐवजी संबंधित स्त्रीची नीट तपासणी करूनच या गोळया दिल्या गेल्या पाहिजेत. एवढी काळजी कुटुंबनियोजन कार्यक्रमात अद्याप घेतली जात नाही. इंजेक्शनावाटे प्रोजेस्टेरॉनचा मोठा डोस टोचण्याचे तंत्र उपलब्ध आहे. ही इंजेक्शने घातक असल्याची दाट शक्यता असल्याने पाश्चात्त्य देशांत यावर बंदी आहे. असे इंजेक्शन एकदा घेतल्यावर त्याचा तीन-चार महिने परिणाम टिकतो व त्यानंतर पाळी येते. असे करणे वैद्यकीयदृष्टया निसर्गाविरुध्द तर आहेच, पण गोळयांनी त्रास होत असेल तर जशा गोळया बंद करता येतात तसे इंजेक्शनच्या बाबतीत शक्य नसते. 🌱 गैरवापर या संप्रेरकांचा वापर गर्भपातासाठीही गैरसमजुतीने केला जातो. पाळी लांबल्यावर'पाळीच्या गोळया' म्हणून या संप्रेरकांच्या गोळया दिल्या आणि खाल्ल्या जातात. प्रत्यक्षात गर्भ राहिल्याने पाळी लांबलेली असेल तर ती या गोळयांमुळे येत नाही. पाळीच्या चक्रातील इतर काही बिघाडांमुळे पाळी लांबली असेल किंवा मूल अंगावर पीत असेल तरच लांबलेली पाळी या गोळयांमुळे येते. पण गर्भ राहिल्यामुळे लांबलेली पाळी गोळयांमुळे येत नाहीच पण गर्भावर विकृत परिणाम होण्याचीही शक्यता असते. म्हणून पाळी लांबल्यास, दिवस आहेत की नाहीत याची खात्री झाल्याशिवाय (पाळी लांबल्यावर 2 दिवसांत लघवी तपासणी करून हे ठरवता येते.) या गोळया वापरू नयेत. अशा गैरवापरामुळे या गोळया आणि इंजेक्शनांवर आता कायद्यानेही बंदी आलेली आहे. #⚕️आरोग्य
1.1k जणांनी पाहिले
14 दिवसांपूर्वी
#

⚕️आरोग्य

गलग्रंथी (थॉयरॉईड) थॉयरॉईड (गलग्रंथी) ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी स्वरयंत्राच्या खालच्या बाजूस असते. गलग्रंथीतून थॉयरॉक्झिन संप्रेरके निर्माण होतात. यासाठी आयोडीन लागते. आयोडीन हे द्रव्य समुद्राच्या पाण्यात, समुद्री अन्नात (मासे, वनस्पती) व भूगर्भातल्या पाण्यात (थोडे प्रमाण) आढळते. डोंगरी भागात व समुद्रापासून जास्त आत असलेल्या भू भागात आयोडीनचे प्रमाण फारच कमी असते. आयोडीनची कमतरता असलेल्या अशा प्रदेशातील लोकांना गलगंड (गलग्रंथीची वाढ) होतात. याबद्दल नंतर आपण वाचणारच आहोत. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात आयोडीन कमतरता आढळते. थॉयरॉक्झिन हे अत्यंत महत्त्वाचे संप्रेरक आहे. शरीरातील रासायनिक घडामोडींवर त्याचे नियंत्रण असते. शरीरातील रासायनिक क्रियांचा वेग यावर अवलंबून असतो. पेशीपेशींमध्ये होणारे श्वसन म्हणजे प्राणवायू, कार्बवायू यांची देवाणघेवाण यामुळेच होते. तसेच शरीराची वाढ व इतर अनेक रासायनिक घडामोडींवर या संप्रेरकांचे नियंत्रण असते. याच्याच जवळ आणखीही एक ग्रंथी पॅरॅथॉयरॉईड - असते आणि ही ग्रंथी हाडांची वाढ,रक्तातले चुन्याचे प्रमाण नियंत्रित करते. थॉयरॉईड जास्त प्रमाण झाले तर ? या संप्रेरकाचे रक्तातील प्रमाण वाढले तर हातापायांना घाम सुटणे, थरथर, हृदयाची गती वाढणे (धडधड), शरीराचे तपमान वाढणे, डोळे 'मोठे'दिसणे, इत्यादी दुष्परिणाम जाणवतात. गलग्रंथीचा आकारही वाढू शकतो. वेळीच आजार ओळखून उपचार करणे महत्त्वाचे असते. मात्र हा आजार सौम्य प्रमाणात असेल तर ओळखणे अवघड असते. तज्ज्ञ डॉक्टरच याची शहानिशा करू शकेल. आयोडीनचे विशिष्ट औषध/ शस्त्रक्रिया, इत्यादी उपायांनी हा आजार आटोक्यात आणता येतो. थॉयरॉईड संप्रेरकाचे प्रमाण कमी झाले तर ? थॉयरॉक्झिन संप्रेरकाचे प्रमाण कमी झाले तर थॉयरॉक्झिन संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील रासायनिक घटकांचा वेग मंदावतो. बाळाच्या वाढीच्या काळात हा आजार झाला असेल तर वाढ कमी होते. प्रौढपणी थायरॉईड हार्मोन कमी पडल्यास याची कारणे अनेकविध असतात. हा आजार चाळीशीच्या स्त्रियांना होतो. मात्र त्याचे कारण नीट कळलेले नाही. याचबरोबर इतर अनेक कारणे आहेत. उदा. आयोडीन कमतरतेमुळे थायरॉईड हार्मोन कमी पडणे. लक्षणे याची लक्षणे-चिन्हे प्रत्येक शरीरसंस्थेवर उमटतात. त्वचा-कोरडी, निस्तेज, केस गळणे. पचनसंस्था - बध्दकोष्ठ रक्ताभिसरण संस्था - रक्तदाब थोडा वाढणे, दम लागणे, थंडी वाजणे, नाडी थोडी सावकाश चालणे. चेतासंस्था - मानसिक थकवा, विचारांचा वेग मंदावणे, झोपाळूपणा, शारीरिक हालचाली सावकाश होणे. मूत्रसंस्था - लघवी कमी होणे. स्त्री जननसंस्था - पाळी अनियमित होणे. स्त्रीबीज न सुटणे वजन वाढणे - स्थूलता एकूणच थायरॉईड कमतरतेमुळे शरीरात सर्वत्र दुर्बलता येते. हा आजार लवकर कळून येत नाही, त्याला काही महिने लागू शकतात. नवजात बाळांना थॉयरॉईड कमतरता नवजात बाळांना थॉयरॉईड कमतरता असल्यास पुढीलपैकी लक्षणे-चिन्हे दिसतात. जन्मानंतर 2-3 दिवसात येणारी कावीळ जास्त टिकणे. जीभ जाड व मोठी असणे. बेंबीजवळ हर्नियाचा फुगवटा बाळ दूध नीट ओढत नाही. त्वचा कोरडी पांढरट वाटते. बाळ जास्त झोपाळू असते. बाळाचा विकास मंद होतो. सर्व टप्पे लांबतात. मतिमंदत्व वेळीच उपचार न झाल्यास उंची नीट वाढत नाही. थॉयरॉईड कमतरतेचे निदान करण्यासाठी आपण सावध आणि सजग असले पाहिजे अशी लक्षणे दिसणारी स्त्री किंवा बाळ दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरकडून उपचार करून घेणे आवश्यक आहे. यासाठी वेळीच पाठवणे आवश्यक आहे. रक्ततपासणीत थायरॉईड संप्रेरकांचे प्रमाण समजते. त्यावरून नक्की रोगनिदान करता येते. याचे उपचार (संप्रेरक गोळी) अगदी कमी खर्चात होतात. मात्र आयुष्यभर उपचार घ्यावेच लागतात. उपचार सुरु केल्यावर 2-3 महिन्यांत पुष्कळ लक्षणे कमी होतात. #⚕️आरोग्य
1.7k जणांनी पाहिले
29 दिवसांपूर्वी
#

