#श्री दत्तात्रेय जयंती श्री गुरूदेव दत्त
❝ दत्त महाराजांना गायन फार प्रिय आहे.. ❞
।। श्रीगुरु:शरणम् ।।
।। श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः ।।
।। श्री दत्तमहात्म्य ।।
पण मग या गायनात, वादन समाविष्ट नाही का ? तर अवश्य आहे. ज्याला शक्य होईल, त्याने वाद्यांचा मेळ अवश्य जमवावा. गायनात एखादे वाद्य सोबत असले की, त्याला लय मिळते आणि गायन बहारीचे होते. दत्त महाराजांच्या काकड आरती ते शेजारती पर्यंत, सर्वत्र या वाद्यांचा उल्लेख आहे.
"ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा ।।" गुरुभक्तांच्या ह्या काकड आरतीत,
द्वारी चौघडा वाजे वाजंत्री वाजती ।।
कर्णे वाजंत्री वाजती ।।
असा वाद्यांचा उल्लेख आहे, तर "अपराध क्षमा आता केला पाहिजे.." या पदात...
नकळेचि टाळ वीणा वाजला कैसा ।।
असा वाद्यांचा उल्लेख आहे.
आपल्या संस्कृतीत हजारो वर्षे, अशी वाद्ये कायम गायनाला साथ देत आहेत. गुरुचरित्रात सहाव्यात रावणाने भगवान महादेवांना प्रसन्न करताना गायन केले, तेव्हा त्याने एक वाद्य तयार केले. कसे तर --
शिर कापून आपुले देखा लल। यंत्र केले करकमळिका लाल। शिरा काढून तंतुका । रावणेश्वर गातसे ।। (गु. च. - अध्याय ६/७१)
वाद्ये हा प्रकार फक्त इथे भूमीवरच आहे, की देवलोकात देखील वाद्ये वाजवून गायन केले जाते ?
दत्त माहात्म्यात, ब्रह्मलोकात झालेल्या उत्सवाचे वर्णन आहे. (हे वर्णन सात गाथेतील एक गाथेत आले आहे.) या गाथेत, गंधर्व गायन करत असताना, सोबत झालेल्या वादनाचे वर्णन आहे. कशी वाद्ये होती त्यात ?
मृदूंगादि आनद्ध वाद्ये -- म्हणजे चामड्याचे आच्छादन असलेली वाद्ये. वीणादिक तंतुवाद्ये, मुरलीप्रमुख सुषिर वाद्ये अर्थात छिद्र असलेली वाद्ये आणि घनवाद्ये अर्थात अशी वाद्ये जी एकदुसऱ्यावर आपटून ध्वनी उत्पन्न करतात. उदा. -- झांजा, चिपळ्या वगैरे. (द. मा. - अध्याय ८/९३)
दत्त माहात्म्यात, देवलोकातील जसा या वाद्यांचा उल्लेख आहे, तसाच पाताळ लोकातील नागांनी ही वाद्ये कशी वापरली, याचा उल्लेख आहे. अलर्क आख्यानात मदालसेला पुन्हा प्राप्त करायला, अश्वतर आणि कंबल हे दोन नाग कैलास प्रांतात गेले. हेतू हा की, भगवान महादेवांना प्रसन्न करावे, आणि त्यांच्या वरदानाने पुन्हा मदालसेला प्राप्त करावे. या वेळी या नाग द्वयाने आधी सरस्वतीला प्रसन्न करून, गायन कला प्राप्त केली आणि या गायन कलेने भगवान महादेवांना प्रसन्न करावे म्हणून, ते कैलास प्रांतात आले. भगवान महादेवांना प्रसन्न करताना त्यांनी केलेल्या गायनाबरोबर, वाद्ये वाजवून मेळ जमवल्याचा उल्लेख आहे.
दत्त महाराजांना गायन प्रिय आहे आणि त्या गायनात वाद्याने लय जरी प्राप्त होत असली, तरी नेहेमी हे कसे करावे ?
आधी एखादे वाद्य घेऊन, ते वाजवायला शिकणे आणि त्याचा गायनाबरोबरीने उपयोग करणे. हे जरी उत्तम असले तरी, नेहेमी वाद्य बाळगणे शक्य असतेच, असे नाही. पण मग अशा वेळी काय करावे ? अहो, टाळी नाही का वाजवता येत ? आरत्या म्हणताना, आपण या हातांचाच तर वाद्य म्हणून उपयोग करतो. महाराज नित्य भावाला महत्व देतात, हे जाणून गायन वादन अवश्य करावे.
श्रीगुरुदेव दत्त !!
══✿══╡जय दत्त╞══✿══


