अभ्यंगस्नान आणि इतर २५ प्रकारची स्नाने ! आपल्या भारतीय (हिंदु) पद्धती, विधी, परंपरा यांचे अनोखे वैविध्य मला नेहमीच आकर्षित करते. जगभर अंघोळीच्या अनेकविध परंपरा, पद्धती आहेत; पण याचा भारतामध्ये जितक्या विस्ताराने विचार करण्यात आला आहे, तेवढा जगात अन्यत्र कुणीही केला नसावा.जगात अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले सार्वजनिक स्नानगृहे, स्त्रिया किंवा पुरुष यांची सामायिक स्नानगृहे, राजप्रासादातील राजघराण्याची स्नानगृहे यामध्ये असंख्य गोष्टी पहायला मिळतात. तरीही त्याची एक सीमा ठरली आहे. त्यापलीकडे हे वैविध्य फारसे जात नाही. आपल्या हिंदु संस्कृतीत माणसासमवेत देवांनासुद्धा अनेक प्रसंगी, अनेक प्रकारे स्नान घालण्याचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. देव, माणूस यांच्यासह श्राद्धप्रसंगी अगदी आत्म्यांनाही 'स्नानम् समर्पयामी' केले जाते.
हिंदु संस्कृतीमध्ये विविध ऋतू, मास, सणवार, त्या वेळचे तापमान इत्यादींचा विचार करून विविध प्रकारच्या स्नानांचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार असे ऋतू आणि मास यांनुसार केले जाणारे स्नान, विविध कारणांनी केले जाणारे स्नान, धार्मिक विधींची आवश्यकता म्हणून केले जाणारे स्नान इत्यादी अनेक प्रकारची स्नाने आपल्या जीवनपद्धतीत समाविष्ट आहेत. विवाह विधीत वधूवरांना हळद लावून, तर राजाला राज्याभिषेकाच्या आधी अनेक पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान घातले जाते. पूर्वी एखादी व्यक्ती मृत झाल्याचे खात्रीपूर्वक सांगता येत नसे; पण त्या व्यक्तीला स्नान घालण्याच्या विधीमुळे तो जर जिवंत असेल, तर त्याच्या डोक्यावर किंवा पायावर अचानक पाणी ओतण्यामुळे तो त्या झटक्याने शुद्धीवर येत असे. अंत्यविधीला गेलेली मंडळी घरी आल्यावर स्नान करतात. याचे महत्त्व सर्वांना 'कोरोना'च्या सार्वत्रिक महामारीमध्ये कळले.
आज आपण 'स्नान' या अत्यंत महत्त्वाच्या विधीच्या विविध विषयांची तपशीलवार माहिती पहाणार आहोत.
दीपावलीच्या निमित्ताने केले जाणारे अभ्यंगस्नान हे सर्वांत प्रसिद्ध असे स्नान आहे. हवेत येणारा थंडावा आणि कोरडेपणा यांचा विचार करून अंगाला तैलमर्दन करून सुगंधी आणि औषधी पदार्थांची उटी लावून, गरम पाण्याने समारंभपूर्वक स्नान करण्याची पद्धत अनेक पिढ्या हिंदु धर्मामध्ये प्रचलित आहे. हे स्नान नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे.
हिंदु धर्मामध्ये विविध प्रसंगी अनेक प्रकारची स्नाने सांगितली आहेत. दीपावलीच्या अभ्यंगस्नानाच्या निमित्ताने आपण हिंदु धर्मातील आणि साहित्यातील अशा विविध स्नानांची माहिती करून घेऊया.
२ अ. विविध ग्रंथांमध्ये सांगितलेले स्नान :
२ अ १. मंत्रस्नान : 'याज्ञवल्क्य स्मृती'मध्ये ७ प्रकारची गौण स्नाने सांगितलेली आहेत. त्यातील पहिले 'मंत्रस्नान' होय. 'पंचरात्र आगम ग्रंथ', 'परमेश्वर संहिता', 'स्नानविधी प्रकाश' इत्यादी ग्रंथांमध्ये याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. साधकाने विशिष्ट मंत्राचा जप करत पाण्याने स्नान करणे, देह प्रोक्षण करणे, उदक प्राशन करणे यांचा या स्नानात समावेश आहे. सामान्य स्नान अशक्य असेल किंवा अन्य काही विशिष्ट परिस्थितीत हे स्नान केले जाते.
