भारतीय सैनिक
23 Posts • 537K views
Mrs.Manjusha ....
615 views 1 months ago
भारतीय सैन्याचा नीडर चेहरा! #कथाविश्व (पराक्रम मोठा...वर्णन सविस्तर) एकेका हातात पंधरा पंधरा किलो वजनाची संहारक स्फोटके हातात घेऊन दुश्मनावर निर्णायक प्रहार करण्यासाठी पुढे निघालेल्या त्या तरुण,देखण्या आणि बहाद्दर सैन्याधिका-याच्या डोळ्यांसमोर त्याची जन्मदात्री उभी राहिली....कारण मोहिम जोखमीची होती...जिवंत माघारी येता येईलच याची शाश्वती दिसत नव्हती! चांगल्या पगाराची,सुरक्षित आणि विशेषत: कुटुंबात रमू देईल अशी सरकारी नोकरी सोडून जेंव्हा तो फौजेत निघाला होता तेंव्हा...आईसाहेबांनी फर्मावले होते...”हाती शस्त्र धरीत प्रत्यक्ष रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करणार असशील तरच भारतीय सैन्याधिका-याची वर्दी परिधान कर!” मध्यरात्र उलटून गेलेली...तरीही नेमकी त्यावेळी आई जागी होती...तिने लेकाचा फोन दुस-याच घंटेला उचलला. त्याचा फोन अशा अवेळी? पोरगं काहीतरी सांगत होतं...आणि तिला काहीही ऐकू येत नव्हतं....अत्याधुनिक रायफली गोळ्या डागताना खूप मोठा आवाज करतात....तो धमाका ऐकून तिच्या कानठळ्या बसल्या...काहीतरी अघटित होत असावं...तिचं काळीज थिजून गेलं...आणि फोनचा रिसीव्हर तिच्या हातातून गळून पडला! आता त्याचा पुन्हा फोन येईपर्यंत देवाचा धावा करीत बसावं...तिच्या मनानं तिची समजूत काढली! “आई,मी कदाचित जिवंत परतू शकणार नाही...पण तुला अभिमान वाटेल अशी कामगिरी करूनच दाखवेन...तुझी शपथ!” हे त्याचे शब्द आईपर्यंत पोहोचेपर्यंत हवेत विरून गेले...गोळीबाराचा,दारूगोळ्याचा वास त्या हवेत भरून राहिला होता! साहेबांनी आपला मोबाईल फोन खिशात ठेवला आणि ते पुढे सरसावले. सैनिक माता असलेल्या या मातोश्रींच्या सूनबाई सुद्धा तिकडं फौजेत कर्तव्यावर तैनात होत्या. केरळातल्या अलापुझा जिल्ह्यातल्या मुथूकुलम नावाच्या निसर्गसुंदर अशा छोट्या गावात राजलक्ष्मी वेणूप्रसाद नायर, लेकाच्या फोनची वाट पाहण्याशिवाय करू तरी काय शकणार होत्या? ऋषी लहानपणापासून देशाला सर्वस्व मानणारा युवक. अभ्यासात अव्वल होताच आणि साहसीसुद्धा. मनात आणले असते तर साऊथ चित्रपटांचा नायक सहजी झाला असता. पण त्याही पेक्षा तो सामाजिक कार्यकर्ता अधिक होता. आश्वासक शब्दांनी लोकांशी संवाद साधण्यात त्याचा हात धरू शकेल असा मुलगा गावात नव्हता. उच्च श्रेणीत इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यावर केरळ वीज मंडळात साहाय्यक अभियंता ही नोकरी हात जोडून उभी होती. पण या नोकरीत आयुष्य घालवण्यासाठी ऋषी जन्माला आलेले नव्हते...हे काळाने सिद्ध केले. हुतात्म्यांच्या कथा त्यांच्या मनात रुंजी घालीत असत...फौजेचा गणवेश त्यांना खुणावत असे. हाती बंदूक घेऊन आपण शत्रूवर तुटून पडलो आहोत, अशी स्वप्ने त्यांना दिवसा पडायची...राष्ट्रगीत गायले जाऊ लागले की ते रोमांचित होत असत! त्यांच्यात एक शूर सैनिक लपला होता...आणि त्याला या नागरी जीवनात अडकून पडल्यासारखे झाले होते! केरळ विद्युत मंडळात नोकरीला लागून एकच वर्ष झालेले असताना ऋषी यांनी विशेष परीक्षा देऊन एअर इंडियामध्ये नोकरी मिळवली. पण या नोकरीत ते रमणारे नव्हते...