#

मंत्र,श्लोक,स्तोत्र

२१ नोव्हेंबर भगवंताजवळ काय मागावे ? एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला, आणि त्याला 'तुम्ही कुठले' असे विचारले, तर तो आपल्या खेडेगावचे नाव सांगेल. जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तालुक्याचे नाव सांगेल, इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल; तसेच दुसर्‍या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचे नाव सांगेल, आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात. तसे, मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचे मूळ एकच असल्यामुळे, त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच. पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत, जो ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचे आचरण करणे हेच हिताचे असते. सुख मिळविण्याच्या आपल्या सर्व कल्पना आज खोट्या ठरल्या आहेत. आपण प्रथम अशी कल्पना केली की, श्रीमंतीमध्ये सुख आहे. त्याप्रमाणे रगड पैसा मिळविला तरी आपल्याला जर सुख मिळाले नाही, तर तर आपली कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे ? एकच वस्तू एकाला सुखरूप तर दुसर्‍याला दुःखरूप वाटते; म्हणजे ती वस्तू मुळात दोन्ही नाही, सुखरूप नाही किंवा दुःखरूपही नाही. जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते, ती उद्या तशी वाटेलच असे नाही. आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही. म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पनादेखील खोटीच असली पाहिजे; ती तेवढी खरी आहे असे आपण का म्हणावे ? जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो. ती नाही म्हणायला किंवा विसरायला आपणच तयार होतो. आपल्यावर संकट आले की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी, नाती, वगैरे गोड लागत नाहीत. त्यावेळी आपल्याला चैन पडत नाही. हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे. एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही टाकून द्यावेत; त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्यात. कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करू या. भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे, अशी कल्पना आपण करू या. त्यात खरे हित आहे, आणि त्यानेच संसार खरा सुखाचा होईल. कल्पनेचे खरे-खोटेपण हे अनुभवाअंती कळते; म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे. अशी रीतीने कल्पना थांबल्यावर आणि वृत्ती स्थिर झाल्यावर तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे. " अमुक एक वस्तू मजपाशी आहे म्हणून मी सुखी आहे, " या वृत्तीमध्ये राम नसून , काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे, आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे. हेच परमार्थाचे खरे मर्म आहे. ३२६. कल्पना म्हणजे मायेचे हत्यार. कल्पनारहित थोडे नामदेखील फळ देईल.
224 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
#

मंत्र,श्लोक,स्तोत्र

१४ नोव्हेंबर प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा. हे जे सर्व जग दिसते, त्याला कुणी तरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का ? एखाद्या नास्तिकाला विचारले की 'हे जग कुणी निर्माण केले ? ' तर तो काय सांगेल, तर पांचभौतिक तत्त्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्त्वे कुणी निर्माण केली ? त्यावर तो सांगेल, 'ते मात्र काही कळत नाही'. पण जे कळत नाही त्यालासुद्धा कुणीतरी असलाच पाहिजे. म्हणून, देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहितो; आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी, ज्याअर्थी ती आहेत, त्या अर्थी त्यांना कुणीतरी बांधणारा आहेच. म्हणून काय की, जगाचा कुणी तरी कर्ता हा असलाच पाहिजे. तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच. आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ थाटतात, खेळात लग्न लावतात, त्यांचा सर्व सोहळा करतात; बाहुलीचे सर्व संस्कार ती करतात. त्यांच्या खेळात बाळंतपण होते, मुले होतात, सर्व काही करतात; पण त्यांना कुणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तशीच धावत जातात. त्या वेळेस मूल तिथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहात नाही. असेच आपण संसारात वागावे. जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो आणि संहारही करणारा तोच असतो; तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे-वाईट झाले म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे ? समजा, आपण एक घर भाड्याने घेतले आहे. त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरतो आहोत. पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो, तर तो मालक ऐकेल का ? तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावील की नाही ? तसेच आपले प्रपंचात झाले आहे. जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे, तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो. परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे ? तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी, म्हणजे संसारात सुखदुःखे बाधत नाहीत. आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये. भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर वाईट काय ? बरे, तसे न झाले तर प्रपंच चालूच आहे ! प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा, आनंदाने रामनामात राहू या. सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा, मन खास चिंतारहित होईल, पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल. ३१९. हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे. प्रपंच  ज्याचा आहे त्यास तो देऊन टाकून आपण मोकळे व्हावे.अडखळण्याची भितीच नाही.
303 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
#

मंत्र,श्लोक,स्तोत्र

१३ नोव्हेंबर परमेश्वर जाणण्याचा मार्ग ! जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो; स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपाने असतो. न्यायाधीश निकाल देतो तेव्हा 'अमक्या न्यायाधिशाने निकाल दिला' असे म्हणतो. म्हणजेच काय की, तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले, त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे. म्हणूनच, सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असे सांगतात त्याचेही कारण हेच आहे. या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते. देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते, पण ती बरोबर जाणली जात नाही, आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणे हेच खरे व्हायला पाहिजे असे असते, अशी ज्याला इच्छा झाली त्याचे अर्धे काम झाले असे म्हणावे. तशी इच्छा झाल्यावर, देव पाहण्यासाठी काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो. त्याला पुष्कळ निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील. कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल; कुणी सांगतील की ब्रह्मचारी राहिले म्हणजे देव भेटेल, कुणी सांगतील गृहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितला आहे. तसे वागले म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल; कुणी याग, कुणी हठयोग, तर कुणी जपतपादि साधने सांगतील. अशा मतामतांच्या गोंधळात आपण काय करावे ? तर ज्यांनी तो मार्ग चोखाळला आहे, त्यांनी काय केले ते पाहावे. असा मार्ग कुणी चोखाळला ? तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी. त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे. म्हणून ते काय सांगतात ते पाहावे. आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो. जिथे चार वाटा फुटतात तिथे पाट्या लावलेल्या असतात, आणि जिकडे जायचे ते त्यावर लिहिलेले असते. समजा आपल्याला पंढरपूर जायचे आहे; आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का ? पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावे, तसेच आपले झाले आहे. आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत, आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत. म्हणूनच, संत सांगत असतात त्या वाटेनेच जाण्याचा निश्चय करावा, आणि तो मार्ग जरी कठीण वाटत असला, तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवावे. ३१८. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे; पडण्याची, अडखळण्याची भितीच नाही.
139 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
#

मंत्र,श्लोक,स्तोत्र

२५ ऑक्टोबर ईश्वरप्राप्तीचा मार्ग - खरी तळमळ आणि संपूर्ण शरणागती नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही; बायकोचा त्याग करून होत नाही; जनात राहून होत नाही तसेच वनात राहिल्यानेही होत नाही. खरे म्हटले म्हणजे अमुक असे काही नाही, की जे केल्याने त्याची प्राप्ती होईल. तसे असते तर साधू ओळखायला काहीच वेळ लागला नसता. संत हे यांपैकी काय करीत नाहीत ? काही प्रपंच करतात तर काही वनात राहतात. म्हणून काय, की अमुकच केले म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते असे नाही. मग असे काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती होते ? तर त्यासाठी एकच लागते, ते म्हणजे, ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे. ज्याला अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले. ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो, त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढले कार्य व्हायला फार अडचण पडत नाही; आणि हे व्हायला भाग्य लागते. तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असे नाही. आपण रामाचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे; आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहोत असे वागले पाहिजे; म्हणजे त्याचे झाले पाहिजे. असे करण्याने आपला प्रपंच बिघडेल असे वाटते का ? आपण नोकरी करतो त्यावेळेस अंमलदाराबद्दल आपले चांगले मत असते का ? तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतोच की नाही ? तसे, आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा, म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो; कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते. बिभीषण रामाला शरण आला, तेव्हा त्याला मारून टाकावा असेच बाकीच्यांनी सांगितले. तरी पण रामाने सांगितले की, "जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे." शरणागताला नुसते जीवदान देऊन तो राहिला नाही, तर त्याला लंकेचे राज्य दिले. म्हणून सांगतो की, जो त्याचा होऊन राहतो, त्याची लाज रामाला असते. माझ्याकडे इतके जण येतात, पण एकाने तरी 'रामाची प्राप्ती करून द्या' म्हणून विचारले का ? मी आलो आहे तो काय तुमचे विषय पुरविण्यासाठी ? समजा, एकजण चोरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचे देऊळ लागले. तिथे जाऊन मारुतीला नवस केला की, "मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझ्या देवळावर सोन्याचा कळस चढवीन'" तर आता सांगा, त्याला मारुतीने काय द्यावे ? त्याने त्याच्या नवसाला पावावे असे तुम्हाला वाटते का ? जर नाही, तर तुम्ही विषय मागितले आणि मी दिले नाहीत तर मला दोष का देता ? आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की, "मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान रहावे, आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये." २९९. साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे, आणि मग  'भगवंत किंवा गुरू पाहून घेतील' असे म्हणून आनंदात राहावे.
244 जणांनी पाहिले
12 महिन्यांपूर्वी
#

मंत्र,श्लोक,स्तोत्र

६ ऑक्टोबर सच्चिदानंद परमात्म्याला सगुणाच्या आधारानेच पाहता येईल. परमात्मा सच्चिदानंदस्वरूप आहे हे जरी खरे, तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. आपण भगवंताला सगुणात पाहावे तेव्हाच त्याच्या विभूतीचे आपल्याला आकलन होईल. म्हणूनच समर्थांनी 'निर्गुण ओळखून सगुणात रहावे' असे म्हटले आहे. सत्य हे शांत आणि आनंदमय असले पाहिजे; हेच भगवंताचे मूळ स्वरूप आहे. ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून, तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे. अर्थात्, सर्व सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही; हा भ्रम आहे. डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ति नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही; परंतु आंतमध्ये शक्ति असली, तरी ती आहे असे बाह्य डोळ्यांशिवाय कळत नाही. त्याचप्रमाणे, सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे. सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणून ते शांत आहे; म्हणून सनातन आहे. ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे; कारण अशांतामध्ये आनंद असणे शक्य नाही. म्हणून सत्य हे परमात्मस्वरूप होय. परमात्मस्वरूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितले पाहिजे. पण व्यावहारिक सत्य मात्र निराळे असते. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे, म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचे अस्तित्व असले पाहिजे. याचा अर्थ असा की, प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे. हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय. सर्वांना शांति मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे. ही शांति परिस्थितीवर अवलंबून नाही. शांति एकपणात आहे, द्वैतात नाही. एकामध्ये ज्याचे मन गुंतले, ज्याने आपले मन भगवंताकडे ठेवले, त्यालाच शांतीचा लाभ होतो; मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे खास, आणि त्याकरिता त्याच्या नामाचे अनुसंधान हे एकच साधन आहे. भगवंताला पहायचे असेल तर आपल्यालाही तसे व्हावे लागते. सत्त्वगुणात भगवंत असतो; तेव्हा आपण त्या मार्गाने जावे. आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात. कुपथ्य टाळणे, पथ्य सांभाळणे, आणि औषध घेणे. त्याचप्रमाणे भवरोग्यालाही तीन गोष्टी कराव्या लागतात. मुख्य ध्येय परमात्पप्राप्ती. त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य - दुःसंगती, अनाचार, अधर्माचरण, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे - त्याचा त्याग करावा; परमात्मप्राप्तीला जे सहायक, पोषक सत्संगती, सद्‌विचार, सद्‌ग्रंथवाचन, आणि सदाचार - ते पथ्य; ते सांभाळावे, आणि अखंड नामस्मरण करणे हे औषधसेवन होय. २८०. आनंदरूप परमात्मा मिळविण्यासाठी सगुणोपासना पाहिजे.
391 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

मंत्र,श्लोक,स्तोत्र

२४ सप्टेंबर कुटुंबात कसे वागावे ? देहात आल्यावर, आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे. घरात अत्यंत समाधान असावे. मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत. बाप जसा सच्छील आहे तसे मुलांनी व्हावे., म्हणजे कुळाची कीर्ति वाढते. मोठ्या माणसाने, पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे. बाईनेही पतीपरते दैवत न मानावे. सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे. जो मनुष्य तरूणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल; म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. आपण अस्वाभाविक रीतीने, म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे, म्हातारपणी कर्तेपण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते; आणि ती तापदायक बनते. ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो, त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल; पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही, आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे ! पण मी सांगतो ना !, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे मग दुःख नाहीच नाही. प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन, आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्‍न करावा. वयाची सोळा ते पंचवीस वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते. ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनाची अत्यंत आवश्यकता असते. बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय; कारण आपले हित व्हावे यापलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो. जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे ? म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण करून घ्यावा. आपले आईबाप एखादे वेळी चुकणार नाहीत असे नाही, कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे; परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते, तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही. कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही. म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये. सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक; भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे. आपण निश्चयाने आणि निःशंकपणे त्याचे नाव घेऊ या आणि आनंदात राहू या. २६८. आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत.
274 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