⚕️आरोग्य

🌱🌱 पिटयुटरी ग्रंथी ही ग्रंथी डोक्याच्या कवटीत मेंदूच्या खाली एका सुरक्षित कप्प्यात असते. यातून अनेक प्रकारची संप्रेरके तयार होतात. वाढ-संप्रेरक हे वाढीसाठी आवश्यक असते. दूध संप्रेरक (प्रोलॅक्टीन) हे प्रसूत झालेल्या मातेच्या स्तनातून दूध सुटण्यास प्रेरणा देते. यातील इतर सर्व संप्रेरके शरीरातील इतर रसग्रंथींच्या (गलग्रंथी, स्त्रीबीजांड, ऍड्रेनल ग्रंथी) कामावर नियंत्रण ठेवतात. म्हणजे पिटयुटरी ही शरीरातील जवळजवळ मुख्य संप्रेरक ग्रंथी आहे. पिटयुटरी ग्रंथीतून पाझरणा-या वाढ संप्रेरकांचे प्रमाण जास्त असेल तर शरीराची वाढ जास्त होते. यामुळे जास्त उंची, मोठा चेहरा व जबडा, हाताचे व पायाचे मोठे पंजे अशा खाणाखुणा दिसतात. याउलट लहानपणीच वाढ संप्रेरक कमी पडल्यास उंची कमी, चेहरा लहान, लहान जबडा अशा खाणाखुणा दिसतात. वाढ संप्रेरक कमी किंवा जास्त असेल तर उपाय करता येतात. मात्र आजार वेळीच आटोक्यात आला पाहिजे. या आजारांचे प्रमाण फारसे नाही. 🌱🌱 पिटयुटरी ग्रंथीचे काम सहज माहितीसाठी आपण दूधसंप्रेरकाचे काम पाहू या. गरोदरपणात स्तनांची वाढ होतच असते. दूधसंप्रेरकाने स्तनातील दूध निर्माण करणा-या भागाची वाढ होते व चरबीही वाढते. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीनंतरच स्तनातून स्त्राव यायला सुरुवात होते. बाळंतपणानंतर लगेच दूध बाहेर पडण्याची क्रिया होणे आवश्यक आहे. एकदा सुरू झाल्यावर मग ही क्रिया प्रत्येक स्तनपानाच्या वेळी आपोआप होते. बाळाला अगदी पहिल्यांदा स्तनपान देताना बाळाचे ओठ बोंडाला लागून चेतासंस्थेतर्फे हा चोखण्याचा संदेश पिटयुटरी ग्रंथीपर्यंत पोहोचतो व त्यातून दूधसंप्रेरक पाझरते. त्याचा परिणाम प्रत्यक्ष दुग्धजनक पेशींवर होऊन दूध यायला सुरुवात होते. (बाळंतपणाआधी मात्र ही क्रिया होऊ शकत नाही). बाळंतपणानंतर लवकरात लवकर म्हणजे चार-सहा तासांत ही घटना घडणे फायद्याचे असते. जेव्हा हे घडत नाही तेव्हा स्तनपान सुरूच होत नाही किंवा दूध लवकर उतरत नाही. स्त्रीबीजांडाचे कामकाज चालण्यासाठीही पिटयुटरीतून अनेक संप्रेरके येतात. या संप्रेरकांमुळे स्त्रीबीज तयार होते, ते बाहेर पडते, शिवाय आणखी काही महत्त्वाची कामे होतात. यामुळे मासिक पाळीचे चक्र चालू राहते. #⚕️आरोग्य
576 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

