पूर्वीच्या पिढ्यांत नाती ही जपली जायची, वाढवली जायची, त्यांना अर्थ होता. आज नाती कमी, पण व्यवहार जास्त दिसतात. पूर्वी संसार म्हणजे दोन कुटुंबांचा मिलाफ होता, आज तो फक्त दोन व्यक्तींच्या सोयीपुरता मर्यादित होत चालला आहे. नात्यांमध्ये जिथे आधी एकमेकांच्या दोषांवर पांघरूण घालण्याची तयारी होती, तिथे आता छोट्या छोट्या अपेक्षांनी नाती मोडतात.
आजकाल लग्न ठरवताना प्रेम किंवा माणुसकीपेक्षा संपत्ती, नोकरी, पगार, गाडी, घर यावर भर दिला जातो. नात्याचं सौंदर्य या बाह्य गोष्टींच्या गर्दीत हरवत चाललं आहे. पूर्वी घरकामात पारंगत असलेली मुलगी हा अभिमानाचा विषय होता, आज मुलीला घरकामाचं ओझं दिलं नाही, हे अभिमानाने सांगितलं जातं. हे नक्कीच प्रगतीचं लक्षण आहे, पण सोबतच घर आणि संसाराच्या गाभ्याशी असलेली जुळवून घेण्याची क्षमता हरवत चालली आहे.
आज एकमेकांना समजून घेणं, सहन करणं, आपुलकी दाखवणं ही मूल्यं दुर्मिळ होत चालली आहेत. प्रत्येक जण फक्त स्वतःच्या सोयीचा विचार करतो. घर लहान हवं, पण त्याच नादात माणुसकी, आदर, आपुलकी या गोष्टींचं घर शून्य झालं आहे. नात्यात छोटा त्याग करायला कुणालाच आवडत नाही, अहंकाराला जास्त महत्त्व दिलं जातं. परिणामी घरं तुटतात, संसार मोडतात, आणि अनेकदा जीवही जातो.
सुखी संसारासाठी फार मोठ्या गोष्टींची गरज नसते. दोन वेळचं अन्न, डोक्यावर छप्पर आणि एकमेकांबद्दलचं प्रेम व विश्वास इतकं पुरेसं असतं. पण आज या साध्या गोष्टींवर समाधान न मानता, प्रत्येकजण "मोठं" शोधतो मोठं घर, मोठी गाडी, मोठा पगार. पण या मोठेपणात माणुसकी, समाधान, आपुलकी लहान होत जाते.
पूर्वी घरामध्ये जरी सुविधा कमी होत्या, तरी आनंद जास्त होता. कारण कुटुंब एकत्र होतं, नाती खरी होती. आज घरात सुविधा आहेत वॉशिंग मशीन, मोबाईल, टीव्ही, कार पण समाधान नाही. कारण या सुखसोयींच्या नादात आपुलकी, सहनशीलता, आदर, जबाबदारी या गोष्टींना बाजूला सारलं गेलं आहे.
घर चालतं ते प्रेमाने, समजूतदारपणाने, आणि थोडं वाकून घेण्याने. अहंकाराने कधीच घर टिकत नाही. संसार हा दोन माणसांचा नाही, तर दोन कुटुंबांचा असतो. त्यात जर आदर, प्रेम, विश्वास आणि सहनशीलता नसेल, तर तो कधीच स्थिर राहणार नाही.
आजच्या पिढीने थांबून विचार करण्याची वेळ आली आहे आपण काय शोधतोय? खरा आनंद बाह्य गोष्टींमध्ये आहे का, की नात्यांच्या ओलाव्यात? कारण शेवटी, सुख म्हणजे एक हसरा चेहरा, एक आपुलकीचा हात आणि एकत्र जगलेले क्षण...
#नाती #नाती #नाती #प्रेमाची नाती #नाती