श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏
1K Posts • 1M views
vijay
2K views 20 days ago
#श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏 ४ जानेवारी नाम कसे घ्यावे ? नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे, पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते. पेढा ज्याने खाल्ला आहे, तो पेढा कसा खाऊ म्हणून जसे विचारणार नाही, तसे नाम घेणारा मनुष्य नाम कसे घेऊ म्हणून विचारणार नाही. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहात नाहीत. बी शेतात पडते तेव्हा, ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्यातरी एका बाजूला, खाली किंवा वरही असू शकेल; पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो. तसे, नाम कसेही घेतले तरी घेणार्‍याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. नाम घेताना कोणती बैठक असावी, किंवा कोणते आसन घालावे ? हा प्रश्न म्हणजे श्वासोच्छवास करताना कोणत्या तर्‍हेची बैठक असावी असे विचारण्यासारखा आहे. समजा, एखाद्याला दमा झाला आहे, तर तो काय करतो ? तो अशा तर्‍हेने बसण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्‍न करतो की, जेणेकरून श्वासोच्छवास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल; म्हणजे श्वासोच्छवास सुलभ रीतीने कसा चालेल, हे त्याचे ध्येय असते, आणि मग त्याकरिता देहाची बैठक कशीही ठेवावी लागली तरी चालते. श्वासोच्छवास विनाकष्ट चालू ठेवणे हे जसे त्याचे ध्येय असते तसे नाम अखंड कसे चालेल हे आपले ध्येय ठेवावे; आणि त्याला मदत होईल, व्यत्यय येणार नाही, अशा तर्‍हेची कोणतीही बैठक असावी. बैठकीला फार महत्व देऊ नये. समजा, आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागली, तर आपले लक्ष नामापेक्षा देहाकडेच लागेल; म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल. म्हणून नामस्मरणात खंड न व्हावा हे ध्येय ठेवून, त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृतिधर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी. भगवंताच्या नामाला शरीराचे कसलेही बंधन नाही. हेच तर नामाचे माहात्म्य आहे. मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे स्मरण सहज ठेवता येण्याचे एकच साधन आहे आणि ते म्हणजे त्याचे नाम होय. पण देहबुद्धी अशी आहे की त्या निरूपाधिक नामाला आपण काही तरी उपाधी जोडतो आणि त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो; असे न करावे. इतर उपाधी सुखदु:ख उत्पन्न करतील, पण नाम निरूपाधिक आनंद देईल. ४. शुध्द भावनेत आणि निष्ठेत खरे समाधान आहे; ही निष्ठा अनुसंधानाने उत्पन्न होते.
27 likes
1 comment 81 shares
vijay
593 views 11 hours ago
#श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏 २४ जानेवारी नामसाधन कसे करावे ? नामाचे साधन कसे करावे ? एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोक पडेल, आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल; त्याप्रमाणे, केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने, ठराविक वेळी, आणि शक्य तर ठराविक स्थळी, जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. जात्याला दोन पेठी असतात; त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा दोन पेठी आहेत. त्यांतले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे, आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेठयात बसून तो त्याला फिरवतो, आणि मनरूपी पेठे स्थिर असते. देह प्रारब्धावर सोडावा, आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे, याहून नामाचे साधन दुसरे काय ? हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही, तर ते कोणालाही साधेल. गरिबाला गरिबीचे दु:ख होते म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही; विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही, तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही. साशंक वृत्तीने कितीही साधन केले, कितीही नामस्मरण केले, तरी कधी समाधान होणार नाही. नीतिधर्माचे आचरण, शास्त्रशुध्द वर्तन, शुद्ध अंतःकरण, आणि भगवंताचे स्मरण, इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोहोचेल; आणि शेवटपर्यंत तो पोहोचला तरच फायदा. 'घरी पोहोचल्यावर पत्र लिहा' असे म्हणतात, याचा अर्थ हाच आहे. प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात, त्याचप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृति आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते. 'भगवंता, मी तुझा आहे' असे रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रकट होत जाईल; आणि भगवंत जितका प्रकट होत जाईल तितके 'मी' पणाचे दडपण आपोआप कमी होत जाईल. २४. प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही.
14 likes
14 shares
vijay
2K views 19 hours ago
#श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏 २३ जानेवारी नामस्मरणरूपी शेताची मशागत. नामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत: सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणार्‍या कुंपणासारखे आहे. दुसरी गोष्ट, शुद्ध अंतःकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन. या जमिनीमधले दगड, हरळी, वगैरे काढून ती साफ करावी; म्हणजेच, अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर, वगैरे ठेवू नये. शुद्ध अंतःकरणानंतर नामस्मरणाचे महत्त्व आहे. नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे. हे बी किडके नसावे; म्हणजे, नाम सकाम नसावे. उत्तम बीज म्हणजे 'नामाकरिताच नाम' हे आहे. त्यानंतर तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी, यांची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत. यामुळे शेत चांगले यायला मदत होते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवत्‌कृपा होय. भगवत्‌कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही और आहे. पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही. शेताला लावण्याकरिता पाटाचे पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यामधून नेता येणे शक्य असते; परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरले, तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो. नामस्मरणरूपी शेताचे एक वैशिष्टय आहे. ते हे की, त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षणशक्ती आहे. म्हणून हे शेत वाया गेले असे कधीच होत नाही. आपण असे पाहू की, दोन शेतकरी आहेत; एक कर्तव्यकर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणारा आहे, तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा, ज्याने मशागत केली त्याचे शेत उत्तम वाढेल, पण दुसऱ्याचे वाढणार नाही. भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार, त्याचा एकाला फायदा मिळेल; तो दुसर्‍याला मिळणार नाही. म्हणजे जो नियम प्रपंचात लागू तोच परमार्थात लागू. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते. ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल, त्या प्रमाणात त्याला फायदा होईल, दुसर्‍याला नाही होणार. भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे. भगवंत निःपक्षपाती आहे. त्याच्यापाशी कोणताही भेद नाही. आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते. कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे. संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही, आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हेच यावरून दिसते. २३. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.
19 likes
40 shares