#✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 वाचाल तर वाचाल
सकाळच्या थंडीत सायकल दामटत तो पोरगा रोज नेमाने येतो. यांत्रिक सफाईनं तुमच्या दरवाजाच्या फटीतून वर्तमानपत्र आत टाकतो. तेव्हा, याच फटीतून नवा भविष्यकाळ जन्माला येणार आहे, याची त्याला कल्पना नसते. आपल्याला तरी कुठे असते? पण, असे घडते. घडू शकते. कोणाच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीने काय बदल घडेल, हे तुम्ही सांगू शकत नाही. एखाद्या महान तत्त्ववेत्त्याच्या प्रवचनाने जो बदल होणार नाही, तो कोणाच्या चार ओळींच्या पत्राने होऊ शकतो.
नाही तर, हीच गंमत बघा. मिलिंद एंगडे नावाचा एक साधा, अल्पशिक्षित चपराशी. मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये कुठल्यातरी खासगी बॅंकेत काम करणारा. कशीबशी आपली कच्चीबच्ची सांभाळत पोट भरणारा. कामगारवर्गीय दलित वस्तीतल्या त्याच्या त्या घरात सगळाच अभाव. रोज दूध घेण्याची पंचाईत. तिथं बाकी चैन कुठं?
पण, या मिलिंदला वाचनाचा नाद. घरी एकवेळ दूध येणार नाही. पण, चार-पाच वर्तमानपत्रं मात्र घरात येणार. स्थानिक बातम्या कळाव्यात म्हणून एक. राज्य समजावं म्हणून एक. अग्रलेख आवडतात, म्हणून एक. आंतरराष्ट्रीय आकलन वाढावं म्हणून एक. अशी पाचेक वर्तमानपत्रं घरात येऊन पडायची. 'लोकमत' किंवा 'मराठवाडा' वगैरे त्यात असतीलच. तेव्हा मुंबईहून येणारे 'लोकसत्ता' आणि 'महाराष्ट्र टाइम्स'ही असायचे. एक दिवस उशीर झाला, तरी हरकत नाही. पण, ते पेपर रोज वाचायचेच. शिवाय इतर दैनिकं, नियतकालिकंही घरात येऊन पडायची. पण, फक्त पडायची नाहीत. मिलिंद अवघ्या कुटुंबाला घेऊन पेपर वाचायचा. त्यातले अग्रलेख, लेख यावर चर्चा करायचा. खरे तर, आजारपणामुळे नोकरीही गेलेल्या एका चपराशाला असले नाद परवडणारे नव्हते. पण, एकवेळ जेवण नसेल तरी चालेल. मात्र, वर्तमानपत्र, त्यातले लेख, संपादकीय, एकूणच वाचन आणि त्यावरच्या चर्चा याशिवाय मिलिंद जगू शकत नव्हता.
आजारपणामुळे घर नावाच्या खुराड्यात बंद असलेल्या मिलिंदचं जग त्या खुराड्याएवढं नव्हतं. त्याला शब्दशः जग खुणावत होतं. 'जग केवढं, ज्याच्या-त्याच्या डोक्याएवढं', हे केशवसुत म्हणाले, ते तर खरंच. त्यामुळं मिलिंदचं खोपटं केवढं आणि त्याचा पगार किती, याच्याशी त्याच्या या जगाचा संबंध नव्हता. त्याचं ते जग फारच विस्तीर्ण होतं.
मिलिंदच्या या महागड्या व्यसनांवर सगळेच हसत असताना, घरातला त्याचा पोरगा मात्र त्याच वर्तमानपत्रावर रेघोट्या मारत होता. हळूहळू वाचू लागला होता. बापाच्या गप्पा ऐकू लागला होता आणि हळूहळू बोलूही लागला होता. मिलिंदच्या अंधार्या खोलीत हा 'सूरज' उगवत होता.
सूरज मोठा झाला. वकील झाला. कायद्याचा अभ्यासक झाला. पुढं आणखी झेपावला. ऑक्सफर्ड विद्यापीठात डॉक्टरेट करू लागला. हॉर्वर्ड विद्यापीठात संशोधक म्हणून काम करू लागला. 'कास्ट मॅटर्स' या बहुचर्चित इंग्रजी पुस्तकाचा लेखक झाला. जगातला दखलपात्र विचारवंत आणि अभ्यासक म्हणून तळपू लागला.
हो.
जागतिक ख्यातीचे तरूण विचारवंत, स्कॉलर, आंबेडकरवादाचे अभ्यासक डॉ. सूरज एंगडे यांच्याविषयी मी बोलतोय. त्यांच्या मांडणीविषयी मी इथे भाष्य करत नाही. आज मुद्दा एवढाच की, दरवाजाच्या फटीतून आत आलेलं वर्तमानपत्र, भविष्याचे एवढे दरवाजे उघडू शकतं. हे वर्तमानपत्र मिलिंदनं त्या चिमुकल्या सूरजच्या हातात ठेवलं नसतं, तर कदाचित त्या वस्तीतल्या इतर मुलांचं जे झालं, तेच सूरजचंही होऊ शकलं असतं.
तुमच्या मुलांच्या हातात बाकी काही द्या न द्या, पण कागदाचे हे कपटे त्यांच्या चिमुकल्या मुठीत येऊ द्या. येऊ द्या कानावर त्यांच्या कोणी भीमसेन, किशोरी आमोणकर, जगजितसिंग अथवा राहत इंदोरी, आनंद शिंदे. दिसू द्या त्यांना आपली आई काही तरी चितारताना. किंवा, रांगताना बाळाच्या हातात येऊ द्या तुटलेलं एखादं घुंगरू. डोळे किलकिले करून मूल जगाकडं पाहात असेल, तेव्हा मोबाइलमध्ये बुडालेला बाप आणि सिरियल्स बघणारी आई एवढंच साठवू नये त्यानं. पै पै जमवून घरात एकेक वस्तू गोळा करणा-या आईचं रूप आठवेलच तो, पण आपल्याला मांडीवर बसवून काहीतरी वाचणारी-लिहिणारी आई त्याला अधिक आवडेल.
अंधार्या गुहेचे दरवाजे किलकिले होऊ शकतात. पण, त्यासाठी आपणही काही हालचाली कराव्या लागतात. घर किती स्क्वेअर फूटचं आहे, यावर तुम्हाला मिळणारी 'स्पेस' थोडीच अवलंबून असते! सूरजला त्या चाळवजा घरात विश्वभान देणारा अवकाश मिळालाच की. असे अनेक सूरज असतील, ज्यांना ही स्पेस मिळाली नाही, म्हणून ते उगवलेच नाहीत. कोणी सांगावं?
डॉ. सूरज एंगडे यांचा एक लेख काही वर्षांपूर्वी वाचला. आणि, कधी न भेटताही हा 'सूरज मिलिंद एंगडे' एकदम जवळचा वाटायला लागला.
- संजय आवटे
#स्वामी_संजयानंद
(आठवणीतून)