त्यांना शस्त्र,युद्ध खुणावत राहिले. शेवटी हजारो तरुणांमधून ऋषी इंडियन मिलिटरी अकादमी,देहराडून येथील सैन्याधिकारी प्रशिक्षण तुकडीसाठी निवडले गेले. शास्त्र आणि अभियांत्रिकीमध्ये कमालीचे स्वारस्य असलेल्या ऋषी यांना भारतीय सैन्याने नेतृत्वगुणांनी संपन्न केले...एका कोवळ्या तरुणाचे कणखर सैनिकात रुपांतर झाले होते. २०१० मध्ये ऋषी नायर मेकनाईझ्ड इन्फंट्री मध्ये रुजू झाले. भारतासारख्या वैविध्यपूर्ण सीमा आणि शत्रू अन्य कोणत्याही देशाला लाभलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक अधिका-याला,प्रत्येक सैनिकाला देशभर फिरवून आणले तरच गरजेच्या प्रसंगी अनुभवाचा उपयोग होऊ शकतो. सेना ऋषी साहेबांना असाच अनुभव देत गेली. चीन सीमेवर गेली कित्येक वर्षे मोठा सशस्त्र संघर्ष झालेला नाही. पाकिस्तान सीमेवरून समोरासमोर लढत नाही. ऋषी साहेबांसारख्या सळसळत्या रक्ताच्या सैनिकाला त्याची तलवार आजमावून पाहण्याची संधी मिळावी तरी कशी? ते संयुक्त राष्ट्र संघाच्या आफ्रिकी देशांतल्या शांतीसेनेमध्ये सेवा करून आले होते. परंतु प्रत्यक्ष मैदानात मर्दुमकी गाजवण्याची संधी त्यांना लाभली नव्हती! ते सैन्यात येण्याआधी कारगिल होऊन गेले होते...आणि काश्मिरात त्यांना पाठवण्यात आलेले नव्हते! परंतु कश्मीरने त्यांना जणू बोलावून घेतले...कारण भारतीय सैन्याची काश्मिरात गेली कित्येक दशके ‘रात्रं-दिन आम्हां युद्धाचा प्रसंग’..अशी स्थिती आहे. हजारो अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी शेकडो सैनिकांनी आपले प्राण अर्पण केलेले आहेत. अगदी उदाहरणच द्यायचे झाल्यास २००४ ते २०१४ या दशकात २०९३ निष्पाप नागरिकांचा बळी घेणा-या ४०४३ अतिरेक्यांना मारण्यासाठी सैनिक,अधिकारी,पोलिस, विविध संरक्षण दलांचे मिळून १०६७ जण धारातीर्थी पडले होते. काश्मिरात भारतीय सैन्य अखंडपणे युद्ध लढत आहे...! आणि हे समोरासमोरचे थेट युद्ध नव्हे! नव्या युद्धास्थितीला सामोरे जाण्यासाठी खास जम्मू-कश्मीरसाठी १९९० मध्ये तत्कालीन चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल एस.एफ.रॉड्रीक्स यांच्या नेतृत्वात आरपार कारवाई करणा-या आर.आर. अर्थात राष्ट्रीय रायफल्स या विशेष दलाची स्थापना करण्यात आली. लेफ्ट.जनरल पी.सी.मनकोटिया साहेब या दलाचे प्रथम डिरेक्टर जनरल होते. भारतीय सैन्याच्या विविध विभागांतून या दलात निवडक सैनिक,अधिकारी बोलावून घेतले जातात. पाकिस्तानी घुसखोर अतिरेकी,स्थानिक अतिरेकी यांच्या कारवाया रोखणे हे प्रामुख्याने कर्तव्य असलेली राष्ट्रीय रायफल्स स्थानिक जनतेमध्ये विकासात्मक कार्यक्रमसुद्धा हाती घेते. काश्मिरी जनतेला भारतीय संघराज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सेना करते...म्हणूनच काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे! त्यावेळी मेजर असलेले ऋषी राजलक्ष्मी यांनी राष्ट्रीय रायफल्सकडून २०१५ मध्ये आलेले बोलावणे आनंदाने स्वीकारले. काश्मिरातील त्राल नावाच्या भागात अतिरेक्यांनी उच्छाद मांडला होता. मेजर ऋषी यांनी या काळात येथे कंपनी कमांडर असताना अतिरेक्यांशी शस्त्राने लढण्यासोबतच स्थानिक जनतेशी प्रेमाचे नाते जोडण्यात चांगले यश मिळवायला आरंभ केला होता. शत्रूला शस्त्राने जिंकणे जेवढे महत्वाचे तेवढेच स्थानिक जनतेचे मन जिंकून घेणेही महत्त्वाचे आहे..