🌹🌹आपलंच आयुष्य 🌹🌹महातारांगण
आयुष्याच्या या वळणावर,
दिसू लागले दिवे मिणमिणते,
दिवसेंदिवस होत चालले कमी आयुष्य,
बोनस लाभला आजचा दिन....
भूतकाळ विसरून गेले,
भविष्याची चिंता नुरली,
वर्तमानी आनंद लुटत,
बालकासम स्वच्छंद हुंदडते....
तरीही कधीकधी कानी येते,
वयोमर्यादा संभाळावी लागते,
हाड मोडले,लचक भरली,
पुन्हा न राहू शकेन उभी.....
थोडा व्यायाम, थोडा आराम,
मोजका आहार, थोडा विहार,
एकांत सराव, ईश्वराचे नाम,
जीवन जगणे शांत निरामय....
मनी वसावी तृप्ती समाधान,
अंतरी फुलवावे आनंदवन,
सावधान, जागृत,कार्यरत,
बुध्दीने वेचावे ज्ञानकण......
मनमोकळे मनात हसावे,
नाचगाणे मनानेच करावे,
अंत:करण हिरवेगार असावे,
आयुष्यात मनाला फुलवावे....
सावकाश करावी हालचाल,
मोजूनच बोलावे बोल,
चाल चालावी मंद मंद,
आयुष्याच्या या वळणावर...
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🤗 जुन्या आठवणी #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास #आयुष्य
🌹🌹 मातृ पितृ देवो भव 🌹🌹
"आई + वडील हेच जीवन "
आई वडिल म्हणजे नक्की काय असत १ आयुष्य जगण्यासाठी देवान दिलेल ॲडव्हान्स पाठबशळ असत . तुमच्या प्रत्येक दिवसात त्यांनी आपल स्वप्न पाहिलेले असत तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरना पर्यंत त्यांनी आपल आयुष्य खर्च केलेल असत . आई तुमच्या आयुष्याच्या गाडीच योग्य दिशा देणार स्टिअरिंग असत ., तर अचानक आलेल्या संकटात सावरायला "वडील " म्हणजे अर्जट ब्रेकचा पर्याय असतो . आईच प्रेम हे रोजच्या कामाला येणार "बँक बॅलन्स " असत, तर वडील म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस किंवा व्हेरिएबल पेमेंट असते, आई म्हणजे तुम्हाला सतत जोडणार मोबाईल नेटवर्क असत, आणि कधी ते नेटवर्क थकल तर वडील अर्जट Sms असत .
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातल ॲन्टीव्हायरस असत, तर शोधून काढलेले व्हायरस संपवायच वडील हे "क्वॉरनटाईन" बटण असत . आई म्हणजं तुमच्या आयुष्यातल शिक्षणाच विद्यापीठ असत, तर वडील म्हणजे तुमच्या आयुष्यातील चालती बोलती अनुभवाची फॅक्टरी असते, आई न्हणजे तुमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्याई असते, तर वरील म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळविलेली कमाई असते,, आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला मार्गदर्शक गुरु असते . तर दाखविलेल्या वाटेवर वडील हा जवळचा मित्र असतो ., आई म्हणजे साक्षात भगवंत " परमेश्वर असतो, तर परमेश्वरा पर्यंत पोहचवायला वडील एक संत असतो आईम्हणज तुमचे शरीर / मेंदू / काळीज ' आणि मन असत, तर वडील म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरबळ . / हाड न हाड असत .
कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य आई sss असत,, आणि भले मोठे संकट आले की उच्चारात बापरे बाप असत ., परमेश्वर समोर आला तरी विट फेकणाऱ्या पुंडलीकाच मन असत, त्याच्या आई बापाच्या रूपात विठ्ठलाने स्वतःलाच तिथे पाहिलेल असत .
म्हणून म्हणतो परमेश्वर ' अध्यात्म . भगवंत हे सगळ अजब गणित असत, त्या सगळ्या पर्यंत पोहचवणार " आईवडील " हे कनेक्शन असत,, आईवडील म्हणजे न कळत मागे आलेली मायेची सावलीअसते. उगाच नाही आपल्या संस्कृतीत "मातृ देवोभव " पितृ देवोभव " असे म्हणतात .
आईवडील असून सुद्धा जर ते आपल्या सोबत रहात नसतील, तर या जगातील तुम्ही नतदृष्ठ आहात, सर्वांत महान सुख ' शांती " समाधान व आनंदा पासून वंचित आहात
खरच आईवडिलांच्या सेवेसाठी कधीही नाही म्हणू नका . कारण आपण हे जग पहातोय ते आईवडीला मुळे च .🙏🙏
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #👨👩👧👦आई-बाबा #आई #आई थोर तुझे उपकार #आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही
अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही
🌹🌹भोगी🌹🌹
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा 'भोगी' हा सण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या सणाचे महत्त्व, परंपरा आणि त्यानिमित्ताने बनवल्या जाणाऱ्या विशेष खाद्यपदार्थांची आणि या सणाची माहिती देणारा लेख. दरवर्षीप्रमाणे यंदा १३ जानेवारी रोजी अर्थात मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करायची आहे आणि १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा सण साजरा करायचा आहे.
'भोगी' म्हणजे उपभोगाचा सण. 'नको रे ओढू, नको रे ताणू, आनंदाने भोगी मांडू' असे म्हणत हा सण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि शरीराचे पोषण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
भोगीची विशेष भाजी (खेंगट)
भोगीची विशेष भाजी (खेंगट)
भोगीच्या दिवशी घराघरात एक विशेष मिश्र भाजी बनवली जाते, ज्याला 'खेंगट' किंवा 'भोगीची भाजी' म्हणतात. या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हिवाळ्यातील सर्व ताज्या भाज्यांचा वापर केला जातोः
घटकः ओले हरभरे, पावटा, वांगी, घेवडा, गाजर, वाटाणा आणि शेंगदाणे.
तिळाचे महत्त्वः या भाजीत भरपूर प्रमाणात तीळ वापरले जातात. तीळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतात.
तिळाची बाजरीची भाकरी
भोगीला केवळ भाजीच नाही, तर तिळाची बाजरीची भाकरी आणि लोणी या जोडिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाजरी आणि तीळ या दोन्ही गोष्टी शरीराला ऊर्जा आणि उष्णता देतात. या दिवशी मुगाची डाळ घातलेली मऊ खिचडी देखील अनेक ठिकाणी बनवली जाते.
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
१. इंद्राची पूजाः पौराणिक कथेनुसार, हा दिवस देवराज इंद्राला समर्पित आहे. इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडून समृद्धी आणली, म्हणून त्यांचे आभार मानले जातात. २. साफसफाई आणि मंगल स्नानः भोगीच्या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ केले जाते. अभ्यंगस्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे परिधान केले जातात. अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. ३. कचरा जाळण्याची परंपरा (कचरा टाळा, नकारात्मकता जाळा): काही ठिकाणी जुन्या आणि अनावश्यक वस्तू जाळण्याची परंपरा आहे. याचा अर्थ आपल्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता जाळून नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करणे असा होतो.
"भोगी न्हावा आणि नशिबी यावा"
ग्रामीण भागात अशी म्हण आहे की, जो भोगीचा सण आनंदात साजरा करतो, त्याचे पूर्ण वर्ष आरोग्यपूर्ण आणि समृद्ध जाते. निसर्गातून जे मिळते ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची ही पद्धत आपली कृषी संस्कृती दर्शवते.
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #भोगी शुभेच्छा #भोगी #भोगी आणि मकर संक्रांत #मकर संक्रात तिळगुळ घ्या गोड गोड बोला
🌹🌹गुलजारी लाल नंदा 🌹🌹
भारताचे माजी पंतप्रधान...
घरमालकाने त्याला भाडे न दिल्याने ९४ वर्षीय भाडेकरू वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले. म्हाताऱ्याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी, प्लास्टिकची बादली आणि घोकंपट्टी वगैरे शिवाय काहीही सामान नव्हते. म्हातार्याने मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली. शेजाऱ्यांनाही म्हातार्याची दया आली आणि त्यांनी घरमालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ दिला. घरमालकाने अनिच्छेने त्याला भाडे भरण्यासाठी थोडा वेळ दिला.
म्हातार्याने सामान आत घेतले.
तेथून जाणाऱ्या एका पत्रकाराने थांबून सर्व दृश्य पाहिले. ही बाब आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे उपयुक्त ठरेल असे त्यांना वाटले. त्याने एक मथळा देखील विचारला, "क्रूर जमीनदार पैशासाठी म्हातार्याला भाड्याच्या घरातून बाहेर काढतो." मग त्याने जुन्या भाडेकरूचे काही फोटो काढले आणि भाड्याच्या घराचे काही फोटोही काढले.
पत्रकाराने जाऊन आपल्या प्रेस मालकाला घडलेला प्रकार सांगितला. प्रेसच्या मालकाने चित्रे पाहिली आणि त्यांना धक्काच बसला. त्यांनी पत्रकाराला विचारले, म्हाताऱ्याला ओळखते का? पत्रकार नाही म्हणाला.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोठी बातमी छापून आली. "गुलझारीलाल नंदा, भारताचे माजी पंतप्रधान, एक दयनीय जीवन जगत" असे शीर्षक होते. या बातमीत पुढे लिहिले आहे की, माजी पंतप्रधान कसे भाडे देऊ शकले नाहीत आणि त्यांना घरातून कसे हाकलून देण्यात आले. आजकाल फ्रेशर्सही भरपूर पैसे कमावतात, अशी टिप्पणी केली गेली. तर दोन वेळा माजी पंतप्रधान राहिलेल्या आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःचे घरही नाही.
वास्तविक गुलझारीलाल नंदा यांना रु. 500/- प्रति महिना भत्ता उपलब्ध होता. मात्र आपण स्वातंत्र्यसैनिकांच्या भत्त्यासाठी लढलो नसल्याचे सांगत त्यांनी हे पैसे नाकारले होते. नंतरच्या मित्रांनी त्याला असे सांगून स्वीकारण्यास भाग पाडले की त्याचे मूळ दुसरे कोणतेही स्त्रोत नाही. या पैशातून तो घरभाडे देऊन गुजराण करत असे.
दुसऱ्या दिवशी विद्यमान पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाहनांच्या ताफ्यासह त्यांच्या घरी पाठवले. एवढ्या व्हीआयपी वाहनांचा ताफा पाहून घरमालक थक्क झाला. तेव्हाच त्यांना कळले की त्यांचे भाडेकरू श्री गुलझारीलाल नंदा हे भारताचे माजी पंतप्रधान होते. घरमालकाने त्यांच्या गैरवर्तनाबद्दल लगेच गुलझारीलाल नंदा यांच्या चरणी नतमस्तक झाले.
अधिकारी आणि व्हीआयपींनी गुलझारीलाल नंदा यांना सरकारी निवास आणि इतर सुविधा स्वीकारण्याची विनंती केली. गुलझारीलाल नंदा यांनी या वृद्धापकाळात अशा सुविधांचा काय उपयोग असे सांगून त्यांची ऑफर स्वीकारली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते एका सामान्य नागरिकाप्रमाणे जगले. 1997 मध्ये सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला.
त्यांच्या आयुष्याची तुलना सध्याच्या राजकारण्यांशी करा.कारण आमच्या ३०० आमदारांना फुकटची ३०० निवासस्थाने हवी आहेत.
(त्यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त, आदरांजली)
🙏🙏विनम्र अभिवादन 🙏🙏
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨मंगळवार स्पेशल✨ #स्वाभिमानी #थोर व्यक्ती
🌹🌹 सत्य परिस्थिती 🌹🌹
माणूस माणसाला पारखा होत चालला आहे..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हल्ली...प्रत्यक्षातील सोडा पण स्वप्नातील वाट सुद्धा सापडत नाही. खरं तर आपणच ती शोधण्याच्या भानगडीत पडत नाही कारण आपण खूप बिझी झाल्याने नात्याची माती करीत आहोत. आणि आपल्याला या गोष्टीची अजिबात खंत वाटत नाही. आपण इतके आत्मकेंद्री झालेले आहोत की फक्त मी आणि माझे या पलीकडे पाहायला आपल्याला वेळ नाही. समोरचा काय बोलतोय, काय करतोय हे पाहण्या इतकाही आपल्याकडे वेळ नाही. खरेतर आपण तो वेळ काढीतच नाही. वेळ फार विचित्र असते बरे, आज तुम्ही तुमच्या लोकांसाठी वेळ काढीत नाही उद्या ती लोकं तुमच्यासाठी वेळ काढणार नाहीत. वेळीच सावध व्हायला हवं कारण फक्त स्वतःपुरतं जगणाऱ्यांना वेळ नेहमीच धडा शिकवीत आलेला आहे. इथे मोठाले राजे महाराजे मातीत मिसळले तिथे तुम्ही आम्ही कोण आहोत हो. आपण इतके निबर कातडीचे झालेले आहोत की, बाबा तुझे काय चालले आहे एवढे सुध्दा खूपशा लोकांना विचारावेसे वाटत नाही. तुमचे पैसे, वय, सौन्दर्य, प्रसिद्धी हे काहीच सोबत येत नाही, लक्षात राहते ती तुमची माणुसकी आणि तुम्ही कमावलेली माणसं.. विद्वान लोक तुमची श्रीमंती तुमच्या पैशावर मोजत नाही तर तुमच्या दारात तुमच्या आप्तस्वकीयांच्या, मित्रमंडळींच्या किती चपला आहेत यावरून तुमची ख्याती मोजतात. दोन मिनिट सुद्धा न बोलण्या इतकं या जगात कधीच आणि कुणीच बिझी नसतं. मी खूप बिझी आहे असे म्हणणारे त्यांची रोजची कामं करीत नाहीत काय?
मुळात आपल्या मनात जेव्हा एखादी अपराधीपणाची भावना असेल तेव्हाच आपण समोरच्या व्यक्तीला टाळतो. सगळं आपल्याच मताने होत नाही, कधीकधी आपल्या माणसाच्या मनाची सुद्धा दखल घ्यायची असते. पण त्या माणसाला तुम्ही आपलं मानत असाल तर. आणि आपलं मानतच नसाल तर मग बोलण्यात काही अर्थच नाही. बरीचशी नाती एकमेकांशी संवाद तुटल्यानेच तुटतात. आज बोलू उद्या बोलू या आज उद्याच्या नादात वेळ हातातून निघून जाते आणि मग आपल्याला आपलीच लाज वाटते. आपण समोरच्याला राग येईल असे समजून त्याच्या पासून दूर जातो. माणसाने भाषा विकसित केली आणि म्हणून तो जगातील सर्व प्राणिमात्रांच्याहून श्रेष्ठ गणला गेला. पण ही भाषा संवादासाठी असून आपसातील नाती जपण्याचे प्रभावी माध्यम आहे हेच तो हेतू पुरस्सर विसरून गेला. संवाद साधण्यास हाच माणूस आता कंजुषी करू लागल्याने माणूस माणसाला पारखा होत चालला आहे. बाकी जास्त बोलण्याची गरज नाही, कारण तुम्ही तसे खूप हुशार आहातच.. आणि सूज्ञास सांगणे न लगे असे म्हणतात. कारण संवादामुळे समाजात एकता आणि योग्य समज निर्माण होते. म्हणून अबोला टाळा...संवाद साधा.
🙏🌹श्रीराम समर्थ 🌹🙏
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨सोमवार स्पेशल✨ #माणुसकी #कटू सत्य
🌹🌹 नवमी महालय 🌹🌹
आई नवमी श्राद्ध: अविधवा नवमी श्राद्धाची संपूर्ण माहितीअविधवा नवमी म्हणजे मातृ नवमी किंवा आई नवमी होय. ही पितृपक्षातील एक महत्त्वाची तिथी आहे. हिंदू धर्मात पितृपक्षादरम्यान आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. यापैकी नवमी तिथीला अविधवा नवमी म्हणून साजरी केली जाते, जी विशेषत: सौभाग्यवती म्हणजेच पती जिवंत असताना मृत्यू झालेल्या महिलांच्या श्राद्धासाठी समर्पित आहे. ही तिथी माता, सासू, सुना किंवा कुटुंबातील इतर विवाहित महिलांच्या आत्म्याच्या शांतीसाठी महत्त्वाची मानली जाते.अविधवा नवमी म्हणजे काय?
