श्रीक्षेत्र गोंदवलेकर महाराज
31 Posts • 40K views
vijay
2K views 17 days ago
#श्रीक्षेत्र गोंदवलेकर महाराज ८ जानेवारी नामाचे प्रेम नामाच्या सहवासाने येईल. नामाचे प्रेम आपल्या प्रेमळ आईकडेच बघा. मुलाला जरा ताप आला तरी आईच्या पोटात धस्स होते अन्न गोड लागत नाही अशा अनेक गोष्टी होतात. थोडक्यात म्हणजे तिला सर्व बाजूंनी अस्वस्थता उत्पन्न होते. नाम घेण्यात थोडा व्यत्यय आला तर आपली स्थिती तशी होते का याचे उत्तर आपल्याला स्वत:कडूनच मिळण्यासारखे आहे. नाम घेणे हा माझा धर्म आहे ते माझे आद्य कर्तव्य आहे त्याच्याशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे नाम घेण्यात माझे आत्यंतिक हित आहे किंबहुना मी नामाकरिताच जन्माला आलो आणि तद्‌रूपच होऊन जाईन इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणे जरूर आहे आणि मग प्रेम आले नाही ही गोष्ट शक्यच नाही. प्रेम येत नाही याचा अर्थच हा की आम्ही नाम खर्‍या आस्थेने घेत नाही. ह्या सर्वांवर उपाय म्हणजे घेण्याच्या निश्चयाने ते जसे येईल तसे घेत राहणे. तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेऊन ध्येय गाठून देईल. परिस्थिती चांगली आली म्हणजे नाम घेईन असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही. नाम हे मनात किंवा उच्चार करूनही घेता येते. नामात राहावे म्हणजे अंत:करणाची शुध्दता होईल आणि अंत:करण शुध्द झाले की भगवंताचे प्रेम येईल. नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेले प्रेम नामात असणे जरूर आहे. खरे म्हटले म्हणजे नामांतच नामाचे प्रेम आहे. ताकात लोणी असतेच, फक्त ते वर दिसत नाही पण ताक घुसळल्यावर जसे ते वर येते तसे भगवंताचे नाम आपण घेतले की त्याचे प्रेम आपोआप वर येते. साध्या शब्दांचादेखील आपल्या वृत्तिवर परिणाम होऊन तो तो भाव आपल्या मनात जागृत होतो मग भगवंताच्या नामाने भगवंताचे प्रेम का येणार नाही ? आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्‍न करा. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी आपल्याला प्रेम येते ना ? प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे. तसे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल. उठता बसता चालता बोलता आपण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्‍न करावा. कोणतेही व्यसन कालांतराने पचनी पडते आणि मग मनुष्य जास्त जास्त त्याच्या आधीन जातो. अफूचे पहा दिवसेंदिवस त्या माणसाला जास्त अफू लागते. त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनाचे आपल्याला व्यसन लागले पाहिजे. कोणतीही चांगली गोष्ट साधायला कठीण असणारच; पण अगदी थोडया श्रमात पुष्कळ साधून देणारे नामासारखे दुसरे साधन नाही. म्हणून नेहमी मनाने नाम घेत असावे. ८. नामाचे प्रेम यायला एक गुरूंना ते आवडते म्हणून घ्यावे किंवा दुसरे नामातच माझे कल्याण आहे या भावनेने घ्यावे.
25 likes
53 shares