Savita Pisal Konde Deshmukh.(H.S.C.D.ed)🎷🚩📚🛵
1K views
17 days ago
पुढील संपूर्ण लेख हा माझ्या सामाजिक जीवनाच्या मार्गदर्शिका ज्योती रोहिदास टिळेकर, माळीनगर,देहूगाव ,पुणे. यांचा आहे. "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, व्यक्तित्व आणि कर्तृत्व ". एकोणिसाव्या शतकात भारतीय समाज हजारो वर्षापासून जातिभेद, लिंगभेद,अंधश्रद्धा, रूढी परंपरा, सामाजिक विषमतेने ग्रस्त होता. त्याकाळी समतावादी मानवतावादी ,आद्य स्रीसमाज सुधारक, आद्य शिक्षिका, आद्य कवियत्री, धार्मिक, मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात निर्भीडपणे बंड (विद्रोह )पुकारून मानवतावादी, सत्यशोधक समाजाची निर्मितीचे प्रेरणास्थान ,भारतातील प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, समाजातील हजारो वर्षापासून चालत आलेल्या रुढी परंपरे विरोधात बंड पुकारून विधवांना आश्रयस्थान देणाऱ्या अनाथाश्रम व बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करणाऱ्या, पतीच्या निधनानंतर स्वतः प्रेतयात्रेसमोर टिटवे पकडून काळाच्या पुढे धावणारीस्री,साहित्यकार म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय . यांचे व्यक्तिमत्व व कर्तृत्व हे 21 व्या शतकातील महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. क्रांतीज्योती, ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे झाला. तर त्यांचे निधन 10 मार्च 1897 रोजी हडपसर , जि. पुणे येथे झाले . सावित्रीबाई व्यक्तित्व आणि कर्तृत्व : भारतातील पहिल्या शिक्षिका , स्री मुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या, पद दलितांच्या कैवारी, प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्थान आढळ आहे .एका अशिक्षित महिलेने शिक्षण घेऊन शिक्षित बनावे आणि वर्षानुवर्ष अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्या स्त्री क्षूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखवावा ही गोष्ट भारताच्या दोन हजार वर्षाच्या इतिहासात अपूर्व अशी आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करून दुष्काळात अन्नान करून तडफडणाऱ्या हजारो जीवांच्या मुखात घास भरवावा .शेतकरी, सामाजिक सुधारणांसाठी वाङ्मय साधन हाती घेऊन कवियत्री ,लेखिका बनावे.सर्व गाव, सर्व समाज ,सुशिक्षित, सुसंस्कृत करण्याचे स्वप्न, जनावरांप्रमाणे जिने जगणाऱ्या स्री क्षुद्रांना माणसात आणण्याचे वेड घ्यावे.पतीच्या निधनानंतरही शोक करीत न बसता सत्यशोधक समाजाच्या तत्त्व प्रसाराचे कार्य करण्याचे सतीचे वाण घेऊन अविश्रांत काम करावे, दीनदलितांसाठी ,दीनदलितांच्या मुलांसाठी ,रोगांच्या साथी दिवस-रात्र घराबाहेर धावावे.त्यांची सेवा करावी, प्लेगच्या साथीत त्यांना कडेवर घेऊन आपल्या दत्तक मुलगा डॉक्टर यशवंतराव फुले यांच्या दवाखान्यात घेऊन जावे. तेथे प्लेगच्या रोगाला आपण बळी पडत असल्याची जाणीव होऊनही रुग्णांची सेवा करीत राहावी आणि ही सेवा करता करता आनंदात विलीन होऊन जावे .अशा या व्यक्तिमत्त्वास केवळ अलौकिक हे एकच विश्लेषण देता येईल. सावित्रीबाईंच्या कार्य कर्तुत्वाच्या या पटावरून अशी सहज ओझरती नजर जरी टाकली तरी या स्त्रीचे व्यक्तित्व हे सामान्य नव्हते हे सहज लक्षात येते. एका समाज सुधारकाची पत्नी म्हणून त्यांचे एक सवंग अस्तित्व होते .सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना त्यांच्या इहलोकांतील आयुष्याच्या प्रवासापर्यंत साथ दिली, परंतु ही साथ केवळ एका पती परायण स्रीची नव्हती, तर त्यांची प्रेरणा स्वतंत्र अशी होती. सावित्रीबाईंचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झालेला .शिरवळ जवळच्या एका खेड्यात जेथे संपूर्ण गाव शंभर दीडशे उंबरा सापडणे कठीण. गावाला वर्षानुवर्षी दुष्काळाची परंपरा लाभलेली, शिक्षणाचे संस्कार नाही. अशी ही निरक्षर कुटुंबात जन्मलेली, वाढलेली स्री ज्योतिरावांच्या हाताखाली शिक्षणाचे धडे गिरवीते ,शिक्षक प्रशिक्षण घेत आणि ज्ञानदानाचे व्रत घेऊन ज्ञानयोगिनी बनते. फुले दाम्पत्यांनी शाळा काढल्या 1848 ते 1852 या चार वर्षाच्या कालावधीत पुणे आणि पुण्याच्या ग्रामीण परिसरात एकूण 18 शाळा काढल्या आणि त्या यशस्वीपणे चालविल्या. या शाळा चालवण्यासाठी त्यांनी तहानभूक विसरून दिवस रात्र अविश्रांत परिश्रम घेऊन परोपकारी कृत्याचा पिच्छा न सोडता, ज्ञानदानाचा यज्ञ अहोरात्र प्रज्वलित ठेवला. फुले दांपत्याने निर्भीडपणे घडवून आणलेला एक सामाजिक, शैक्षणिक बदल म्हणजे त्या काळातील अशक्य कोटीची गोष्ट होती. मनुष्यत्वासाठी शिक्षण : फुले दांपत्याने शाळा काढल्या परंतु शाळांची जाळी विनीत ते बसले नाही, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. केवळ साक्षर करण्यासाठी त्यांना शिक्षण द्यावयाचे नव्हते, शिक्षणातून त्यांना समाज जागृती करावयाची होती. जुनाट रुढी, अंधश्रद्धा, जुन्या परंपरा, भोळ्या समजुती नाहीशा करावयाच्या होत्या. सामान्य लोक पशुतुल्य जीवन जगत होते. त्यांच्यात मनुष्यत्व कसे आणता येईल याचा सावित्रीबाईंनी विचार केला होता. आपल्या "काव्यफुले" या काव्यसंग्रहात त्या म्हणतात , "शुद्रांना सांगण्याजोगा शिक्षण मार्ग हा! शिक्षणाने मनुष्यत्व ,पशुत्व हाटते पहा" !! मनुष्यासाठी शिक्षण हा मूलभूत विचार सव्वाशे वर्षांपूर्वी मांडणाऱ्या सावित्रीबाई फुले या भारतातील थोर शिक्षण तज्ञ होत. लोकांना माणूस बनविणे, ताठ मानेने उभे राहायला लोकांना शिकविणे, स्वत्व जपण्यास शिकवणे , आणि त्याही पलीकडे माणसाबद्दल प्रेम निर्माण करण्यास शिकविणे एवढा शिक्षणाविषयक व्यापक दृष्टिकोन ह्या लोकोत्तर स्रीच्या ठिकाणी होता. फुले दांपत्यांनी प्रौढ स्त्रियांनी प्रौढ स्त्रियांसाठी जी रात्रीची शाळा सुरू केली होती, त्यामध्ये जावे असा उपदेश ’तृतीय रत्न’ नाटकातून दिला आहे .अशा प्रकारे रूढी परंपरा आणि अज्ञान यांचे उच्चाटन करण्यासाठी या दांपत्याने आपले जीवन सर्वस्व ऐन तारुण्यात कसे समर्पित केले होते याची कल्पना येते. सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य केले , सामाजिक कार्यही केले. दुष्काळात फुले यांनी अन्नछत्रे उघडली आणि हजारो जीवांचे प्राण वाचविले. विधवांचे जिवंतपणी मरणाचे भोग _ त्याकाळी समाजात बालविवाह, जरठ विवाह या चाली सर्रास रूढ होत्या. धर्माच्या नावाखाली रूढी परंपरा यांनी स्त्रियांचे भावविश्वच उध्वस्त करून टाकले होते. स्री जीवनावर वर्षानुवर्ष मनूचा अंमल चालला होता. स्रीया मग त्या उच्चकुलीन ब्राह्मण स्त्रिया असोत किंवा क्षुद्रादीक्षुद्र स्त्रिया असोत, या ठिकाणी मनुने उच्चनीज अशी विषमता निर्माण केली नव्हती. त्याकाळी विधवांची स्थिती भयानक होती. अकाली आलेल्या वैधव्य त्याने तरुण स्त्रिया घरातील