अविधवा म्हणजे जी स्त्री विधवा नसते, जिचा पती जिवंत असताना तिचा मृत्यू झाला आहे. अशा सौभाग्यवती महिलेची मरणोत्तर गणना सधवा म्हणून केली जाते. या दिवशी अशा महिलांचे श्राद्ध केले जाते ज्यांचा मृत्यू त्यांच्या पतीच्या मृत्यूपूर्वी झाला आहे. या श्राद्धामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबाला सुख-समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. अविधवा नवमीचे श्राद्ध केल्याने पितृदोष दूर होतो, कुटुंबात सौभाग्य आणि समृद्धी येते. तसेच, मृत महिलेच्या अपूर्ण इच्छा आणि कुटुंबाबद्दलच्या काळजी मिटवण्यासाठी हा विधी केला जातो, ज्यामुळे तिचा आत्मा तृप्त होतो.
कोणाचे श्राद्ध करावे?
सौभाग्यवती महिलांचे श्राद्ध म्हणजेच ज्या माता, सासू, सुना, मुली किंवा कुटुंबातील इतर विवाहित महिलांचा मृत्यू त्यांच्या पती जिवंत असताना झाला आहे, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाते. जर सावत्र आई जिवंत असेल आणि सख्खी आईचे निधन झाले असेल, तर मुलाने हे श्राद्ध करावे. सख्खी आई जिवंत असेल आणि सावत्र आईचे निधन झाले असेल, तरीही मुलाने हे श्राद्ध करावे. जर मृत महिलेला मुलगा नसेल किंवा मुलाचाही मृत्यू झाला असेल, तर त्या महिलेच्या मुलांनी म्हणजेच नातवंडांनी हे श्राद्ध करू नये.विधवा महिलांचे श्राद्ध या तिथीला केले जात नाही.
मृत्यू तिथी अज्ञात असल्यास: जर मृत्यूची तारीख माहीत नसेल आणि पती जिवंत असेल, तर अविधवा नवमीला त्या महिलेचे श्राद्ध केले जाऊ शकते.
अविधवा नवमी श्राद्धाची पद्धत
अविधवा नवमीचे श्राद्ध पार्वण विधीने केले जाते. सर्वात आधी सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घराच्या दक्षिण दिशेला स्वच्छ जागा निवडून हिरवे कापड पसरावे.
तर्पण आणि पिंडदान-
तीळ, जौ आणि तांदूळ यापासून पिंड बनवून पितरांना अर्पण करावे. पाण्यात तीळ आणि मिश्री मिसळून तर्पण करावे. तसेच, तुळशीच्या पानांचा समावेश करावा.नैवेद्य आणि भोजन-
मृत व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ बनवावेत. लौकीची खीर, पालक, मूंगदाळ, पूडी, हिरवी फळे, लवंग-इलायची आणि मिश्री अर्पण करावी. एखाद्या सुवासिनीला (विवाहित स्त्री) जेवण द्यावे आणि तिला यथाशक्ती साडी, बांगड्या, गजरा, सर्व श्रुंगार पेटी म्हणजेच मेहंदी कोन, जोडवे, टिकली पाकीट, दक्षणा अन्य भेटवस्तू दान करावी.व खणानारळाने ओटी भरावी,
मंत्र आणि पूजा-
कुशाच्या आसनावर बसून भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाचे पाठन करावे.ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम धत्रये नमः या मंत्रांचा 108 वेळा जप करावा.काकबली-
मृत महिलेच्या नावाने काकबली वाढून नैवेद्य दाखवावा.
अविधवा नवमीचे महत्त्व-
या दिवशी ब्रह्मांडात रजोगुणी शिवतरंगांची अधिकता असते, ज्यामुळे मृत सौभाग्यवती महिलेच्या आत्म्याला सूक्ष्म शिवशक्तीचा लाभ मिळतो. यामुळे तिच्या आत्म्याची उर्ध्वगती साधली जाते. या श्राद्धामुळे कुटुंबातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी वाढते. अविधवा नवमी ही मृत महिलेच्या कुटुंबासाठी केलेल्या त्याग आणि काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. यामुळे तिच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होतो. विशेषत: गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हा विधी मोठ्या श्रद्धेने पाळला जातो.
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🌸नवमी श्राद्ध🌺 #अविधवा नवमी श्राद्ध #अध्यात्मिक माहिती #माहिती
🌹🌹माझी आई 🌹🌹
आई जिने आयुष्य कसं जगायचं हे शिकवलं
बाबा ज्यांनी प्रत्येक पैशाची किंमत ओळखायला शिकवलं
भाऊ बहीण पत्नी मुलं यांनी सर्व सुख दुःखात साथ दिली व मार्गदर्शन केले.
शिक्षक ज्यांनी अभ्यासासोबत आयुष्याचे धडे शिकवले.
मित्र ज्यांनी वाईट परिस्थितीत धीर दिला व मदत केली.
ते सगळे ज्यांनी मला नवीन नवीन गोष्टी शिकवल्या.
अशा प्रत्येक हितचिंतक गुरूंचा मी आभारी आहे
तुमच्यामुळेच मला नवीन प्रेरणा व मार्ग मिळाला आहे
खरंतर आपली परिस्थिती पण एक मोठा गुरूच आहे, कारण सुख दुःखाच्या काळामध्ये आपली परिस्थिती आपल्याला आयुष्य जगण्याचा खूप मोठा धडा शिकवत असते, आपल्या आयुष्याच्या प्रवासात खूप सर्वात खडतर रस्ता असतो त्यातून आपण बाहेर कस निघायचं याच मार्गदर्शन आपल्याला आपली परिस्थितीच करून देते...... त्याच परिस्थितीला ही आपण आपला गुरूच मानायला पाहिजे कारण याच काळात आपल्याला आपले कोण आणि आपल्यामधलेच परके कोण याची चांगली ओळख होते........!!_💯😊
🌹🙏सर्वांना आदरपूर्वक नमन आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.....🙏🌹
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🧚♀️माझी आई #🍁गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🥳गुरुपोर्णिमा स्पेशल😍 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🌹असा असतो आषाढी वारीचा सोहळा🌹
हेचि घडो मज जन्मजन्मांतरी ।
मागणे श्रीहरी नाही दुजे ।।
आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या, की वारी संपली असा सर्वसाधारण समज असतो. परंतु वारीचा मुख्य दिवस असलेल्या आषाढी एकादशीला कोणते धार्मिक कार्यक्रम होतात? संतांच्या पालख्या किती दिवस पंढरपुरात थांबतात? त्यांचा दिनक्रम कसा असतो
संपदा सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा ।।
ज्येष्ठ महिना आला, की वारकऱ्यांच्या मनाची अवस्था अशी होते. वेगवेगळ्या संत क्षेत्राहून संतांच्या पालख्या शेकडो दिंड्यांसहित आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघतात. वारीमध्ये सहभागी नसलेले अनेक जण वारीचा हा सोहळा वर्तमानपत्र, टीव्ही आणि इतर माध्यमांतून अनुभवत असतात. या काळात सर्व महाराष्ट्रच वारीमय झालेला असतो.
🔸पलंग निघणे
खुद्द पंढरपूरमध्येसुद्धा आषाढ महिना सुरू होताच वारीच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात रोज सकाळी काकड आरती, त्यानंतर देवाचा अभिषेक आणि आरती, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी साडेचार वाजता पोशाख, सायंकाळी धुपारती, रात्री शेजारती आणि त्यानंतर देवाची निद्रा असे उपचार रोज होत असतात. उपचारादरम्यान आणि रात्री शेजारतीनंतर पहाटपूजेनंतरची आरती होईपर्यंत असे एकूण आठ-नऊ तास दर्शन बंद असते. आषाढी वारीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होते. एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांना २४ ,४८ तास रांगेत थांबावे लागते. भक्तांना जशी देवाच्या दर्शनाची ओढ असते, त्याप्रमाणेच देवसुद्धा भक्तांना भेटण्यासाठी आसुसलेला असतो.
वारीमध्ये अधिकाधिक भक्तांना देवाचे दर्शन घेता यावे, यासाठी देवाचे काही उपचार बंद केले जातात. यालाच पलंग निघणे असे म्हणतात.
