ShareChat
click to see wallet page
search
दत्त महाराजा ,दैवत म्हणून असलेला आदरभाव ,सखा या नात्यात देखील आहे . गीर्वाण भाषेत असलेले स्तुतीपर आणि आवाहनपर मंत्र अत्यंत प्रभावी जरी असले तरी माझ्या मनी तुझी येणारी आठवण हि त्या मंत्रांसारखीच प्रभावी आहे . तुझ्याशी मनात होणारा नित्य संवाद हा वैखरीने नसला तरी तो तू जाणतोस कारण तू हृदयस्थ आहेस . आणि बरं का भगवंता , ह्या जन्मीच केवळ तू सोबत आहेस असे नाही तर मागील अनेक जन्म हे तुझ्या संगतीत / सोबतीने राहिलो आहे . तुझ्या विषयी तेव्हा फार काही जणू शकलो नाही पण कधी रस्त्याकडेला ,कधी मठाबाहेर ,कधी संगमावर असे तुझे दर्शन मी हात जोडून घेत असे . तेव्हा घडलेले दृष्टिक्षेप आणि मंदस्मिताने झालेली कृपा आज या जन्मात फलद्रुप झाली आहे हे निश्चित . तुझ्याविषयी केलेली चौकशी तुला आवडत नाही हे माझ्या पक्के लक्षात आहे .नृसिंहवाडीला गुरुभक्तानी तुझी जन्मतिथी विचारताच तुझे उत्तर आले पण त्यांच्याकडे तू पुन्हा येणे मात्र केले नाहीस ,म्हणून मी तुझ्या कालमानाविषयी अधिक काही जाणत नाही .पण हि माहिती नसल्याने माझ्या सख्य भक्तीत बाधा येत नाही . तुझ्या स्वरूपाविषयी मात्र नित्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतो पण प्रत्येक वेळी दिसलेले वेगळे रूप पाहता अनेक जन्म हे जाणून घेणे सुरूच राहणार आहे . शेष तुझे रुप आणि गुणवर्णन करताना दुजिव्हा झाला तिथे मी काय पुरा पडणार ? तुझ्या लीलांचे वर्णन करणे हा माझा आनंद आणि विरंगुळा आहे . तुझे भक्त भेटताच मी अनेक आख्यानांना सुरुवात करतो आणि त्यांच्याकडून त्याच कथा पुन्हा ऐकतोही .भक्तांना कायम राखणारा असा तू नेहेमीच त्यांच्या रक्षणार्थ धाव घेतोस आणि ह्या लीला पाहता मला संकटांची भीती वाटत नाही . भयालाही भय देणारा असा तू आहेस . भक्ताला कधी शाप देताच तो तू स्वतः आपल्यावर घेतोस ,भक्ताला उद्दामपणे विचारताच खांबातून प्रकट होतोस ,भक्ताचा वध करताच तिथे प्रकट होत त्याला राखतोस ,प्रत्येक रूप तुझे मनाला भावणारे आहे . एखाद्या जन्मी फार दुर्लभतेने मिळणारा मनुष्य देह तुझ्या कृपेने मला वारंवार लाभल्याने तुझे काही अंशी ज्ञान होऊ शकले . या मनुष्य देहात असताना नित्य येणाऱ्या नाना आपत्ती ह्या तुझ्या लीला आहेत हे मला ठाऊक झाले आहे त्यामुळे आपत्ती येताच आता पुढे यात तुझी काय बरं लीला असेल ? याची मला उत्सुकता असते .काही काळातच तुझे कराल नृसिंहरूप या आपत्तींना सहज गिळंकृत करते आणि आपली भक्तवत्सलता दाखवते . आपत्तींना विदीर्ण करणारे हे रूप मला मात्र प्रल्हादाप्रमाणे जवळ घेते आणि मला दत्त या नामाची महती पटते ,भक्ताभिमानी हे बिरुद सत्य आहे . श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य #श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏 - ShareChat