श्रीकृष्णाने तारुण्याचा उंबरठाही ओलांडला नव्हता त्यावेळची आणखी एक गोष्ट. इंद्राचा उत्सव नाकारणार्‍या गोकुळवासीयांवर इंद्राने प्रचंड जलवृष्टी केली. संपूर्ण गोकुळ पाण्याच्या लोटाखाली वाहून जाईल की काय असे वाटू लागले. यावेळेला बालकृष्णाने सगळ्या गोकुळवासीयांना गोवर्धन पर्वताकडे एकत्र केले आणि बेटयाने तो पर्वतच की हो उचलला ! त्या पर्वताच्या छायेत सगळे गोकुळवासी सुखरूप वाचले म्हणून याचे नाव रूढ झाले गोवर्धन-गिरिधारी किंवा नुसतेच गिरिधारी. परत तेच, मूळ नावाचा पत्ता नाही. याची विविध ठिकाणची आणि विविध वेळेची पराक्रम सांगणारी विशेषणे तीच याची नावे. चोवीस नामीं, सहस्त्र नामीं, अनंत नामी, तो अनामी || असे समर्थांनाही म्हणावेसे वाटलेच ना? हा लोकोत्तर आहे, कर्तुत्ववान आहे, प्रचंड पराक्रमी आहे. या सगळ्याचे इतके कौतुक की परमेश्वर परमेश्वर म्हणतात तो तरी याच्यापेक्षा कुठे वेगळा असणार? म्हणून एकनाथ म्हणतात, त्रैलोक्याचा धनी तो हा | यशोदेसी म्हणतो आई | सकळ तीर्थे जया चरणीं | सुलभ हा शूलपाणी | राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी || शरण एकाजनार्दनी | कैवल्याचा मोक्षदानी | गाई गोप गोपी बाळा आपुलेपणीं || म्हणजे पाहा, आता इथे याची आणि राधेची जवळीक नाथांनी सांगितली आहे. राधेचे नाव याच्याबरोबर जोडून याला राधाकृष्ण म्हणतातच आणि गाई गोप-गोपींबरोबर हा खेळतो, बागडतो म्हणून याला गोपाळही म्हणतात, गोपसखाही म्हणतात. म्हणजे परत तेच ! गाई पाळणारा, गाईचे रक्षण करणारा म्हणून गोपाळ आणि गुराख्यांबरोबर प्रेमाने, मैत्रीने वागणारा म्हणून गोपसखा ! याच्या साध्या साध्या गोष्टीचेसुद्धा कौतुक केवढे ! रानात गुरे राखायला गेलेले असताना गुरांना चरावयाला पाठविले आणि स्वतः गोपसख्यांबरोबर खेळ खेळू लागला. श्रीकृष्णाच्या चरित्रातील गोपाळकाला हा आबालवृद्धांना मोहविणारा प्रसंग आहे. मिळोनी गोपाळ सकळीं | यमुनेतटी खेळे चेंडुफळी | गाई बैसविल्या कळंबातळीं | जाहली दुपारी खेळतां || काला मांडिला वो काला मांडिला वो | नवलक्ष मिळोनी काला मांडिला वो || नानापरींचे शोभती दहींभात | पंक्ती बैसविल्या पेंधा बोबडा वाढीत | जो जया संकल्प तें तया मिळत | अनधिकारिया तेथें कोणी न पुसत || पूर्वसंचित खालीं पत्रावळी | वाढिती भक्तीभावाची पुरणपोळी | नामस्मरणाची क्षुधा पोटीं आगळी | तेणें तृप्ती होय सहजीं सकळीं | ऐसे तृप्त जाहले परमानंदें | कवळ कवळाचे निजछंदे | एकाजनार्दनीं अभेदें | शुद्ध समाधिबोधें मुखसंवादे || पूर्वसंचिताच्या पत्रावळीवर इथे भक्तीभावाची पुरणपोळी वाढली जात आहे. अर्थात काल्यात दहीभात आहेच; पण हा दहीभात साधासुधा नाही. गोपाळांची जी इच्छा असेल ती पुरविणारा हा दहीभात आहे. दुपारपर्यंत यमुनेच्या तीरावर चेंडूफळीचा खेळ खेळून दमलेले गोपाळ या काल्यात सहभागी झाले आहेत. श्रीकृष्ण चरित्रातल्या प्रत्येक घटनेला काही पारमार्थिक वा आध्यात्मिक वळण देण्याचा संतपरंपरेने प्रयत्न केला आहे. तुकारामांनीही काल्याचे वर्णन केले आहे. तयांसवे करी काला दहींभात | सिदोर्‍या अनंत मेळवूनि || मेळवुनि अवघियांचे एके ठायीं | मागें पुढें कांही उरों नेदी || नेदी चोरी करूं जाणे अंतरीचें | आपलेही साचें द्यावें तेथें | द्यावा दहीभात आपले प्रकार | तयांचा व्यवहार सांडवावा | वांटी सकळांसी हातें आपुलिया | जैसें मागे तया तैसें द्यावें || द्यावें सांभाळूनी समतुक भावें | आपणहि खावे त्यांचे तुकें | तुक सकळांचे गोविंदाचे हातीं | कोण कोणे गति भला बुरा || काला झाल्यानंतर गोपाळांचे उष्टे हात यमुनेत धुतले गेले तर तोच प्रसाद म्हणून आपण सेवन करू, अशा विचाराने देव म्हणे मासे बनून यमुनेत पोहू लागले. हा कृष्ण इतका हुशार, इतका चतुर की त्याने सवंगडयांना आज्ञा केली, कोणी यमुनेत हातच धुऊ नका, परत तसेच गोकुळात परता आणि देवांची कशी जिरवली या आनंदात स्वारी स्वतःवरच खुश झाली. नामदेव म्हणतात, उच्छिष्टांचे मिषें | देव जळीं झाले मासे || हे कळलें घननीळा | सांगतसे हें गोपाळा || म्हणजे पुन्हा तेच घननीळ म्हणजे ढगांसारखा सावळा. पुन्हा गुणगौरवाचे विशेषण ! खर्‍या नावाचा पत्ता नाही तो नाहीच. संदर्भ टीप : प्रस्तुत लेख हा हिंदुधर्मातील पारंपरिक रूढी, परंपरा, समजुती तसेच पंचांगशास्त्र या अनुषंगाने परंतु त्याचवेळी स्वतंत्र विचाराधारेने लिहिला आहे. - ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर
#

pratik

pratik - ShareChat
169 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post