*मौनातील तेजस्विता दोन भगिनींचा ख्रिस्तासाठी साक्षात्कार*
कधी कधी एखादं मौन इतकं बोलकं असतं की त्यातून एक अख्खं युग हलतं. अशा मौनात देवाचा आवाज ऐकू येतो आणि मानवतेचा खरा चेहरा दिसतो. छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकावर २६ जुलै २०२५ रोजी जे घडलं, ते या मौनाचीच एक गाथा ठरली.
*सिस्टर वंदना फ्रान्सिस आणि सिस्टर प्रीती मेरी* या दोन ख्रिस्ती धर्मव्रती भगिनी. दोघीही समाजासाठी, शिक्षणासाठी आणि प्रेमासाठी आपलं जीवन समर्पित करून जगत होत्या. त्या दिवशी त्यांच्यावर अचानक खोटे आरोप लावण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चारही बाजूंनी आवाज, अपमान, गलिच्छ भाषा आणि अवहेलना यांचा वर्षाव झाला. पण त्या दोघी शांत होत्या. त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही. त्यांच्या डोळ्यांत केवळ प्रार्थना होती. चेहऱ्यावर फक्त शांती होती.
*त्या मौनाने दाखवली ख्रिस्ताची शिकवण*
त्यांचं मौन म्हणजे दुर्बलतेचं नव्हतं. ते होतं अंतर्बाह्य श्रद्धेचं आणि ईश्वरावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक. प्रभू येशूने जसं अपमान, छळ, अन्याय शांतपणे सहन केला, तसंच या दोन भगिनींनी केलं. त्यांनी कोणालाही दोष दिला नाही. कोणतीही कुरकुर केली नाही. त्यांनी फक्त प्रभूच्या करुणेवर डोळे लावले.
*धर्मव्रताचं खऱ्या अर्थानं महानत्व*
धर्म भगिनी होणं म्हणजे केवळ पोशाख बदलणं नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे अध्यात्मिक तयारी लागते. त्याग लागतो. घरदार, नातेसंबंध, ऐहिक सुखं यांचा निरोप घ्यावा लागतो. आणि मग एक शांत, ब्रह्मचारी, सेवा आणि प्रार्थनांनी भरलेलं जीवन जगावं लागतं. अशा जीवनाचं मोल केवळ त्याच जाणू शकतो जो त्याग आणि समर्पण याची खरी किंमत ओळखतो.
सिस्टर वंदना आणि सिस्टर प्रीती यांनी हा त्याग केला होता. त्या कोणालाही धर्म बदलायला सांगत नव्हत्या. त्या कोणालाही फसवत नव्हत्या. त्या फक्त मदत करत होत्या, प्रेम देत होत्या, समाजात प्रकाश पसरवत होत्या.
*प्रत्येक ख्रिस्ती हृदयात साक्षात प्रेरणा*
आज जगभरातल्या ख्रिस्ती बांधवांना त्यांच्या या शांततेचा अभिमान वाटतो आहे. त्यांच्या मौनात ख्रिस्ताचं अस्तित्व आहे. त्यांच्या संयमात विश्वासाचं सामर्थ्य आहे. त्यांनी काही बोललं नाही, पण जग त्यांच्याकडं बघून समजतंय की खरं श्रद्धा काय असते.
त्यांनी मौन स्वीकारलं कारण त्यांचा विश्वास आवाजावर नव्हे तर प्रार्थनेवर होता. त्यांनी शांतता स्वीकारली कारण त्यांना माहीत आहे की शांततेतूनच प्रभू बोलतो. त्यांनी कुठलाही प्रतिकार केला नाही कारण त्यांचा आत्मा आधीच प्रभूच्या कृपेने परिपूर्ण होता.
*प्रभूवरील विश्वास आणि हृदयातून निघणारी प्रार्थना*
आज त्या दोघी बंदिवान असल्या तरी त्यांचं मन मुक्त आहे. त्या कैदेत असल्या तरी त्यांचा आत्मा आकाशासारखा विशाल आहे. त्या अंधारात असल्या तरी त्यांची प्रार्थना प्रकाशासारखी चमकत आहे. आपण सगळ्यांनी त्यांच्या विश्वासासाठी प्रार्थना केली पाहिजे. त्यांच्या मनोबलात कमीपणा येऊ नये, त्यांच्या श्रद्धेचा दिवा सतत प्रज्वलित राहावा हीच विनंती.
*संपूर्ण जगात एक विश्वास तुमच्या मागे आम्ही आहोत*
सिस्टर वंदना आणि सिस्टर प्रीती या केवळ दोन व्यक्ती नाहीत. त्या एका विचाराचं, एका श्रद्धेचं, आणि एका शांतीच्या मार्गाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यावर अन्याय झाला असला तरी त्यांचं जीवन आज लाखोंना प्रेरणा देत आहे. त्यांचं मौन लाखो आवाजांपेक्षा जास्त ताकदवान ठरत आहे.
आज जगभरातील लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंमध्ये आमचं हृदय ओथंबून आलं आहे. त्यांच्या मौनात आम्हाला देवाचा स्पर्श वाटतो. आणि म्हणून आम्ही म्हणतो की त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, पण त्यांनी आधीच आपली विजयश्री मिळवली आहे.
*सत्य आणि प्रेमाच्या मार्गावर चालणाऱ्यांना कोणी रोखू शकत नाही. मौनातही जे उभं राहतात, तेच इतिहास घडवतात.*
*सचिन मधुकर औचारे*
दि. २ ऑगस्ट २०२५
#✝️येशू ख्रिस्त✝️ #येशू प्रेअर #ख्रिस्ती सेवाकार्य #पवित्र बायबल वचन मराठी