पूर्वी आषाढ शुद्ध पंचमीच्या सुमारास देवाचा पलंग निघत असे. आता आषाढ शुद्ध प्रतिपदेला म्हणजे आषाढ महिना लागताच पहिल्याच दिवशी देवाचा पलंग निघतो. यादिवशी शेजघरामधील देवाचा पलंग बाहेर काढला जातो. या दिवसापासून देवाची झोप बंद. त्यामुळे श्रमपरिहारार्थ देवाच्या मागे लोड, रुक्मिणी मातेच्या मागे तक्का लावण्यात येतो. दुपारचा पोषाख बदल, सायंकाळची धुपारती, रात्रीची शेजारती आणि झोप इत्यादी उपचार बंद करण्यात येतात. फक्त सकाळची पूजा आणि दुपारचा नैवेद्य होतो. सायंकाळी लिंबूपाणी आणि रात्री दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात.
🔸पालख्यांचा पंढरपूर प्रवेश
आषाढ शुद्ध षष्ठीच्या सुमारासच काही पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. यामध्ये खान्देशातून येणाऱ्या संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा हा महत्त्वाचा सोहळा आहे. शुद्ध नवमीला बहुतेक सर्व महत्त्वाच्या पालख्या पंढरपूर जवळील वाखरी येथे मुक्कामाला येतात. वाखरी हे ठिकाण पंढरपूर पासून आठ किलोमीटरवर आहे. नवमीला याठिकाणी माऊलींच्या पालखीचे उभे आणि गोल रिंगण होते. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक पंढरपूरकर गर्दी करतात. हा मुक्काम पंढरपूरपासून जवळ असल्याने अनेक वारकरी नवमीला अथवा दशमीला पंढरपुरात येऊन चंद्रभागा स्नान आणि नगरप्रदक्षिणा हा महत्त्वाचा विधी उरकून घेतात. पुन्हा वाखरीला आपापल्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. दशमीला पहाटेपासूनच वाखरीवरून वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये यायला सुरुवात होते.
🔸नामदेवराय जातात सामोरे
दशमीला सकाळी पंढरपुरात आधीच प्रवेश केलेल्या मुक्ताबाईंची पालखी आणि पंढरपूर येथील केशवराज संस्थानमधून निघणारी संत नामदेवांची पालखी सर्व संतांच्या स्वागतासाठी वाखरीच्या दिशेने निघते. नामदेवराय म्हणजे पांडुरंगाचे प्रतिनिधी. नामदेव राय आले म्हणजे पांडुरंग आला अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते. नामदेवरायांचा पालखी सोहळा पंढरपूर आणि वाखरी यामधील पादुका मंदिरापाशी येतो, तेव्हा माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चोपदार तेथे येऊन नामदेवरायांना पुढे चालण्याची विनंती करतात. त्यानंतर शेवटचे सात पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात.
पंढरपूर प्रवेशामध्ये शेवटच्या सात पालख्यांचा क्रम ठरलेला आहे. यामध्ये सर्वात शेवटी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, त्यांच्या पुढे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, त्यापुढे संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताबाई आणि पंढरपूरवरून संतांच्या स्वागताला आलेले संत नामदेवराय असा क्रम असतो. विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिरापाशी आल्यावर बहुतेक पालखी सोहळ्यामध्ये उभे रिंगण होते. हे सोहळ्यातले शेवटचे रिंगण. पंढरपूरच्या वेशीवर सर्व पालखी सोहळ्यांचे उत्साहात स्वागत केले जाते. सर्वात शेवटी असलेला माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचायला रात्रीचे दहा वाजतात.
🔸पंढरपुरातील मुक्काम
दशमी ते चतुर्दशी पाच दिवस पालख्यांचा मुक्काम पंढरपूरमध्ये असतो. यापैकी एखादी तिथी कमी अथवा अधिक झाल्यास मुक्कामाचा एखादा दिवस कमी जास्त होतो. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मुक्काम नाथ चौक येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये असतो. संत एकनाथ महाराजांची पालखी नाथ चौकातील नाथ मंदिरात उतरते.
संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बेलापूरकर मठामध्ये उतरते. ही तीनही ठिकाणे नाथ चौकाजवळ आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिरात उतरते. संत सोपान काकांची पालखी तांबड्या मारुतीजवळील संत सोपान काका पालखी मंडपामध्ये, तर मुक्ताबाईंची पालखी तेथून जवळ असलेल्या मुक्ताबाई मंदिरामध्ये उतरते. शेगाव येथील गजानन महाराज संस्थानने पंढरपूरमध्ये मोठे प्रशस्त मंदिर आणि भक्तनिवास बांधले आहे. संत गजानन महाराजांची पालखी तेथे मुक्कामाला असते.
🔸आषाढी एकादशी
आषाढी एकादशीचा दिवस हा वारीचा मुख्य दिवस. या दिवशी भल्या पहाटेपासून चंद्रभागा स्नानास गर्दी होते. किंबहुना दशमीच्या रात्री आणि एकादशीस दिवसभर चंद्रभागा स्नान चालूच असते, असे म्हणायला हरकत नाही. आषाढी एकादशीला पहाटे विठ्ठल मंदिरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात येते. ही महापूजा शासनाच्या वतीने, शासनाच्या खर्चाने केली जाते. त्यामुळे याला शासकीय महापूजा असे म्हणतात. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी त्या त्या संतांच्या पादुकांची पूजा करण्यात येते. त्यानंतर संतांच्या पालख्या नगरप्रदक्षिणेसाठी निघतात. नगरप्रदक्षिणा म्हणजे पंढरपूर नगराला प्रदक्षिणा. अर्थात आताच्या विस्तारित पूर्ण पंढरपूरला प्रदक्षिणा करणे अपेक्षित नसून जुन्या पंढरपूरला प्रदक्षिणा करणे म्हणजेच नगरप्रदक्षिणा करणे अपेक्षित आहे.
या प्रदक्षिणा मार्गावर काही ठिकाणी पूर्वी जुन्या गावाच्या खुणा असलेल्या वेशी होत्या, जसे की महाद्वार वेस. पण पुढे गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने केलेल्या पंढरपूरच्या नगरविकास आराखड्यामध्ये या वेशी काढून टाकण्यात आल्या. नगर प्रदक्षिणा मार्ग महाद्वार घाटावरून कालिका मंदिर चौक, तेथून वळून काळा मारुती चौक, तेथून पुन्हा वळून गोपाळकृष्ण मंदिरापासून नाथ चौक, तेथून पुन्हा वळून तांबड्या मारुतीपासून पुन्हा महाद्वार घाट असा आहे. या मार्गावर कोठूनही प्रदक्षिणेस सुरुवात करून पुन्हा त्या ठिकाणी आले म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण होते.
🔸पहिली प्रदक्षिणा गजानन महाराजांची
गजानन महाराजांची पालखी पहाटे अडीच वाजता नगरप्रदक्षिणा निघते. तर, ज्ञानेश्वर माउलींची पालखी सर्वात शेवटी म्हणजे सकाळी आठच्या सुमारास नगरप्रदक्षिणेस निघते. नगर प्रदक्षिणेच्या मार्गावर पालखी चंद्रभागेजवळ आल्यावर रथातून पालखी काढून चंद्रभागेच्या वाळवंटात नेली जाते. पालखीतून पादुका बाहेर काढून त्यांना चंद्रभागा स्नान घालण्यात येते. तर काही पालख्यांमध्ये पादुका हातात घेऊन वाळवंटात नेतात आणि त्यांना चंद्रभागा स्नान घालतात. यावेळेस उपस्थित भाविकसुद्धा देवावर पाणी उडवतात. त्यानंतर पुन्हा उर्वरित नगर प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. नगरप्रदक्षिणा मार्गावर महाद्वार चौकामध्ये महाद्वारासमोर अभंग आणि आरती होते. चौफाळा चौकामधून देवाच्या मंदिराचा कळस दिसतो. तिथे संत नामदेवरायांचा पुढील अभंग म्हणतात.
झळझळीत सोनसळा ।
दिसतो कळस सोज्वळा ।।
बरवे बरवे पंढरपूर ।
विठोबा रायाचे नगर ।।
हे माहेर संतांचे ।
नामयास्वामी केशवाचे ।।
याशिवाय मार्गामध्ये वाळवंटात आल्यावर चंद्रभागेचा, पुंडलिक मंदिरासमोर पुंडलिकाच्या वर्णनाचा आणि त्या त्या संतांच्या मठापुढे त्या त्या संतांच्या वर्णनाचा अथवा इतर कोणताही संतपर अभंग म्हणतात. नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पालखी आपापल्या मठामध्ये परत येते. त्यावेळेस ‘देह जावो अथवा राहो’ हा अथवा अशाच अर्थाचा इतर अभंग होऊन आरती होते. एकादशी हा उपवासाचा दिवस. या दिवशी देवाला आणि संतांनासुद्धा उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकऱ्यांना देव दर्शन होणे शक्य नसते. गर्दीमुळे विठ्ठल मंदिरातूनसुद्धा रथ अथवा पालखी निघत नाही.पेशवे काळामध्ये पेशव्यांचे एक सरदार खाजगीवाले यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची रथयात्रा सुरू केली. ही रथयात्रा खाजगीवाले वाडा येथून म्हणजे आताच्या माहेश्वरी धर्मशाळेतून निघते. या रथयात्रेसाठी लाकडी दुमजली रथ आहे. हा रथ भाविक हाताने ओढतात. या रथामध्ये विठ्ठल, राही आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती ठेवून रथ ओढायला सुरुवात करतात. नगरप्रदक्षिणा मार्गावरून फिरून रथ पुन्हा माहेश्वरी धर्मशाळेत येतो.
🔸एकादशीचे कीर्तन महत्त्वाचे
आषाढी एकादशीच्या रात्री होणारे कीर्तन हे वारीतले महत्त्वाचे कीर्तन. हे कीर्तन त्या त्या पालखीपुढे त्या त्या पालखी सोहळ्याचे मालक अथवा महत्त्वाचे मानकरी करतात. प्रत्येक फडावर या दिवशी स्वतः मालक कीर्तन करतात. श्री विठ्ठल वर्णन, पंढरी वर्णन अथवा अखंड पंढरीची वारी घडावी, अशा मागणीपर अभंगावर कीर्तन होते. कीर्तनानंतर जागर होतो. जागर म्हणजे रात्रभर चालणारे भजन.
सोहळ्यामध्ये रोज जागर होत असला, तरी एकादशीच्या जागराला विशेष महत्त्व आहे. कारण एरवीसुद्धा एकादशी हा जागरणाचा दिवस मानला जातो. त्यामुळे विठ्ठल मंदिरात आणि इतर संत क्षेत्री एकादशीच्या रात्री शेजारती होत नाही. रात्रभर जागर झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला पहाटे काही ठिकाणी पुन्हा कीर्तन होते. त्यानंतर देवाला नैवेद्य होऊन लोक उपवास सोडतात. याला बारस सोडणे असे म्हणतात. महत्त्वाच्या पालखी सोहळ्यातर्फे श्री विठ्ठल मंदिरामध्ये पांडुरंगास नैवेद्य पाठवला जातो.
🔸खिरापतीचे कीर्तन
द्वादशीच्या रात्री जे कीर्तन होते त्याला खिरापतीचे कीर्तन असे म्हटले जाते. या कीर्तनानंतर खिरापतीचा अभंग म्हणतात आणि त्यानंतर खिरापत म्हणजे कुरमुरे अथवा चिवड्याचा प्रसाद वाटतात. त्रयोदशी आणि चतुर्दशीच्या दिवशी त्या-त्या मठामध्ये सकाळची पूजा, दुपारी नैवेद्य, रात्री एकदा अथवा सकाळ आणि रात्री अशी दोन कीर्तने आणि रात्रभर जागर असे कार्यक्रम होतात. काही वारकरी दशमीला पंढरपूरमध्ये प्रवेश केल्यावर एकादशी सुरू होताच रात्री बारा वाजताच परत फिरतात.
बहुतांश वारकरी एकादशीला चंद्रभागा स्नान आणि नगरप्रदक्षिणा करून माघारी निघतात. निष्ठावान वारकरी एकादशीचे रात्रीचे कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी बारस सोडून परतात. तर काही वारकरी पौर्णिमेपर्यंत थांबतात. पायी वारी करणाऱ्या सर्वच वारकऱ्यांना प्रत्यक्ष विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. पंढरपूरमध्ये पोचले, की त्यांची वारी पूर्ण होते. वारीच्या काळात कळस दर्शनालाही महत्त्व आहे. शिवाय वारीमध्ये देव वाळवंटात असतो, अशीही एक श्रद्धा आहे. संत साहित्यात असे अनेक उल्लेख आढळतात. निष्ठावान वारकर्यांचा भर चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, भजन या गोष्टींवर असतो.
🔸काला
पौर्णिमा हा काल्याचा दिवस. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उत्सवाची अथवा उपक्रमाची सांगता काल्याने होते. वारीची सांगता सुद्धा आषाढी पौर्णिमेला काल्याने होते. हा काला पंढरपूरजवळील गोपाळपूर या ठिकाणी होतो. या ठिकाणी काला करण्यासाठी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमधून निघून गोपाळपूरला जातात. अपवाद म्हणजे संत एकनाथ महाराजांची पालखी. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा काला श्री विठ्ठल मंदिरामध्ये देवासमोर लाकडी सभामंडपामध्ये होतो. पौर्णिमेच्या दिवशी पहाटे देहूकरांच्या फडावर पहाटे चार ते सहा या वेळेत पत्रिकेच्या अभंगाचे कीर्तन होते.
एके वर्षी आजारी असल्यामुळे संत तुकाराम महाराजांना पंढरीची वारी करता आली नाही. तेव्हा त्यांनी काही वारकऱ्यांजवळ देवाला निरोप म्हणून काही अभंग लिहून पाठवले. आजारी पडल्यामुळे तुकोबांच्या मनाची झालेली अवस्था, वारकऱ्यांच्या जवळ पाठवलेले निरोपाचे अभंग, वारकरी परत येईपर्यंत झालेली मनाची अवस्था, वारकऱ्यांकडून आलेला निरोप आणि त्यानंतर महाराजांची अवस्था हे सर्व वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्याला पत्रिकेचे अभंग असे म्हटले जाते. या कीर्तनामध्ये हा सर्व प्रसंग सांगून या अभंगातील प्रमाणे घेतली जातात.
🔸गोपाळपूर
गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूरपासून दक्षिणेस दोन किलोमीटरवर आहे. या ठिकाणी एका टेकडीवर गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय, दगडी बांधकामाचे असून मंदिराच्या कडेने किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे. मंदिराच्या आवारातच देवाचे सासरे भीमकराज आणि जनाबाई इत्यादींची मंदिरे आहेत. गोपाळकृष्णाची मूर्ती देहुडाचरणी वेणू वाजवणाऱ्या रूपात आहे. या मूर्तीचा चेहरा आणि पंढरपुरातील मुख्य मंदिरातील पांडुरंग मूर्तीचा चेहरा बराचसा सारखा आहे. या मंदिराच्या परिसरामधे बरीच मोकळी जागा आहे. संतांच्या पालख्या पहाटेपासून गोपाळपूरला यायला सुरुवात होते. मंदिर परिसरामध्ये ठरलेल्या ठिकाणी पालखी विसावते.
पालखीसमोर काल्याचे कीर्तन होते. काही पालख्यांमध्ये कीर्तनाऐवजी काल्याचे भजन होते. त्यानंतर काल्याचा प्रसाद म्हणजे कुरमुरे वाटतात. भाविकसुद्धा एकमेकांना काला भरवतात. यानंतर पालख्या गोपाळकृष्ण मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालून पुन्हा पंढरपूर मध्ये परत येतात. काही पालखी सोहळ्यांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरला जाताना पुन्हा एकदा चंद्रभागा स्नान होते. काला झाला म्हणजे वारीची सांगता होते आणि संतांच्या पालख्या भोजनानंतर आपापल्या गावी परत निघतात.
🔸देवभेट
गेल्या वीसेक वर्षांपासून संतांच्या पादुका मुख्य विठ्ठल मंदिरात देवाच्या भेटीसाठी नेण्याचा प्रघात सुरू झाला आहे. यानुसार संतांच्या पादुका हातात घेऊन अथवा पालखीसह श्रीविठ्ठल मंदिरात नेतात. तेथे पादुका पांडुरंगाजवळ आणि रुक्मिणी मातेकडे नेतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे पादुकांचे स्वागत आणि पूजा होते. देवाच्या अंगावरील उपरणे, गळ्यातील हार इत्यादी पादुकांना घातले जातात. तर त्या त्या संत संस्थानतर्फे देवाला उपरणे, हार इत्यादी अर्पण केले जातात. देव भेटीनंतर पालख्या आपल्या मठामध्ये परततात.
🔸निरोप
देवदर्शनानंतर पालखी आपापल्या ठिकाणी परत आल्यावर नैवेद्य, भोजन होऊन दुपारनंतर पालखीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. यावेळेस संत निळोबारायांचा पुढील अभंग अथवा अशाच अर्थाचे इतर अभंग म्हटले जातात.
पंढरीहुनि गावी जातां ।
वाटे खंती पंढरीनाथा ।।
आता बोळवीत यावे ।
आमुच्या गावा आम्हासवे ।।
तुम्हां लागी प्राण फुटे।
वियोग दु:खे पूर लोटे ।।
निळा म्हणे पंढरीनाथा।
चला गावा आमुच्या आता।।
पालख्यांना निरोप देण्यासाठी पंढरपूरकर वेशीपर्यंत येतात.
🔸पालखी नगरप्रदक्षिणा
पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगरप्रदक्षिणा निघते. आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये स्थानिक भाविकांना दर्शन मिळणे अवघड होते. ते आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेमध्ये आणि आपापल्या व्यवसायामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे स्थानिकांना दर्शन देण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगरप्रदक्षिणेस निघते. यावेळी पालखी सोबत वासुदेव, दिवटे आणि आंबेकर आजरेकर फडाच्या चवरे महाराजांची दिंडी असते. पौर्णिमेपासून पुढे पंचमीपर्यंत रोज रात्री देवासमोर गरुड खांबापाशी चवरे महाराजांचे भजन होते.
🔸महाद्वार काला
संतांचा काला जरी पौर्णिमेला झाला, तरी देवाचा काला मात्र संतांना निरोप दिल्यावर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला होतो. याला महाद्वार काला असे म्हणतात. या महाद्वार काल्यामध्ये मिरवल्या जाणाऱ्या पादुका देवाचे एक सेवेकरी असलेले हरिदास यांच्याकडे आहेत. या पादुका हरिदास वेशीपाशी हरिदासांच्या ज्या वाड्यामध्ये असतात, त्याला काल्याचा वाडा असे म्हणतात. महाद्वार काल्याच्या दिवशी काल्याच्या वाड्यामधे या पादुका मानकरी हरिदास यांच्या डोक्यावर फेट्यामध्ये बांधतात. पादुका डोक्यावर बांधताच त्यांची शुद्ध हरपते. पूर्वी नामदेव महाराजांनी देवाला खांद्यावर घेऊन महाद्वार काला केला असे मानले जाते. त्यामुळे आता सुद्धा नामदेवांचे वंशज नामदास महाराज डोक्यावर पादुका बांधलेल्या हरिदासांना आपल्या खांद्यावर घेतात आणि हा काल्याचा सोहळा करतात. ही काल्याची मिरवणूक नामदास महाराजांच्या दिंडीसह काल्याच्या वाड्यातून विठ्ठल मंदिरात येते. तेथे देवासमोरील सभामंडपामध्ये या पादुकांवर हंडी फोडली जाते.
नामदास महाराज हरिदासांना खांद्यावर घेऊन लाकडी मंडपामध्ये तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर दिंडीसह मिरवणूक महाद्वारातून बाहेर येते. तेथून महाद्वार घाटाने खाली चंद्रभागेवर आणि तेथून खाजगीवाले वाडा (आताची माहेश्वरी धर्मशाळा) या मार्गाने पुन्हा काल्याच्या वाड्यात परत येते. मार्गामध्ये ठिकठिकाणी भाविक पादुकांवर दही, लाह्या उधळतात. पूर्ण मार्गामध्ये नमदास मंडळी आळीपाळीने हरिदासांना आपल्या खांद्यावर उचलून घेतात. दिंडी काल्याच्या वाड्यात परत आल्यावर आरती होते आणि या उत्सवाची सांगता होते. महाद्वार काला झाला म्हणजे आषाढी वारीची सांगता झाली.
🔸प्रक्षाळ पूजा
यानंतर वारीनिमित्त बंद झालेले देवाचे उपचार पुढे वद्य पंचमीच्या आसपास सुरू केले जातात. या पूजेला प्रक्षाळ पूजा असे म्हणतात. प्रक्षाळ म्हणजे धुणे अथवा स्वच्छ करणे. वारीच्या काळात गर्दीमुळे अस्वच्छ झालेले मंदिर धुणे, मंदिराची स्वच्छता करणे आणि वारीनिमित्त देवाला आलेला शिणवटा घालवणे असे या पूजेचे दोन भाग आहेत. पंचमीच्या आदल्या रात्री देवाच्या मागे लावलेला लोड काढून घेतात आणि देवाच्या पूर्ण अंगाला तेल लावून मर्दन करतात. पंचमीला पहाटे देवाला औषधी वनस्पतीपासून बनवलेले उटणे लावून स्नान घालतात. या पूजेनंतर भाविक देवाच्या पायांना लिंबू साखर लावतात. मूर्तीची झीज होऊ नये म्हणून आता देवाच्या पायावर चांदीचे कवच ठेवून त्यावर लिंबू साखर लावले जाते. हा उपक्रम पहाटपूजेपासून साधारण सकाळी अकरा वाजेपर्यंत चालू असतो.
अकरा वाजता देवाला पहिले स्नान घातले जाते. याला पहिले पाणी असे म्हणतात. यावेळेस देवावर पांढरे तलम उपरणे पांघरून त्यावरून गरम पाण्याने स्नान घातले जाते. पहिले पाणी झाले म्हणजे देवाला साधे धोतर नेसवून अंगावर उपरणे पांघरतात. यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते. देवाचा मुख्य नैवेद्य दुसऱ्या स्नानानंतर होतो. काही भाविक पहिले पाणी झाल्यावर देवाला नैवेद्य आणत. पूर्वी स्थानिक ब्राह्मणांचे सोवळ्यातले पुरणाचे नैवेद्य देवापर्यंत थेट नेता येत असत. ब्राह्मणेतर मंडळी संध्याकाळी दूध आणि पेढे असा नेवेद्य रांगेतून आणत. आता स्थानिकांचे नैवेद्य थेट देवापाशी सोडणे बंद झाल्यामुळे हे नैवेद्य येत नाहीत. संस्थानतर्फेच नैवेद्य होतो.
यानंतर दुपारी दोनच्या सुमारास दुसरे पाणी होते. यावेळेस पांडुरंगाला रुद्राभिषेक आणि रुक्मिणी मातेला पवमान अभिषेक होतो. एकवीस ब्राह्मण सभामंडपामध्ये रुद्र म्हणतात. त्यावेळेस देवाला गायीच्या शिंगातून दुधाचा अभिषेक केला जातो. या अभिषेकानंतर पांडुरंग आणि रुक्मिणी मातेस जरीचा पोशाख आणि दागिने घालतात. यानंतर देवाला महानैवेद्य आणि आरती होते. देवाचा पलंग पुन्हा शेजघरामध्ये ठेवतात.
उस
या पूजेपासून देवाच्या उपचारास पुन्हा सुरुवात होते. सायंकाळी धुपारती आणि रात्री शेजारती होते. प्रक्षाळ पूजेनिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्यात येते. रात्री शेजारतीच्या वेळेस देवाला औषधी काढ्याचा नैवेद्य दाखवला जातो. तुळस, बडीशेप, लवंग, दालचिनी इत्यादी औषधी पदार्थ पाण्यामध्ये उकळून हा काढा बनवला जातो. दुसर्या दिवशी या काढ्याचा प्रसाद भाविकांना वाटतात. अशा रितीने जवळ जवळ तीन आठवडे पंढरपुरात आषाढीची लगबग चालू असते.
🌹🌹 पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🌹🌹
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🚩आषाढी एकादशीच्या शुभेच्छा💐 #🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇 #🌺विठुमाऊली #धार्मिक आध्यात्मिक
🌹🌹 आषाढी एकादशी 🌹🌹
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. हा दिवस वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास असे म्हटले जाते. या चार महिन्यांत शुभ कार्ये थांबतात. आषाढी एकादशीला उपवास केल्याने आणि भगवान विष्णूची उपासना केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.
या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी करतात. हा एक मोठा भक्तीचा सोहळा असतो, ज्यात जात-धर्माचा कोणताही भेद न ठेवता सर्व भाविक एकजुटीने सहभागी होतात.
#आषाढी एकादशी #विठ्ठल #🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇 शुभ सकाळ #🙏भक्तीमय सकाळ🎬
🌹🌹बेंदुर🌹🌹
पूर्वी सणवार म्हटले की बाजारपेठा या आल्याच आल्या. बाजारपेठांशिवाय सणवार साजरे तरी कसे होणार. बरं आजच्या सारखी वाहन व्यवस्था तेव्हा समृद्ध नसल्यानं गावखेडी हि शहरापासून खूप दूर असायची. शहराला सगळ्यांनाच जायला जमेलच असे ही नाही. मग अश्यावेळी पंचक्रोशीतीलच एखादे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी बाजारपेठ असलेले गाव सगळ्यांना उपयोगी पडायचे.
याच धर्तीवर आमच्या खटाव तालुक्यातील औंध हे बाजारपेठ असलेले संस्थानी गाव होते. त्यामुळे औंध आणि त्याच्या परिसरातील गावे ही बाजारपेठ दृष्ट्या औंधशी जोडलेली होती. औंधचा आठवडी बाजार हा मंगळवारी भरत असे. विशेष असे की दसरा दिवाळी सण असो की आपला देशी बेंदूर. प्रत्येक सणाच्या अगोदर दोन तीन दिवसांच्या फरकाने मंगळवार हा आठवडी बाजार म्हणून अगोदरच भरत असे. त्यासाठी व्यापारी मंडळी सणासुदीला लागणारे लहानमोठे रंगांचे डब्बे, सुक्के रंग, विविधरंगी बेगड, गळयातील घुंगरमाळा, लहान मोठे सुती कासरे, वेसणी, झुली, जे जे म्हणून असेल ते ते साहित्य मोठ्या प्रमाणात भरून बाजारपेठा सजवून ठेवत. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीला लागणारे साहित्य हे शेतकरी वर्गाकडून अगोदरच खरेदी करून ठेवले जायचे. मनाजोगी खरेदी करून शेतकरी हा आपल्या कामात मग्न राहून येणाऱ्या सणाची आतुरतरने वाट पहात आपली कामे हातावेगळी करत असे.
शेतकऱ्यांना बेंदूर सण हा अतिशय प्रिय असे. कारण याच बेंदूर सणानिमित्त आपल्या शेतात वर्षभरापासून राबणाऱ्या आणि पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळ केलेल्या बैलांचा बेंदूर हा खास सण असे. वेळेत पाऊसपाणी पडल्यामुळे सारं शिवार हिरवेगार झालेले असे. पिके वाऱ्याच्या झोकावर डुलत असतात. आनंदाने पानातून आवाज काढत असतात. मध्येच एखादी पावसाची सर येऊन जायची. दूर वारूळ किंवा टेकडीवर बसून चितुर पक्षी आपल्या कर्णकर्कश आवाजात सारे वातावरण सावध करून टाकत. तर मोर ही क्याह क्याह ओरडत असे. अश्या आनंदी वातावरणात बेंदुर हा मुळाचा सण येऊन ठेपत असे.
आमच्या गणेशवाडीमध्ये ही बेंदराची जोरदार तयारी असे. सणानिमित्त गावी येण्यासाठी पुण्या मुंबईत पोटापाण्यासाठी राहिलेल्या आपल्या मुलाबाळांना आठवडाभरापूर्वीच सांगावा, चिठ्ठ्या, पत्रे गेलेली असायची. त्याप्रमाणे एकेक करून पुणे मुंबईकर मिळेल त्या वाहनाने गावी गणेशवाडीला हजर व्हायचा.
औंधमध्ये उगम पावलेल्या नांदणी नदीच्या पाण्याचा चोरटा प्रवाह छोट्या मोठ्या ओढ्याने वाहत करांडेवाडी आणि खरशींगे यांच्या नजीक असलेल्या सरकारी मळ्यातील पाण्याच्या मोठ्या डोहात समाविष्ट होतो. याच डोहाला नांन्नीचा डोह म्हटले जायचे. याच नांदणीच्या डोहावर जनावरे धुण्यासाठी गणेशवाडीकरांची मोठी गर्दी व्हायची. त्यासाठी खास मुंबईवरून आणलेला गोदरेजचा वारंवार चावीबार असलेला 501 बार साबण आणि घरातल्या वाळक्या दोडक्याच्या घासणीने बैलं बळीच्या पकावानी म्हणजे बगळ्या सारखी पांढरी शुभ्र धुवून काढली जात. गाई म्हैशी रेडकं, वासरे धुवून झाल्यावर स्वतःही वाहत्या डोहात मनसोक्त डुबक्या मारून सारा लवाजमा माळाच्या नागमोडी वळणाच्या पाऊलवाटेने डुलत डुलत जाताना पाहून वाटे कुण्या राजाचाच लवाजमा जात आहे.
सारी जनावरे परड्यात स्वच्छ जागेत बांधून त्यांना खायला वैरण टाकून पोरं घरी जेवायला धावत. दीड दोन किलोमीटरच्या तकाट्याने, जनावरे धुवून शिवाय डोहात मस्तपैकी पोहोण्याने पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात. मग काय गरमागरम भाकरी आणि कालवणाचा काला करून जेवणावर आडवा हात मारला जाई.
बेंदराची तयारी म्हणून अगोदरच माळ्यावर ठेवलेल्या घुंगराच्या माळांची डागडुजी करून त्या धुवून सजवून सोप्यातील खुटीला टांगलेल्या असायच्या. बैतेकरी मांगांनी सकाळीच आंब्याच्या पानांची तोरण माळ घरात आणून दिलेल्या असतात. त्या तोरणमाळ घराभोवती बांधून परड्यात शेणाने सारवून ठेवलेल्या कुरी, कुळव, रासणी, डूबी, कोळपी, काढवान अश्या छोट्या मोठ्या औतकाठीला बांधली जाई. संध्याकाळी खांदेमळणीसाठी गरम मिठाच्या पाण्याने शेक देऊन नंतर कडविलेल्या तेलात हळद टाकून त्या तेलाने बैलांच्या खांद्यांचा चांगलाच चोळून मोळून मशाज केला जाई. सर्व लहान मोठ्या जनावरांची खांदमळणी झाल्यावर त्यांना घमेले भरून घुगरया खायला घातल्या जात. तेल पाजले जाई. नंतर सर्व जनावरांना खायला वैरण टाकून परड्याचा झाप लावून गडी माणसं घरी जेवायला येत. गरमगरम गुळवण्यात बाजरीचे उकडलेले उंडे कुस्करून त्यावर ताव मारला जात असे. जेवण झाल्यावर लहान मुले सोप्यात झोपून जात. तर गडी माणसं देवळाकडे गप्पा मारायला जात.
उद्या सणाचा दिवस म्हणून बायका तांबडं फुटायच्या आणि कोंबडं आरवायच्या आतच उठून चुली पेटवायच्या. अंगुळा पांगुळा उरकून बायकांनी पुरण शिजवून पोळ्यांचे नैवद्य तयार केलेले असायचे. तोवर गडी माणसं, पोरं ही तयार झालेली असायची. ज्यांची बैलं धुवायची राहिलेली असायची. अशी माणसं आपली बैलं धुण्यासाठी आडावर गर्दी करायची. सगळ्यांची नुसती धांदल उडून जायची. अंडील बैलांच्या डरकाळ्यानी सारा परिसर दुमदुमून जायचा.
तोपर्यंत स्त्रियांनी नैवेद्य तयार करून ठेवलेला असायचा. पोरांची नैवेद्य घेऊन जाण्यासाठी चढाओढ लागायची. मग एकाने हातात पाण्याचा तांब्या घ्यायचा. तर दुसऱ्याने नैवेद्याचे ताट घेऊन ते नैवद्य सगळ्या शिवारात, गणेश मंदिर, मारूती मंदिर, लक्ष्मी मंदिर, म्हसोबा, यताळबा, आडाला या सगळ्या ठिकाणी नेवून दाखवायचा. बैलांच्या, गाईंच्या अंगाला पिवळ्या रंगाने रंगवून त्यावर पणती, वाटीचे ठसे विविध रंगामध्ये बुडवून ते गाई बैलांच्या अंगावर उठवले जात. अशी काढलेली मेहंदी पांढया शुभ्र जनावरांच्या अंगावर उठून दिसायची. वाडीत सकाळी सकाळीच मांगांच्या हलगीने आरोळी दिलेली असायची. पुरण पोळीवर बेत मारून ते देखील आरामासाठी मारुतीच्या देवळात बसलेले असायचे. बेंदूर सण प्रत्येक घराघरातला मातीचा, शेतीचा, बळीराजाचा आणि त्याच्या सर्जा राजाचा सगळं वातावरण आनंदानं भरलेले असायचं. चाकरमान्यानी पुण्या मुंबईहुन येताना हौसेने आणलेल्या झुली, बाशिंगे, गळ्यातील घाटया आज बैलांच्या अंगावर चढणार होत्या. हक्कानं त्यांना पुरणपोळीचा नैवद्य मिळणार होता. बैलं कधी रंगवायची ? म्हणून लहान लहान मुले मागे लागली असायची. त्यांना रंगवून राहिलेला रंग आपल्या घरातील देव्हाऱ्यात पुजलेला बैलांना, शेरडांना, लहान वासरं, रेडकांच्या इवल्या इवल्याश्या शिंगांना लावायचा होता. उलीसा रंग ठेवावा. म्हणून पोरं मोठया माणसांना अगदी भंडावून सोडत असायची.
प्रत्येक परड्यात जनावरांच्या रंगरंगोटीची लगबग उसळलेली दिसे. लोहाराकडून बैलांच्या नख्या खुडून घेतल्या जात. पत्र्या मारल्या जात. तर शिंगे घोळून घेतली जात. बैलांच्या पायाला रंगीत पट्ट ओढलेले असायचं. त्यावर काळा गोप बांधला जायचा. शिंगाना भगवा, लाल, पिवळा, निळा, हिंगूळ लावून त्यावर रंगीबिरंगी बेगड चिटकवली जाई. एखाद्या नवऱ्याला मेकअप करून नटवावा तशी बैलं नटवली जायची. बैलांच्या शिंगामध्ये पितळी शेंब्या घातल्या जायच्या. शेंब्यामध्ये कुडबळी अडकविली जायची. कपाळावर आरश्याची नक्षी असलेली बाशिंगे बांधली जायची. त्यावर विविधरंगी रेबणीची फुले बांधली जायची. एवढा सगळा नट्टापट्टा झाल्यावर बैलांना कोणाची नजर लागू नये. म्हणून त्यांच्या दोन्ही शिंगाच्या मधोमध काळ्या गोपात लिंबू ओवून ते शिंगांना बांधले जायचं.
दुपारच्या सुमारास एकेक करून साऱ्या वाडीतील बैलं श्री मारुती मंदिरासमोर जमायला सुरुवात व्हायची. एखादया फुलाच्या बागेत रंगीबेरंगी फुलपाखरे जमा व्हावीत. त्याप्रमाणे रंगवून सजविलेली बैलं भासत असायची. एकदाची मिरवणुकीला सुरुवात व्हायची. मिरवणूक पहाण्यासाठी सभोवताली माणसांची गर्दी जमलेली. मारुती आणि लक्ष्मीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून ढोल, तासें, सनई, चौघडयाच्या गजरात, फटाक्यांच्या आवाजात बैलांची वाजत गाजत मिरवणूक निघायची. यावेळी मुंबईकर मंडळी आणि वाडीतील तरूण मंडळी आपापल्या तालात नाच धरायची. अधून मधून पावसाच्या जलधारा बळीराजाच्या नंदिवर पावसाचा अभिषेक करायच्या. आपल्या बैलाचा रूबाब पाहून शेतकरी राजा जाम खुष व्हायचा. आणि वर्षभर केलेल्या ढोर मेहनतीला विसरून जायचा.
मिरवणूक संपल्यावर बैलजोड्या आपापल्या घरापुढे अंगणात यायच्या. मग घराची मालकीण ओवाळणीचे ताट घेऊन ओसरीवर उभी असायची. तिच्या डोळ्यात आनंदाचं पाणी उभे राहायचे. बैलांची पूजा करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जाई. अशीच आमच्या संसारात आम्हाला साथ ध्या. म्हणून बैलांना प्रार्थना केली जायची. मुकी जनावरं ही आपल्या मालकीणीच्या डोळ्यातले पाणी पाहून हंबरून आवाज द्यायची. नकळतपणे त्याच्याही डोळ्यात पाणी यायचं. सणच आहे तसा. मुक्या प्राण्याचा जीव आपल्यासारख्या कळत्या सवरत्या माणसावर लागतो तेव्हा फक्त भाषा ही संवादाची नसते. तेव्हा आपणही मूक होवून जातो. हा प्रसंग सगळ्यांच पारणे फेडणारा असतो.
तर असा हा सार्वजनिकरित्या साजरा केला जाणारा बेंदूर सण शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा असतो.
इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. आपल्या पूर्वजांना ठाऊक असावे, कि आपली पुढची पिढी ही आपले सणवार, रीतिरिवाज, व्यवस्थित साजरे करील की नाही. जितराबं पाळणे त्यांना जमेल की नाही. आणि म्हणूनच त्यांनी दावणीच्या जिवंत बैलांबरोबरच निर्जीव असणाऱ्या कुंभारी बैलांची पूजा ही आपल्या देव्हाऱ्यात करायला सुरुवात केली असावी. जेणेकरून दावणीला जिवंत बैल राहिले नसले तरी निदान कुंभारी बैलांची तरी पूजा देव्हाऱ्यात केली जावी. आणि पूर्वजांचे भाकीत आज सत्यात उतरताना दिसते आहे. आज दावणीला बैलं राहिली नाहीत. अपवाद सोडले तर कित्येकांनी कुंभारी बैलं आपल्या देव्हाऱ्यात पूजलेत की नाहीत. ही शंकाच आहे. एकवेळ अशी होती. ज्यांना जमीन जुमला नव्हता ते भूमिहीन लोकं ही मोठ्या श्रद्देने बेंदरासारखे सण साजरे करत असंत. कारण त्यांना चांगलेच ठाऊक होते. की शेतकरी जगला तरच आपण ही जगू. कारण त्याने पिकविले तरच आपणास खायला मिळणार आहे. त्यासाठी शेती बरोबरच शेतकरी ही टिकला पाहिजे. एवढेच बेंदूर सणाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते.
#🌹☕️ गुड मॉर्निंग स्पेशल ☕️🌹 #बेंदूर# महाराष्ट्रीयन बेंदूर# बैलपोळा
#💐महाराष्ट्रीय बेंदुर सणाच्या खूप खुप शुभेच्छा💐 #आपली संस्कृति आपले संस्कार #☞★Post आवडल्यास नक्की लाइक❤❤
☞★➡️ फाॅलो करा 🙏🏻
☞★❤ लाईक ☑ कॉमेंट्स
☞★*⃣ टॅग 👍
☞★🔃 share करा












![आषाढी एकादशी - 06 ೮೫ रिविवार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल सिर्वभर्क्तांना आषाढी एकाद्शाच्या हर्दिक శిబీబు] रमेश उत्तम गुरव 06 ೮೫ रिविवार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल सिर्वभर्क्तांना आषाढी एकाद्शाच्या हर्दिक శిబీబు] रमेश उत्तम गुरव - ShareChat आषाढी एकादशी - 06 ೮೫ रिविवार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल सिर्वभर्क्तांना आषाढी एकाद्शाच्या हर्दिक శిబీబు] रमेश उत्तम गुरव 06 ೮೫ रिविवार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल सिर्वभर्क्तांना आषाढी एकाद्शाच्या हर्दिक శిబీబు] रमेश उत्तम गुरव - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_973736_1a7caa42_1752127829010_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=010_sc.jpg)