मंत्र,श्लोक,स्तोत्र

१२ सप्टेंबर नाम अभिमानाचा नाश करते. दुसर्‍याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की, भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले, तेव्हा तो रडू लागला ! ’लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ असे नसावे. जे आपण दुसर्‍यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करू या. नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याचे वेळी दैव आठवते; म्हणून दोन्ही प्रसंगी कर्तेपण नसावे. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असे मानावे. खोटे कर्तेपण घेतल्यामुळे खरे रडावे लागते, लहान अर्भकाप्रमाणे निरभिमान असावे. मनुष्याचे हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे. ’यश देणे न देणे तुझ्या हाती आहे’ असे म्हणून रामास शरण जावे. जगात अनेक शोध लागत आहेत, त्यात शरीरसुखभोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत. परंतु खर्‍या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध, एक साधुसंतच करू शकतात, त्यांनी समाधानाची म्हणूण जी काही साधने सांगितली आहेत, त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही, तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना, किंवा केल्यावर, त्याबद्दल अभिमान झाला नाही, तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोके वर काढीत असतो पाहा ! एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती. ती वयात आली, दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता; परंतु त्या मुलीचे लग्न पाचसहा वर्षे कुठेही जमू शकले नाही. पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला, "माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करून टाकले." त्यावर त्याला कोणी विचारले, "मग दोनचार वर्षे आधीच का नाही केलेत ?" तेव्हा तो म्हणाला, "त्या वेळी जमले नाही" मग आता जमले म्हण की. ’मी केले’ असे कशाला म्हणतोस ?" असो. अभिमान घालवायला, भगवंताला मनापासून शरण जाणे, हा उपाय साधुसंतांनी स्वतः अनुभवून सांगितला आहे. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला, की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही. तसेच, एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून, ’रामा, मी तुझा झालो आणि तू माझा झालास,’ असे अनन्येतेने म्हटल्यावर, त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरूरी नाही. म्हणून, होईल ते कर्म त्याचेच मानावे. कोणतेही कर्म अर्पण केले असताना ’अर्पण करणारा’ उरतोच; तर तसे न व्हावे. २५६. सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन्नामाने आणि सत्संगतीने तो मरतो.
302 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

मंत्र,श्लोक,स्तोत्र

१९ ऑगस्ट आपल्याला देवाची नड वाटते का ? एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने सर्व सामान घेतले. तो पानतंबाखू खाणारा होता, त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचे साहित्य काढले, तेव्हा त्याच्या ध्यानात आले की आपण चुन्याची डबी विसरलो आहोत. त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकले. त्याला मोठी चुटपुट लागली. कुठे काही पडल्याचा आवाज झाला, की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली. कुणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे, आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारील. ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्या गोष्टीची आपल्याला नड लागते; ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची नड कधी लागली आहे का ? आपण आपल्या घरातल्या सर्व वस्तू आपल्या म्हणतो. बायको, मुले आणि घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्यंभूत माहिती असते; परंतु देवघरातला देव, ज्याची आपण रोज पूजा करतो, तो कधी आपलासा वाटला आहे का ? आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचे प्रेम कसे लागेल ? देवाचे प्रेम लागायला हवे असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. देवावाचून आपले नडते असे वाटले पाहिजे. ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते. ज्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतोच, सहवासात किती प्रेम आहे. प्रवासात आपल्याला कुणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो, बसलो, की त्याचे प्रेम आपल्याला लागते. तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो, "तुमच्याबरोबर वेळ किती आनंदात गेला ! तुम्ही आणखी बरोबर असता तर बरे झाले असते." थोड्याश्या सहवासाने जर एवढे प्रेम उत्पन्न होते, तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचे किती प्रेम मिळेल ! म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे अहंपणा विसरून, कर्ता-करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारे कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. 'नामाने काय होणार आहे' असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पाहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. २३२. नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षू, मग् साधक, व पुढे सिद्ध होतो.
344 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

