राम कदम
#

राम कदम

एका बापाचं, राम कदमांना पत्र प्रति, आमदार राम कदम हभप (?), डॅशिंग'(?) दयावान? तुमचं वक्तव्य ऐकल्यानंतर वारंवार मनात विचार येतोय की “काश, राम कदमांना एक मुलगी असती... मी स्वत:राम कदमांना सांगितलं असतं “मला तुमची मुलगी आवडते”!!... हे ऐकूण राम कदमांची काय अवस्था झाली असती ? कदमांनी तिला पळवण्यात मदत केली असती का ? कुठला बाप हे कृत्य करेल का ? आपली मुलगी कोणासोबत तरी फिरतेय, हे जेव्हा एका बापाला कळतं ना, तेव्हा बापाच्या पायाखालची वाळू कशी सरकते, याची जाणीव तुम्हाला होणार नाही. त्याच्यासाठी एका मुलीचा बाप असणं गरजेचं असते. मला वाटतं तुम्ही आमदार जरी असलात तरी बाप होण्यासाठी लागणारी गुणवत्ता तुमच्याकडे नाहीये, हे तुम्ही केलेल्या वक्तव्यातून दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीचा बाप तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आज कित्येक घरांत मुलगी पळून गेल्याची घटना घडलेली आहे. पळून गेलेल्या मुलीचा बाप, आई, भाऊ कसं जगतात हे एकदा जाऊन पहा, मगच आपण काय वक्तव्य केलंय याचा विचार करा. एखादीची बहिण पळून गेल्यामुळे दुस-या बहिणीकडे देखील त्याच नजरेनं पाहिलं जातं, किती त्रास होतो, त्या बहिणीला आधी विचारा मगच पोरी पळवायची भाषा करा. आज ज्या घरातली मुलगी पळून गेलीय, त्या घरात राम कदम तुम्ही जाऊन या, त्या हतबल बापाचा हातात हात घेऊन विचारा खरंच मी चुकीचं वक्तव्य केलंय का ? हातात घेतलेला हात कदमांवर उचलल्याशिवाय राहणार नाही. आज असे किती तरी बाप आहेत, ज्यांनी तळहातावर जपलेल्या पोरींला गमवल्यानं उध्वस्त झाले आहेत. आपली पोरगी पळून गेली हे ऐकून किती तरी बापांना हार्ट अटॅक आले आहेत, कोणाला पॅरालीसिस झाला आहे तर, कुठल्या बापाचं मन कायमचं सुन्न झालं आहे. आयुष्यात पोलिस स्टेशनशी कधीच संबंध आला नाही अशा बापाला जेव्हा पोरगी पळून गेल्यावर पोलिस स्टेशनला जावं लागतं ना, राम कदम....जाऊन विचारा त्या बापाला, काय अवस्था होते ती !! आई ढसाढसा रडत असते, बाप कोमात गेल्यासारखा उभा असतो तुमच्या सारखे पोरीला पळवून आणणारे "रावण" मात्र त्या आई बापाची हाय घेत असतात. कारण कोणाच्या सुखासाठी कोणाला तरी तुम्ही दुःखी करत असता. एकीकडे इतरांच्या आई बापाला तीर्थ क्षे्त्राला पाठवण्याचं काम तुम्ही करता, दुसरीकडे त्याच आई बापाच्या पोरींना पळवायची भाषा करता ? कुठे फेडाल ही पापं ? पण लक्षात घ्या, आजच्या युगात जे कर्म कराल, ते इकडेच फेडावे लागतात. माफ करा तुम्ही हभप आहात (?) तुम्हाला मी काय प्रवचन देणार, पण तुम्ही डॅशिंग आणि दयावानही आहात. त्यामुळे लोकांच्या पोरी उचलायची तुमच्यात "राक्षसी" ताकद आहे. असं तुम्ही समजता पण या महाराष्ट्राच्या लेकींना वीर जाजाऊंचा वारसा आहे. त्यांच्या अस्मितेवर घाला टाकण्याचा विचारही करू नका. नाहीतर माझ्यासारखे हजारो, लाखो बाप तुमच्या समोर भवानी तलवार घेउन उभे राहतील. प्रत्येक बापासाठी मुलगी कितीही मोठी झाली तरी छकुलीच असते. लग्नात अक्षता टाकताना मुलीच्या सुखासाठी अश्रू लपवतो ना... तो असतो बाप, रात्री कितीही उशीर झाला तरी निवांत झोपलेल्या पोरीला बघून सुखावतो ना तो असतो बाप... आणि तुम्ही आमच्या छकुलीला पळवायची भाषा करता. तुमच्या सारख्या लोकप्रतिनिधीच्या तोंडून ही भाषा शोभत नाही. एक लक्षात ठेवा!! हा महाराष्ट्र कुठल्या राजकीय गुंडांचा नाहीय. हा महाराष्ट्र आमच्या रयतेचा राजा छ्त्रपतीं शिवाजी महाराजांचा आहे. त्यांच्या महाराष्ट्रात प्रत्येक महिला सुरक्षितच असायला हवी, हा महाराष्ट्र आमच्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. कारण संविधानमुळे ती स्वत:ला सुरक्षित समजते. हा महाराष्ट्र आमच्या सावित्रीबाई फुलेंचा आहे. कारण प्रत्येक महिलेला साक्षर होण्याचा अधिकार आहे. हा महाराष्ट्र आपल्या तमाम माता भगिंनींचा आहे ज्यांना स्वतंत्र जगण्याचा, विचार करण्याचा अधिकार आहे. या रणरागिनी आहेत. राम कदम या रणरागिणींच्या मार्गात असूरी काटा बनलात तुम्ही. महाराष्ट्रातील तरूणींनी जर दुर्गेचं रुप धारण केलं तर तुमचं राम नावतले शब्द उलटे होतील, काय होईल मग “मरा”च. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन भाषणं करतात. महाराष्ट्रात छत्ररपतींचं नाव घेऊन सत्तेवर आला आहात. त्याच महाराष्ट्रातले भाजपचे रावसाहेब दानवे, श्रीपाद छिंदम आणि आमदार परीचारक सारखे दानव माहाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शेतकरी आणि वीर पत्नींचा अपमान करत असतील, तर हा महाराष्ट्र तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला कधीच माफ करणार नाही. जर तूमच्या मनात जरा तरी 'लाज'(?) असेल तर दुखावलेल्या माता-भगिनींना उत्तर द्या. कधी दानवे, तर कधी छिंदम तर कधी परिचारिक मुख्यमंत्री महोदय काय चाललंय काय ? तुमच्या राज्यात ? महाराष्ट्रातल्या जनतेनं किती सोसायचं ? कारवाई होणार की नाही ? आता राम कदमांनाही क्लिन चिट दिली नाही म्हणजे झालं. पण आता तुमच्या क्लिन चीटची वाट कोण बघत नाहीये. निवडणुका जवळ आल्या आहेत, आता कोणाला क्लिन बोल्ड करायचं हे सुजान मतदारांना चांगलंच ठाऊक आहे. ...पण राम कदम चुकीला माफी नाही !!
6.9k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post