⚕️आरोग्य

🌱🌱 संप्रेरके व संप्रेरक विकार शरीरात अनेक प्रकारच्या ग्रंथी आहेत. त्यांत मुख्य प्रकार दोन आहेत. पहिला प्रकार म्हणजे तयार होणारा रस नळीवाटे आणून सोडणा-या ग्रंथी उदा. लालोत्पादक पिंड, स्वादुपिंडाचा काही भाग, यकृत, इ. या ग्रंथींतून तयार होणारे रस 'स्थानिक' स्वरुपाची कामे करतात. (उदा. लाळेमुळे पचनाची सुरुवात होणे पित्तरसामुळे आतडयात स्निग्ध पदार्थाचे पचन होणे, इ.) ग्रंथींचा दुसरा प्रकार म्हणजे अशी नळी नसलेल्या ग्रंथी. यांचा रस सरळ रक्तात मिसळतो. या ग्रंथींतून किती रस पाझरावा याचे नियंत्रण रक्तातील रासायनिक घडामोडींवर व चेतासंस्थेच्या आदेशावर अवलंबून असते. 🌱 संप्रेरक या दुस-या प्रकारच्या ग्रंथींमध्ये तयार होणा-या रसांना 'संप्रेरक' रस म्हणता येईल. कारण या रसांमुळे शरीरातील अनेकविध क्रियांचे प्रेरण व नियंत्रण होते. या संप्रेरकांचे काम अगदी विशिष्ट असते. उदाहरणार्थ, पुरुषसंप्रेरकांमुळे 'पुरुषी लक्षणे' दिसतात. थायरॉईड किंवा गलग्रंथीतून येणारी संप्रेरके शरीरातल्या अनेक रासायनिक घडामोडींवर नियंत्रण ठेवतात. पिटयुटरी या मेंदूखालच्या ग्रंथीतून येणा-या संप्रेरकांमुळे शरीराची वाढ होते. स्त्रीबीजांडातून येणा-या संप्रेरकांमुळे स्त्रीत्वाची लक्षणे, गर्भधारणा, इत्यादी गोष्टी शक्य होतात. आपल्याला संप्रेरकांच्या अस्तित्वाची जाणीव सहसा होत नाही. जेव्हा संप्रेरकांचे प्रमाण कमीजास्त होऊन शरीरात उलथापालथ होते तेव्हाच ही जाणीव होते. हे बदल अचानक होतात किंवा हळूहळू दिसतात. पण संप्रेरकाच्या पातळीतल्या बदलांचे परिणाम निश्चितपणे खूप दूरवर होतात. काही संप्रेरके आता तयार करता येतात. आता संप्रेरकांच्या कामांची यादी जरा पाहू या. 🌱 संप्रेरक विकार संप्रेरके म्हणजे रासायनिक पदार्थ असतात. त्यांचे काम अगदी विशिष्ट प्रकारचे असते. संप्रेरकांची रक्तातील पातळी अगदी सूक्ष्म आणि काटेकोर असते. त्यात थोडा फरक पडला तरी त्या त्या कामावर दूरगामी परिणाम होतात. काही संप्रेरके वाढीच्या कामासाठी आवश्यक असतात. उदा. पिटयुटरीमधून येणारे 'वाढ संप्रेरक'(ग्रोथ हार्मोन), तसेच गलग्रंथीतून येणारे थायरॉक्झिन. वाढीच्या काळात यांचे प्रमाण कमी असेल तर वाढ खुंटते. वाढ संप्रेरकांचे वाढीच्या काळातले प्रमाण गरजेपेक्षा जादा असेल तर उंची व रुंदी प्रमाणाबाहेर वाढतात, अगदी आठ-नऊ फुटांपर्यंत उंची जाऊ शकते. स्त्रीसंप्रेरकांचे काम अनेकविध स्वरुपाचे असते उदा. मासिक पाळी येणे, स्त्रीबीज बाहेर पडणे, गर्भधारणा, स्त्रीत्वाची इतर लक्षणे- आवाज मृदू असणे, चरबीचे प्रमाण, अवयवांची गोलाई, केसांची विशिष्ट ठेवण, स्त्री-जननसंस्थेची वाढ व कार्य, इ. पुरुषसंप्रेरकांचे कामही अगदी विशिष्ट असते. उदा. दाढीमिशा, लैंगिक इच्छा, शरीरातील ठेवण, पुरुषी आवाज, इ. स्त्रीसंप्रेरकांचा उपयोग मोठया प्रमाणात कुटुंबनियोजनासाठी होत आहे. पुरुषसंप्रेरकेही जास्त प्रमाणात वापरली जात आहेत. यांचा दुरुपयोगही मोठया प्रमाणावर होत आहे. या प्रकरणात संप्रेरकांच्या कमीजास्त प्रमाणाने होणा-या आजारांची माहिती घेऊ या. #⚕️आरोग्य
656 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