२ अ २. भौमस्नान (मृत्तिकास्नान) : संपूर्ण शरिराला माती फासून केलेल्या स्नानाला 'भौमस्नान' किंवा 'मृत्तिकास्नान' म्हणतात. आता अगदी आधुनिक विज्ञानाने मुलतानी माती अंगाला फासून स्नान केल्याने शरिराची सर्व रंध्रे मोकळी होतात, हे मान्य केले आहे.
२ अ ३. अग्नीस्नान : माणसाच्या शरिराभोवती असलेल्या प्रभावळीचे ('ऑरा'चे) अस्तित्व आता काही वैज्ञानिकांनी स्वीकारले असून माणसाला येणार्या आजाराचा आधी या प्रभावळीवर परिणाम होतो. त्यामुळे या आभामंडळातील नकारात्मक ऊर्जा काढणे, ते शुद्ध करणे यांसाठी तुमच्या शरिराला स्पर्श न करता या आभामंडलाला अग्नीचा स्पर्श करणे, खडे मीठ, काचेचे स्फटिक या आभा मंडलाभोवती फिरवणे, शरिराला भस्म फासणे, हे या अग्नीस्नानामध्ये केले जाते.
२ अ ४. वायूस्नान : आधुनिक दृष्टीकोनातून शरिराला पूर्ण नग्नावस्थेत वारा लागू देणे, म्हणजे वायूस्नान ! परंतु हिंदु धर्मात यापलीकडे विचार केलेला दिसतो. दिवसभर रानावनात चरून सायंकाळी परत घरी येणार्या गायींच्या खुरांनी उडालेल्या धुळीचा वारा अंगावर घेणे, म्हणजे खरे वायूस्नान होय. या वेळेला 'गोरज मुहूर्त' असे म्हटले जाते.
२ अ ५. दिव्यस्नान : या स्नानामागे स्वतःचे तन, मन आणि आध्यात्मिक शुद्धी करण्याचा हेतू असतो. निसर्गाकडून थेट आकाशातून पडणारी पर्जन्यवृष्टी अंगावर घेत केलेले स्नान म्हणजे दिव्यस्नान होय. अशा वेळी उन्हाचे अस्तित्व असल्यास ते अधिक फलदायी मानले जाते.
२ अ ६. वरुणस्नान : वरुण हा जलस्रोतांचा अधिपती ग्रह आहे. वरुणस्नान, म्हणजे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये नदी, समुद्र, तलाव, सरोवर इत्यादींमध्ये केलेले स्नान ! आपल्याकडे आपण सोमवती अमावास्या, संक्रांत या दिवशी, तसेच सिंहस्थ पर्वामध्ये लाखो भाविक असे स्नान करतांना पहातो.
२ अ ७. मानसस्नान : अनेक विकारांनी, विचारांनी भारलेले स्वतःचे मन शुद्ध करण्यासाठी केलेले आत्मचिंतन, मंत्रोपासना, इष्टदेवतेची मानसपूजा म्हणजे मानसस्नान ! 'आचारमयूख' या ग्रंथात यासाठी चतुर्भुजचे; म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्मधारी श्रीविष्णूचे ध्यान सांगितले आहे.
२ आ. पूजेमध्ये देवतांना घालण्यात येणारे स्नान :
आपल्या बहुतेक सर्व पूजांमध्ये देवांना 'पंचामृत स्नान' घातले जाते. ही स्नान परंपरा अशी आहे,
२ आ १. दुग्ध स्नान : देवाला दुधाने स्नान घातले जाते. त्यानंतर लगेच शुद्धोदक स्नान घातले जाते.
२ आ २. दधि स्नान : दह्याने स्नान घालून नंतर शुद्धोदक (शुद्ध पाण्याने) स्नान घातले जाते.
२ आ ३. घृत स्नान : तूपाचे स्नान आणि नंतर शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते.
२ आ ४. मधु स्नान : मधाचे स्नान आणि त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते.
२ आ ५. शर्करा स्नान : साखरेने स्नान घातल्यानंतर शुद्धोदकाचे स्नान घालतात.
२ आ ६. अर्घ्योदक स्नान : पूजेमध्ये देवाला विविध स्नाने घालत असतांना पळीभर पाण्यात गंध, अक्षता, फुले घालून त्याचे अर्घ्योदक स्नान घातले जाते.
२ आ ७. उष्णोदक स्नान : पंचामृत स्नानामुळे देवाच्या मूर्तीला चिकटपणा येण्याचा संभव असतो. त्यामुळे नंतर उष्णोदकाने स्नान घातले जाते.
