*केईएम हॉस्पिटल शंभर वर्षाचं झालं..!*
काल २२ जानेवारी, २०२६.
कालपासून बरोबर १०० वर्षांपुर्वी, म्हणजे शुक्रवार, दिनांक २२ जानेवारी १९२६ या दिवशी ब्रिटिश बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते परळच्या 'केईएम हॉस्पिटल आणि शेठ जीएस मेडीकल कॉलेज'चं उद्घाटन झालं.
सामान्य मुंबैकरांच्या भाषेतलं हे 'केम' हॉस्पिटल
मुंबई महानगरपालिकेचं हे पहिलं हॉस्पिटल व मेडीकल कॉलेज आणि केवळ गिरणी कामगार व गरीब नागरीकांना नजरेसमोर ठेवून बांधण्यात आलेलंही हे देशभरातलं पहिलंच हॉस्पिटल.
बॉम्बे गव्हर्नमेंटशी जवळपास ३०-३५ वर्षांचा दीर्घकाळ लढा देऊन १९०७ सालच्या सप्टेंबर महिन्यात मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहराची आरोग्य सेवा आपल्या नियंत्रणाखाली घेतली आणि त्यानंतर मुंबईकरांसाठी मुंबई महानगरपालिकेने बांधलेलं हे पहिलंच हॉस्पिटल आणि स्वतःचं सुसज्ज हॉस्पिटल व मेडीकल कॉलेज असलेली मुंबई महानगरपालिकाही पहिलीच.
आज मुंबई महानगरपालिकेची मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरं मिळून एकूण ४ मोठी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजं, १७ उपनगरीय हॉस्पिटल्स (घाटकोपरचं राजावाडी, वांद्र्याचं भाभा, बोरीवलीचं भगवती इ.), जवळपास १९० दवाखाने, ‘आपला दवाखाना’ या योजनेंतर्गत असलेले अदमासे ४०० दवाखाने, ३० प्रसूती केंद्र, सर्वधर्मीय ७५ स्मशानं अशी प्रचंड विस्तारलेली जी आरोग्यसेवा आज आपल्या डोळ्यांना दिसते आणि अनुभवायला येते, त्याची सुरुवात शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर १९०७ या दिवशी झाली आणि तिची गंगोत्री म्हणजे केईएम हॉस्पिटल..!
साधारण इ.स. १९८०-९० पर्यंत हे हॉस्पिटल म्हणजे आजारी मुंबईकरांच्या (आणि महाराष्ट्रातल्याही) आयुष्यातला शेवटचा शब्द होता. माणूस कितीही आजारी असो, त्याला केममध्ये नेला की तो हमखास बरा होतो असा तेंव्हाच्या मुंबैकरांचा विश्वास होता आणि तो केमने कधीही खोटा ठरवला नाही. सामान्य मुंबंईकरांचा तो विश्वास आजही कायम आहे.
हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या वेळी गव्हर्नर विल्सन म्हणाले होते, "“किंग एडवर्ड (सातवे) मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ गोरधंदास सुंदरदास मेडिकल कॉलेज या दोन संस्था मुंबई शहरातील लोकांसाठी आणि संपूर्ण प्रांतासाठीही अत्यंत उपयुक्त आणि मोलाची मदत करणाऱ्या ठरतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. या संस्था केवळ मुंबईचाच नव्हे, तर संपूर्ण भारताचा अभिमान बनतील" त्याचे हे शब्द केईएमने खरे ठरवले आहेत..!
केईएमला माझा मनाचा दंडवत..
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान
#श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🤩खरी मैत्री #🙏 प्रेरणादायक बॅनर