सांधी _कोपऱ्यात, फुटक्या कपाळाला दोष देत, उभे जळते आयुष्य ,अश्रू ढाळत व मनाची व शरीराची भडकलेली आग विजू पाहात. हे तत्कालीन आकडेवारीनुसार लक्षात येते सन 1891 च्या खानेसुमारीनुसार महाराष्ट्रात केवळ शून्य ते चार वर्षे वयाच्या विधवा झालेल्या ,आईचे स्तनपानही न सुटलेल्या , शैशवावस्थेतील निरागस कोमल, बालिकांची संख्या 13,878 अशी होती. त्यासाठी या दांपत्याने अनाथआश्रम व बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून पतितोध्दार केला. स्वतः काशीबाईंचे मूल दत्तक घेऊन त्यास कायदेशीर अपत्य मानून, त्यांचे पालन पोषण करून ,त्याला वैद्यकीय शिक्षण देऊन स्वावलंबी बनविले. आपल्या मिळकतीचा सर्व हिस्सा त्याला मिळावा म्हणून मृत्युपत्र करून ठेवले . 1890 साली महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात सत्यशोधक समाजाची धुरा वाहिली . त्यांनी पुणे आणि पुण्याच्या ग्रामीण परिसरात सासवड, ओतूर, जुन्नर या ठिकाणी व्याख्याने देऊन सार्वजनिक सत्य धर्माचा प्रचार प्रसार केला . निर्भीडपणा , निर्भयता ,अंगीकृत कार्यावरील अविचल निष्ठा आणि त्यासाठी समाजाकडून अपमान छळ सोसण्याची जिद्द, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण होते. त्यांनी महात्मा फुलेंना लिहिलेल्या पत्रावरून त्या फुलांना त्यांच्या कार्यात प्रेरणास्थान होत्या असे म्हणणे वावगे ठरणार नाही . तसेच स्वतःच्या भावासही निर्भस्रना करताना फुलांच्या व्यक्तिमत्त्वावर गुणगौरव करताना दिसतात. काळापुढे धावणारी स्री - ज्योतीरावांच्या निधन समयी 1890 मध्ये अंत्ययात्रेमध्ये यशवंताला प्रेतयात्रे पुढे टिटवी (मातीकाचे मडके )धरून न देण्यास भाऊबंदांकडून विरोध झाल्याने स्वतः सावित्रीबाईंनी उरावर धोंडा ठेवून बाईंनी पुरुषाच्या हिमतीने प्रेत यात्रे पुढे हातात टिटवे धरले . सावित्रीबाईंचे काही साहित्य उपलब्ध झाले आहे जसे की सावित्रीबाई यांचा काव्यग्रंथ "काव्यफुले " : काव्यफुले हा सावित्रीबाईंचा काव्यसंग्रह म्हणजे त्यांची पहिली साहित्यिक रचना. यामध्ये मोडीतील 41 कविता समाविष्ट आहेत. या कविता स्थूल मानाने सात प्रकारच्या आहेत. 1) निसर्गविषयक ,2)सामाजिक, 3) प्रार्थनापर, 4) आत्मपर , 5) काव्यविषयक, 6) बोधपर ,7) इतिहासविषयक आणि स्फुट कविता. काव्यफुले यामध्ये सावित्रीबाईंनी अनेक रूढी परंपरा विरोधात ,मनुस्मृतीच्या विरोधात ,पेशवाई विरोधात ,शुद्रांच्या परावलंबनावर आधारित ,शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या कविता केल्या. इंग्रजी माऊली, नवस, शूद्र शब्दाचा अर्थ, इंग्रजी शिका या विषयावर अभंग रचना केल्या आहेत. यामध्ये काही अनुष्टभ,ओव्या, पद्य ,दिंडी ,अष्टमात्री ,अक्षर छंद, वसंततिलका अशा प्रकारातील काव्य साहित्य आहे . 2) बावन्नकशी सुबोध रत्नकार _ सावित्रीबाईंनी आपल्या पतीचे चरित्र काव्य स्वरूपात या संग्रहात दिले आहे.” सावित्री ज्योतिबा विरचित अथ बावन्नकशी सुबोध रत्नकार" असे या काव्य पुस्तकाचे नाव आहे . महात्मा फुलेंचे अधिकृत असे हे पहिलेच काव्यमय चरित्र होय. यामध्ये 52 कडवे आहेत. यामध्ये सावित्रीबाईंनी मोडी मध्ये स्वाक्षरी केली आहे. 3) सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेली पत्रे _ या पत्रांची संख्या तीन असून त्यातील 1)पहिले पत्र - 10/ 10 /1856 रोजी लिहिले आहे. माहेरी भावाला कडाडून विरोध, विद्येचे महत्त्व, फुल्यांची विद्वत्ता, इंग्रजांनी फुल्यांचा केलेला गुणगौरव ,सत्कार याविषयी माहिती भावास दिलेचा उल्लेख तसेच फुल्यांना हे काम अखंडपणे निर्भीडपणे चालू ठेवण्याचा प्रेरणा या पत्राद्वारे दिली आहे दुसरे पत्र - 21 /8 /68 नायगाव खंडाळा सातारा वरून _ या पत्रामध्ये सावित्रीबाईंनी फुल्यांना एका घटनेची माहिती सांगितली आहे. सावित्रीबाईंनी एका गणेश नामक ब्राह्मण व गावातील एका वयात आलेल्या मुलीतील प्रेम संबंधातून ती मुलगी सहा महिन्याची गर्भवती असल्याने गावातील टवाळखोरांनी या उभयतास मारहाण करत गल्लीबोळातून धिंड काढली. या भयंकर घटनेचा सावित्रीबाईंनी एकटीने विरोध केला व त्या टवाळखोर लोकास इंग्रजांची भीती दाखवून हे क्रूर कर्म होण्यापासून वाचवले. त्या उभयतांनी सावित्रीबाईंना देवी मानून पाया पडले व त्या उभयतांना त्यांनी फुल्यांकडे पुण्यात पाठवून दिल्याचा उल्लेख आहे . तिसरे पत्र - 20 /4/ 1877 ओतूर ,जुन्नर वरून - 1876 साळी ओतूर ,जुन्नर येथे पडलेल्या दुष्काळातील सत्यशोधक मंडळींनी केलेल्या कार्याचा आढावा, इंग्रजांनी 50 सत्यशोधक पकडून नेले ,त्यांची बाजू कलेक्टर समोर सावित्रीबाईंनी मांडली व त्यांना सोडविले कलेक्टर कडून चार गाड्या ज्वारीची मदत मिळवली. अशा पद्धतीने दुष्काळात केलेल्या कल्याणकारी कार्याचा आढावा त्या फुलांना सांगत आहेत . 4)मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी - यामध्ये उद्योग ,विद्यादान, सदाचार ,व्यसनी, कर्ज या विषयावर आधारित भाषणे आहेत. 5)ज्योतिबांची भाषणे - सावित्रीबाईंनी शिळाछापावर भाषणे छापून प्रसिद्ध केली आहेत. 6) शिव महिन्म स्तोत्र - सावित्रीबाईंनी संस्कृत पोथीवरचे रूपांतर मोडी लिपी मध्ये केले आहे. यामध्ये शंकराचे वर्णन समाविष्ट आहे .ही रचना ओवीबद्ध आहे . 7) सावित्रीबाईंच्या संग्रहातील उपलब्ध झालेले इतर साहित्य - यामध्ये ग्रहलाघव, म्हणी विषयी चार शब्द ,शुक्रबाहत्तरी, हिंदुस्थानचा इतिहास, नीतिशतक, अथ सांगरुद्र प्रारंभ ,भूगोल पत्रक( मुंबई इलाख्याचे ) , शालापत्रक (अंक चार), सिंहासन बत्तीशी, गद्य रत्नमाला ,ईसापनीती, सॉक्रेटिसचे चरित्र . एकविसाव्या शतकामध्ये सावित्रीबाईंच्या कार्याचा ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्टिकोनातून अभ्यास करून आजही महिलांसाठी आदर्श असणारे व्यक्तिमत्व आणि कर्तुत्व म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय. सावित्रीबाई फुले यांचे व्यक्तित्व हे धैर्य ,करुणा ,विवेक आणि समतेच्या मूल्यांनी समृद्ध होते. त्यांचे कर्तृत्व केवळ शिक्षण क्षेत्रापुरते मर्यादित नसून सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि स्री स्वातंत्र्याच्या व्यापक संदर्भात महत्वपूर्ण आहे .त्यांनी आपल्या कविता, लेखन ,आणि सामाजिक कार्यातून शोषित, वंचित आणि उपेक्षित समाज घटकांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. त्या क्रांतिकारी विचारवंत होत्या. त्यांनी स्त्री शिक्षण, दलित शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री पुरुष समानता यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आहे. हा विचार त्यांनी प्रत्यक्षात कृतीतून समाजासमोर मांडला आहे . #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #👌प्रेरणादायी स्टेट्स #🗓️सावित्रीबाई फुले जयंती🌸 #👧Girls status