२ आ ८. विष्णुपादोदक स्नान : ज्यांना आजारपण, अशक्तपणा अशा विविध कारणांमुळे स्नान शक्य नसेल, अशांसाठी विष्णुपादोदक, विप्रपादोदक, गुरुपादोदक प्रोक्षण करणे, हे पवित्र स्नान मानले जाते.
२ आ ९. गंगोदकाचे पवित्र स्नान : पूर्वी घरांमधून पूजेमध्ये तांब्या भरून गंगेचे पवित्र पाणी ठेवलेले असे. एखाद्या अतीज्येष्ठ व्यक्तीला त्याची इच्छा म्हणून हे पाणी मिसळून गंगास्नान घातले जात असे. एरव्ही अंघोळ करतांना 'गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।।' (गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सप्त नद्यांनी माझ्या स्नानाच्या पाण्यात येऊन निवास करावा.) हा श्लोक म्हणून ते पाणीच सप्त नद्यांचे पवित्र जल म्हणून अंघोळीला घेतले जात असे.
२ आ १०. वस्त्रांतर स्नान : रोगग्रस्त किंवा आजारी माणसाला स्नान शक्य नसेल, तर जुनी वस्त्रे पालटून नवीन धूत वस्त्रे धारण करणे, हे गौणस्नान मानले जाते.
२ आ ११. देवतांसाठी विधींनुसार विविध स्नाने : याखेरीज विविध विधीनुरूप देवाला शंखोदक स्नान (शंखाने पाणी घालणे), शुद्धोदक स्नान, गंधोदक स्नान (चंदनाच्या गंधाचे पाणी घालणे) इत्यादी स्नाने घातली जातात.
२ इ. स्नान करण्याच्या वेळांनुसार स्नानाचे विविध प्रकार
स्नान करण्याच्या वेळा आणि प्रकार यांवरून स्नानाचे विविध प्रकार येथे देत आहे.
२ इ १. ऋषीस्नान : दिवस उजाडण्याआधी आकाशात तारे दिसत असतांना पाण्याच्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये केलेले स्नान म्हणजे ऋषीस्नान.
२ इ २. ब्रह्मस्नान : म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर केलेले स्नान ! ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या आधी दीड घंटा ते सूर्योदयाच्या आधी ४८ मिनिटे. ही वेळ अत्यंत पवित्र मानली गेली आहे.
२ इ ३. देवस्नान : सूर्योदयानंतर नदीमध्ये किंवा नदीचे स्मरण करत केलेले स्नान.
२ इ ४. मानवस्नान : सामान्य माणसाप्रमाणे सामान्यत: सकाळच्या वेळेत स्नान करणे.
२ इ ५. राक्षसस्नान : दिवसभरात उशिरा कधीतरी स्नान करणे.
२ इ ६. मुनीस्नान : पहाटे मौन धारण करून ईश्वर चिंतन करत स्नान करणे.
२ ई. धार्मिक परंपरा म्हणून केली जाणारी स्नाने
२ ई १. कार्तिक स्नान : कार्तिक मास हा भगवान विष्णु आणि भगवान शंकर यांच्या भक्तीसाठी आदर्श मानला जातो. या मासातील थंडीमध्ये ब्राह्ममुहूर्तावर स्नान करून दीपदान करणे, हे मोठे पुण्यकर्म मानले जाते.
२ ई २. माघ स्नान : माघ मासात ब्राह्ममुहूर्तावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पुष्कळ शुभ मानले जाते. माघ मासात जेव्हा सूर्य मकर राशीत असतो, तेव्हा उपवास आणि दानधर्म करावा.
याखेरीज माणसांसाठी बाष्प स्नान, आयुर्वेदातील विविध तैलस्नाने, गरम वाळूचे स्नान इत्यादी उपलब्ध आहेत. काही साहित्यिक स्नाने पहाणे हे मनोरंजकच आहे. सचैल स्नान म्हणजे अंगावरील कपड्यांसह केलेले स्नान, तर काक स्नान म्हणजे कावळ्यासारखे अंगावर पाणी उडवून केलेले स्नान. असे आहे हे स्नान माहात्म्य !
- मकरंद करंदीकर, ठाणे
नरकचतुर्दशी विषेश 💕🦋🥀🙏🚩
#🙏 प्रेरणादायक बॅनर #नरकचतुर्दशी #शुभ सकाळ #दिपावली नरकचतुर्दशी विषेश२०२५ 💕🌺🦋🥀