*राधिका…*
वय फक्त बावीस वर्षं.
स्वप्न मोठं एक नामांकित वकील होण्याचं.
पण रोज सकाळी कॉलेजला जाताना तिला न्यायालयाची नव्हे तर समाजाच्या नजरेची लढाई लढावी लागते.
ती घरातून बाहेर पडते, व्यवस्थित जीन्स-टॉप घालून.
आई तिच्याकडे पाहते आणि म्हणते
"थोडं सैल कपडे घाल, लोक काय म्हणतील?"
राधिका हसते. पण मनात विचार येतो
"लोकांना माझ्या डोक्यात काय आहे ते कधी दिसेल? की नेहमी माझं शरीरच दिसणार?"
रस्त्यावर पोहोचल्यावर काही मुलं मागून शिट्ट्या मारतात.
कुणी तरी हळूच कुजबुजतं
"बघ कशी हिची चाल आहे, जरा हसली तर नंबर मिळेल."
राधिका डोकं खाली घालते, कानात हेडफोन लावते.
पण शब्द हे हेडफोन भेदून हृदयात पोहोचतात.
कॉलेजच्या वर्गात प्राध्यापक बोलत असतात "संविधानात समानतेचा अधिकार आहे."
आणि त्याच वर्गात एक मुलगा वहीवर लिहितो "हिचे curves जबरदस्त आहेत."
समानतेचा अधिकार पुस्तकात आहे, वास्तवात नाही हे राधिकेला रोज कळतं.
रात्री घरी परतताना राधिकेला भीती वाटते.
गल्लीच्या टोकाला काही पुरुष उभे असतात.
ते तिच्याकडे बघून हसतात, डोळ्यांनी कपडे फाडतात.
ती घाईघाईने घरी शिरते.
आई विचारते "काय गं, एवढ्या घाईत का?"
पण ती उत्तर देत नाही. कारण हा अनुभव फक्त "बाई" झाल्यामुळे आहे, हे आईलाही ठाऊक आहे.
*समाजाची विडंबना*
एखादी अभिनेत्री बोल्ड कपड्यात नाचली की टाळ्यांचा कडकडाट.
पण एखादी साधी मुलगी जीन्स घालून फिरली की तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह.
मोठ्या मॉलमध्ये बाईने sleeveless घातलं तर "modern".
गावात बाईने घातलं तर "बेगडी".
प्रश्न कपड्यांचा नाही प्रश्न मानसिकतेचा आहे.
स्त्रीचा माणूसपणा कुठे हरवला?
एखादी बाई हसली की म्हणतात "डोळा मारतेय."
एखादी बाई रागावली की म्हणतात "अति बडबड करते."
एखादी बाई यशस्वी झाली की म्हणतात "कुणाच्या जोरावर वर आली."
तिचं नाव, मेहनत, अभ्यास काहीही महत्त्वाचं नाही.
महत्त्वाचं फक्त तिचं शरीर.
*खरी गरज*
आज स्त्रीला मोठे स्तन, भरदार नितंब, गोरेपणा किंवा सडपातळ कंबर यावरून मोजणं थांबवायला हवं.
तिच्या मेंदूला, मेहनतीला, कर्तृत्वाला मान द्यायला हवा.
कारण बाईही माणूस आहे.
बाईलाही स्वप्नं आहेत.
बाईलाही सुरक्षित आयुष्य हवं आहे.
*समाजाला प्रश्न*
1. स्त्रीला तिच्या कपड्यांवरून, अंगावरून, हसण्यावरून मोजणं कधी थांबवणार?
2. "बाई" म्हटल्यावर ताबडतोब शरीराची कल्पना न करता "माणूस" म्हणून कधी स्वीकारणार?
3. आपली नजर जर शुद्ध आणि निर्मळ झाली, तर स्त्रीला अजून लढावं लागेल का?
बरं झालं पुरुषा,
तुला मोठे स्तन नाहीत, म्हणून तुला या नजरेचं ओझं सहन करावं लागत नाही.
पण जर खरंच पुरुष असलास तर,
स्त्रीला तुझ्या नजरबंदीमधून मुक्त कर.
तिला नग्न नजरेनं नाही, तर निर्मळ मनानं पाहायला शिक.
त्या दिवशी स्त्रीही
मोकळ्या श्वासानं हसेल,
तिच्या स्वप्नांना पंख फुटतील,
आणि समाज खरंच समाज बनेल
फक्त पुरुषप्रधान बाजारपेठ नव्हे... #स्त्री ##🌹🌹स्त्री सौंदर्य🌹🌹 #स्त्री आरोग्य #स्त्री #स्त्री केंद्रित चित्रपट