⚕️आरोग्य

🌱 पुनरुत्पादन वंश पुढे नेण्यासाठी जिवांना जन्म देणे (जनन किंवा पुनरुत्पादन) हे सगळयांच प्राण्यांत आणि वनस्पतींत दिसून येते. वंशवाढीचे प्रकार खूप आहेत. अगदी एकपेशीय जिवांमध्ये त्याच एका पेशीचे दोन भाग होऊन ते वेगवेगळे वाढतात. उत्क्रांतीत जास्त प्रगत पक्षी, मासे, सरपटणारे प्राणी, गाईगुरे, माणूस वगैरेंमध्ये नर-मादी एकत्र आल्याने नवीन जीव तयार होतो. काही प्रजातीत हा जीव अंडयांमध्ये आधी वाढून नंतर बाहेर येतो. सस्तन प्राण्यांमध्ये तो मादीच्या पोटात वाढून जन्माला येतो. नवीन जीवाची निर्मिती नवीन जीव तयार होण्याची माहिती थोडक्यात अशी. स्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी (स्त्रीबीज) तयार करणा-या दोन स्त्रीबीजग्रंथी असतात. मुलगी वयात आल्यानंतर दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. कोठल्यातरी एका स्त्रीबीजग्रंथीतून एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते गर्भनलिकेत येते. स्त्रीबीज गर्भनलिकेत (बीजनलिकेत) असताना जर पुरुषाशी लैंगिक समागम झाला तर पुरुषबीज स्त्रीबीजाशी जुळून गर्भधारणा होते. याआधी आपण शिकल्याप्रमाणे गर्भपेशींमध्ये निम्मा भाग स्त्रीचा व निम्मा भाग पुरुषाचा असतो. मुलगा होणार की मुलगी होणार हे पुरुषाकडून 'वाय'(Y) येणार किंवा एक्स (X) यावरच अवलंबून असते. बाकीचे बहुतेक गुणधर्म दोघांकडून येतात. गर्भधारणा झाल्यावर वेगाने पेशींचे विभाजन होते. मासिक पाळी बंद होते. गर्भाशयात गर्भ रुजून वार, नाळ तयार होतात. पुढे हळूहळू गर्भाचा विकास व वाढ होते. मात्र, स्त्रीबीज गर्भनलिकेत आल्यानंतर एक-दोन दिवसांत पुरुषाकडून शुक्रपेशी मिळाली नाही तर हे स्त्रीबीज मरते. वेळेत गर्भधारणा न झाल्यामुळे गर्भाशयात तयार झालेले आतील मऊ आवरण दहा बारा दिवसानंतर गळून पडते व रक्तस्राव होतो. यालाच आपण मासिक पाळी (मासिक स्राव) म्हणतो. या पाळीनंतर दहा बारा दिवसांनंतरगर्भाशयात परत नवीन आवरण तयार होते, म्हणजेच गर्भधारणेची तयारी होते. हे चक्र स्त्रीच्या पंधराव्या वर्षापासून 45-50 या वयापर्यंत चालू असते. प्रथम रजोदर्शन (पाळी येणे) होते तेव्हा मुलगी वयात आली किंवा 'नहाण' आले असे आपण म्हणतो. 45-50 वयात पाळी थांबली की आपण त्याला 'पाळी गेली' असे म्हणतो. यानंतर स्त्रीबीज तयार होत नसल्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. पुरुषांच्या अंडकोषात पंधरा-सोळा वर्षे वयानंतर पुरेशा पुरुषबीजपेशी निर्माण होतात. पुरुषाच्या जननसंस्थेतील या शुक्रपेशी आणि काही द्रव मिळून वीर्य तयार होते. स्त्री-पुरुष संबंधाच्या वेळी सुमारे दोन-तीन मि.ली. वीर्य बाहेर फेकले जाते. त्यात लक्षावधी शुक्रपेशी असतात. शुक्रपेशींना सूक्ष्म शेपटयांमुळे 'हालचाल' करता येते. ज्या वीर्य पेशींची हालचाल कमी किंवा बंद झालेली असते त्याच्याकडून गर्भधारणा होत नाही. यासाठी वीर्याचा नमुना सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासता येतो. #⚕️आरोग्य
738 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

⚕️आरोग्य

♦️ संप्रेरकग्रंथीसंस्था ग्रंथी म्हणजे पेशींच्या गाठी किंवा गड्डे. यांचे काम म्हणजे निरनिराळे रस तयार करणे. ग्रंथींचे दोन प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे नलिकांतून रस सोडणा-या ग्रंथी. उदा. पाचकरस (लाळ, स्वादूरस, पित्तरस) तयार करणा-या तसेच घाम व तेलकट पदार्थाने कातडी ओलसर ठेवणा-या ग्रंथी. दुसरा प्रकार म्हणजे थेट रक्तात रस सोडणा-या नलिकाविरहित ग्रंथी. या रसाला अंतःस्राव किंवा संप्रेरक (हार्मोन्स) असे म्हणतात. अंतःस्राव तयार करणा-या अशा संप्रेरक ग्रंथी (अंतःस्रावी) गळयात, पोटात,ओटीपोटात, मेंदूच्या खाली वगैरे निरनिराळया ठिकाणी असतात.या संप्रेरक ग्रंथीतून तयार होणारा रस सरळ रक्तामध्ये जातो. यासाठी ग्रंथींना कोठल्याही प्रकारची वेगळी नळी नसते. याचा एक फायदा असा असतो, की रक्तप्रवाहातले संप्रेरक रसांचे नेमके प्रमाण त्या त्या ग्रंथींना कळते. यामुळे संप्रेरकांची आवश्यक तेवढीच मात्रा रक्तात सोडली जाते. रक्तातील विविध संप्रेरकांचे प्रमाण या व्यवस्थेमुळे अगदी नेमके राहते. या संप्रेरकांचे निरनिराळे प्रकार आणि कामे असतात. शरीरातील पुरुषत्वाची किंवा स्त्रीत्वाची लक्षणे, रक्तातील साखरेचे प्रमाण, वाढ, उंची, रक्तदाब, मूत्रपिंडाचे कामकाज,चरबीचे प्रमाण, रासायनिक क्रियांचे नियंत्रण वगैरे अनेक महत्त्वाची कामे या रसांवर अवलंबून असतात. या संप्रेरकांचे प्रमाण ठरावीक मर्यादेत असावे लागते. त्यात थोडाही फेरफार झाला तर आरोग्यावर वाईट परिणाम होतात. #⚕️आरोग्य
371 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

⚕️आरोग्य

🌲 ज्ञानेंद्रिये पहा संपादन करा सुचवा माहिती लेखक स्थिती: संपादनासाठी खुला ज्ञानेंद्रिये आपला डोळा, कान, जीभ, त्वचा, नाक यांद्वारे (पाच ज्ञानेंद्रिये) आपल्याला जगाचे ज्ञान होत असते. या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये खास प्रकारच्या पेशींचे जाळे असते. बाहेरील परिस्थितीमुळे या पेशीत वेगवेगळे संदेश निर्माण होतात. असे संदेश चेतातंतूमार्फत मेंदूतील योग्य केंद्राकडे पोहोचवले जातात उदा. डोळयाच्या बुबुळातून प्रकाश आत गेला, की बाहेरच्या वस्तूंचे चित्र आतल्या पडद्यावर उमटते. या पडद्यात अत्यंत संवेदनाक्षम पेशींचे जाळे असते. प्रकाशाचा कमीअधिकपणा , वस्तूंच्या चित्रातील रंग, आकार वगैरे गोष्टींची माहिती या पेशींतून चेतातंतूमार्फत मेंदूपर्यंत पोहोचते. तसेच कानातल्या पेशींवर आवाजाच्या लाटा व कंपने आदळली की त्यासंबंधी माहिती मेंदूकडे जाऊन ऐकू येते. जिभेत चव ओळखणारे पेशीगट असतात. तसेच त्वचेवर स्पर्श, तापमान, दाब वगैरे ओळखणा-या पेशी असतात. ज्ञानेंद्रियात बिघाड होणे, चेतातंतूंमार्फत मेंदूंशी संबंधित भागात बिघाड होणे यापैकी काहीही झाले तर त्या ज्ञानेंद्रियाच्या कामात अडथळा येतो. #⚕️आरोग्य
502 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..