"मॅडम, तुमची फ्लाईट दोन तासात आहे..." पीएने आठवण करून दिली. ईशाने डोळ्यावरचा चष्मा काढला. लंडनच्या ५० व्या मजल्यावरून खाली बघताना तिला आज खूप रिकामं वाटत होतं. तिच्या वडिलांचं, सदाशिवरावांचं काल रात्री पुण्यात निधन झालं होतं. ईशा एक यशस्वी बिझनेस वूमन होती. पण गेल्या १० वर्षांत ती एकदाही वडिलांना भेटायला भारतात आली नव्हती. कारण? कारण होता तो १० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस.
ईशाला अमेरिकेतल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती. फी होती २५ लाख रुपये. सदाशिवराव एक साधे कारकून. ईशाने हट्ट धरला होता, "बाबा, लोन काढा, घर गहाण ठेवा, पण मला अमेरिकेला जायचंच आहे."
सदाशिवरावांनी स्पष्ट नकार दिला होता.
"ईशा, आपली ऐपत नाही ग. मी घर गहाण ठेवू शकत नाही. तुझं लग्न, तुझा भाऊ, म्हातारपण... मी रिस्क घेऊ शकत नाही."
ईशा संतापली होती.
"तुम्ही भित्रे आहात! तुम्हाला माझ्या प्रगतीची जळजळ होते. मला तुमची मुलगी म्हणवून घ्यायची लाज वाटते."
असं म्हणून ईशाने घर सोडलं होतं.
तिने रागाच्या भरात एका ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळवली आणि ती अमेरिकेला निघून गेली.
जाताना तिने बापाच्या तोंडावर पाहिलंही नव्हतं. गेल्या १० वर्षात तिने स्वतःला सिद्ध केलं, करोडो रुपये कमावले, पण बापाला एक फोनही केला नाही.
वर्तमान:
ईशा पुण्यात पोहोचली. जुनाट वाडा तसाच होता. दारात मोजकी लोकं होती. सदाशिवरावांचा देह अंगणात ठेवला होता. ईशाने पाहिलं, बापाच्या अंगावरचा सदरा जुनाच होता, जो १० वर्षांपूर्वी तिने पाहिला होता.
तिला रडू आलं नाही, फक्त एक विचित्र ओझं वाटलं. विधी उरकले. लोकं पांगली. शेवटी घरात ईशा आणि सदाशिवरावांचे जुने मित्र, वकील देशपांडे काका उरले. देशपांडे काकांनी ईशाच्या हातात एक जुनी, फाटकी डायरी आणि एक पासबूक दिलं.
"ईशा, सदाने हे तुझ्यासाठी ठेवलंय."
ईशाने उपहासाने विचारले, "काय असणार यात? हिशोब? की मी किती वाईट वागले याच्या तक्रारी?"
काका गंभीर झाले. "वाच तू. तुला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील."
ईशाने डायरी उघडली. हळूहळू वाचू लागली.
काहीवेळाने आलं ते पान - तारीख १० वर्षांपूर्वीची.
"आज ईशा रागावून गेली. ती मला भित्रा म्हणाली. पण तिला कसं सांगू, की ज्या घराला गहाण ठेवायला ती सांगत होती, ते घर तर मी तिच्या इंजिनिअरिंगच्या वेळीच विकलं होतं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहतोय, हे तिला कळलं असतं तर तिला गिल्ट (अपराधीपणा) वाटला असता. म्हणून मी खोटं बोललो."
ईशाच्या हाताला कंप सुटला. तिने पुढचं पान उलटलं. "आज ईशाला अमेरिकेच्या 'ज्ञानदीप ट्रस्ट' ची २० लाखांची स्कॉलरशिप मिळाली. ती खूप खुश आहे. तिला वाटतंय तिच्या हुशारीवर मिळाली. बरंच झालं. तिला हे कधीच कळू नये की 'ज्ञानदीप ट्रस्ट' मध्ये मी माझ्या PF चे सगळे पैसे, आणि गावी असलेली वडिलोपार्जित जमीन विकून जमा केलेत. तिला वाटेल बापाने मदत नाही केली, ती माझा तिरस्कार करेल... पण चालेल. माझा तिरस्कार करून का होईना, पण ती जिद्दीने शिकेल. ती माझ्या उपकाराखाली दबली असती तर आकाशात उडू शकली नसती."
ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. ती ज्याला 'स्कॉलरशिप' समजत होती, ते तिच्या बापाचं रक्त आणि घाम होतं?
ज्या बापाला तिने 'भित्रा' आणि 'कंजूस' म्हटलं होतं, त्याने स्वतःचं म्हातारपण विकून तिचं भविष्य विकत घेतलं होतं?
ती रडत रडत शेवटच्या पानावर आली. तारीख - २ दिवसांपूर्वीची.
"ईशा, आज डॉक्टर म्हणाले माझ्याकडे २ दिवस आहेत. तू खूप मोठी झाली आहेस. टीव्हीवर तुझा फोटो बघतो तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. बाळा, तुझा राग अजून गेला नसेल, पण एक सांगतो... मी तुला पैसे दिले नाहीत असं नाटक केलं, कारण तुला 'बापाच्या पैशावर जगणारी मुलगी' नाही, तर 'स्वतःच्या हिंमतीवर उभी राहिलेली स्त्री' व्हायचं होतं. तू जिंकलीस बाळा. मी हरलो, पण मी आनंदाने हरलो.
फक्त एक खंत आहे... मरताना एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं.
तुझा 'कंजूस' बाबा."
ईशाने डायरी छातीशी कवटाळली. ती जमिनीवर कोसळली आणि ओक्साबोक्शी रडू लागली.
"बाबा... बाबा उठा ना... मला माफ करा... मी चुकले..."
तिचा आक्रोश त्या रिकाम्या घरात घुमत होता. आज तिच्याकडे करोडो रुपये होते, जगातल कुठलंही सुख ती विकत घेऊ शकत होती.
पण ज्या माणसाने स्वतःची राख करून तिला प्रकाश दिला होता, त्या बापाची एक 'भेट' आता ती जगातल्या कुठल्याच दौलतीने विकत घेऊ शकत नव्हती. बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते.
त्यांना माहिती होतं, सदाशिवरावांनी शेवटचे १० वर्षे फक्त 'चटणी-भाकरी' खाऊन दिवस काढले होते, जेणेकरून ईशाला परदेशात कधी पैशाची कमी पडू नये म्हणून ते गुपचूप तिच्या खात्यात पैसे पाठवत होते.
ईशाला आता कळलं होतं...
बाप कधीच गरीब नसतो, फक्त त्याची श्रीमंती मोजायची ताकद आपल्याकडे नसते.
आई-वडिलांच्या नकारामागे अनेकदा असा त्याग लपलेला असतो, जो आपल्याला उशिरा समजतो. जोवर ते आहेत, तोवर त्यांची कदर करा. कारण एकदा वेळ निघून गेली, की पश्चातापाशिवाय हाती काहीच उरत नाही.
#हृदय स्पर्शी #हृदय स्पर्शी लेख