मंत्र,श्लोक,स्तोत्र

१० ऑगस्ट अनुसंधानीं चित्त । सर्वांभूतीं भगवंत ।  हाच माझा परमार्थ ॥  ज्यास पाहिजे असेल हित । त्याने ऐकावी माझी मात ॥  जो झाला रामभक्त । तेथेच माझा जीव गुंतत ॥  मला रामभक्तावीण काही । सत्य सत्य जगी कोणी नाही ॥  जीवाचे व्हावे हित । हाच मनाचा संकल्प देख ॥  तुम्हास सांगावे काही । ऐसे सत्य माझेजवळ नाही ॥  पण एक सांगावे वाटते चित्ती । रघुपतीवीण शोभा नाही जगती ॥  मुलगी सासरी गेली । तिची काळजी सासरच्याला लागली ।  तैसे तुम्ही माझे झाला । आता काळजी सोपवावी मला ॥  सदा राखा समाधान माझा आशीर्वाद पूर्ण ॥  मी तुमची वेळ साधली । हा ठेवा मनी विश्वास । आनंदाने राहावे जगात ॥  अंतकाळची काळजी । तुम्ही कशाला करावी ? ॥  व्यवहार मी सांभाळला । तरी पण रामाला नाही दूर केला ॥  राम सखा झाला । नामी धन्य मला केला ॥  मी तुम्हास म्हटले आपले । याचे सार्थक करून घेणे आहे भले ॥ नामापरते न माना सुख । हाच माझा आशीर्वाद ॥  मला माझे बोल सत्य । कृपा करील खास भगवंत ॥  मी असो कोठे तरी । मी तुम्हापासून नाही दूर । याला साक्ष रघुवीर ॥  तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण । दुःखी होऊन न करावे अप्रमाण ॥  तुम्ही माझे म्हणविता । मग दुःखी कष्टी का होता ? ॥  उपाधीवेगळे झाला । ऐसे ऐकू द्यावे मला ॥  माझे ज्याने व्हावे । त्याने राम जोडून घ्यावे ॥  दृश्य वस्तूचा होतो नाश । याला मीही अपवाद नाही खास ॥  शेवटी मागणे तुम्हा एकच पाही । नामावाचून दूर कधी न राही ॥ अनुसंधानी चित्त । सर्वांभूती भगवंत ।  नामी प्रेम फार । त्याला राम नाही दूर ॥  मी सांगितल्याप्रमाणे वागावे । राम कृपा करील हे निश्चित समजावे ॥  आता आनंदाने द्यावा निरोप । हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देख ॥  सदा राहावे समाधानी । नको सुखदुःख काळजीचा लेश । माझा झाला जगदीश ।  हा भाव ठेवा निरंतर । राम साक्षी, मी तुम्हापासुन नाही दूर ॥  सर्वांचे करावे समाधान । जे माझे प्राणाहून प्राण जाण ॥  सर्वांनी व्हावे रामाचे । हाच माझा आशीर्वाद घेई साचे ॥  जगाचे ओळखावे अंतःकरण । तैसे आपण वागावे जाण ॥  नामापरते दुजे न मानावे । एका प्रभूस शरण जावे ॥  हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥  विवेक-वैराग्य संपन्न । सदा असो अंतःकरण ॥  अखंड घडो भगवद्‍भक्ति । आत्मज्ञानप्रतीति ।  ब्रह्मस्वरूपस्थिती । नामी निरंतर जडो वृत्ती ॥  मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार । न सोडावा आता धीर ॥  सुखाने करा नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥  २२३. काया गुंतवावी प्रपंचात । मन असावे रघुनाथात ॥
376 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

मंत्र,श्लोक,स्तोत्र

६ ऑगस्ट भगवंताचा आनंद हा निरुपाधिक असतो. प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे. तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळते. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहीजे. जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते ? वास्तविक आपण कशाकरीता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख ! दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो, त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद, तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो. दृष्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे, ती अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठीच वाढवितो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृष्य वस्तूंमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरूपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरीक्त जे स्फुरण तोच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा-दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद, तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय. जो निस्वार्थबुद्धीने प्रेम करतो, त्याला आनंद खास मिळतो. घेणरा 'मी' जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हॄदयात स्वयंभू आहे. वृत्ति वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावे, रामाला आठवावे, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे, "रामा, माझे मन शुद्ध कर. देहबुद्धी देवू नको. तुझे चरण, तुझे हास्य, मला सदा पाहू दे. तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव". रामाला प्रेमाने आळवून, राम परमानंदरूप आहे असे जाणून, त्याच्याशी अनन्य होऊन राहावे. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदाने असावे. २१९. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा.
511 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post