हे त्यांनी जाणले. अतिरेकीविरोधी मोहिमांत ऋषी साहेब हिरीरीने सहभागी होत...त्यांना शत्रूच्या रक्ताची चटक लागली होती...त्यांचे एक वरिष्ठ अधिकारी कर्नल विक्रम कड्यान त्यांना म्हणत...”कधी तरी तुला भीती वाटू दे..एकदा तरी स्वत:च्या जीवाची काळजी कर!” २०१५ मध्येच मेजर ऋषी इंडियन नर्सिंग सर्विसेसमध्ये श्रीनगर बेस आर्मी हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या मेजर अनुपमा यांचेशी विवाहबद्ध झाले! मेजर साहेब स्थानिक तरुणांशी,विशेषता: लहान मुलांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध ठेवून होते. पाकिस्तानी अपप्रचाराला बळी पडून ही नवी पिढी चुकीच्या मार्गाला जाणार नाही यासाठी मेजरसाहेब सतत प्रयत्नशील असत. याच भागात बु-हाण वानी नावाचा तरुण अतिरेकी कुप्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याने शेकडो काश्मिरी युवक पाकिस्तानी हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेच्या जाळ्यात ओढले होते. भारतीय सैन्याने या बु-हाण वानीला ८ जुलै २०१६ रोजी त्राल पासून साठ किलोमीटर्स अंतरावर असलेल्या कोकरनाग येथे यमसदनी धाडल्यावर काश्मिरात मोठा गहजब उडाला होता. परंतु मेजर ऋषी यांच्या कार्यक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही...कारण त्यांनी स्थानिक जनतेची विविध मार्गांनी मने जिंकून घेतली होती....स्थानिक लोक मेजर ऋषी यांना खान साहब म्हणून संबोधू लागले होते! चार मार्च,२०१७. शनिवार होता. त्राल मध्ये भारतीय सेनेचा स्थानिक नागरीकांसाठी मोफत वैद्यकीय उपचार उपक्रम सुरु होता. वैद्यकीय शिबिरासाठी सुमारे हजारभर रुग्ण जमा झाले होते. दुपारचे तीन वाजले होते. शिबिरात मेजरसाहेब लोकांशी संवाद साधत असताना त्यांना त्यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल नीरज पांडे साहेबांचा तातडीचा संदेश आला.....आकीब मौलवी हाफू गावात लपला आहे! बुऱ्हान वानीची जागा घेऊ पाहणारा, पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षित केलेला कमांडो, अनेक वर्षांपासून भारतीय सैन्याला हवा असणारा आणि प्रत्येक वेळी निसटून पळून जाण्यात यशस्वी झालेला आकीब मौलवी! याला आता सोडायचा नाही...मेजर ऋषी साहेबांनी निश्चय केला. अगदी काही मिनिटांतच त्यांनी आपली क्विक रिस्पॉन्स टीम सज्ज केली...आणि तेथून तीस किलोमीटर्स अंतरावर असलेल्या हाफू गावाकडे कूच केले...! या प्रवासादरम्यान विविध घटकांशी संपर्क साधला जाऊन हाफू गावाभोवती सी.आर.पी.एफ.(सेंट्रल रिजर्व पोलिस फोर्स) आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांनी मोहिमेचे क्षेत्ररक्षण लावले! स्थानिक लोकांना भारतीय सैन्याची ही हालचाल समजली...त्यांनी आकीबच्या समर्थनार्थ मोठा जमाव आणला...दगडफेक सुरु केली. मेजर ऋषी तिथे पोहोचताच त्यांने एका सैनिकाला सोबतीला घेऊन गावातील घरांत शोध सुरु केला...अर्धा तास झाला तरी कुणी हाती लागेना. पोलिसांनी दगडफेक करणा-या जमावाला कसेबसे रोखून धरले होते. तेथून काही अंतरावर असलेल्या एका घराबाहेर चार-पाच माणसांचा एक गट उभा होता...मेजरसाहेब थेट त्यांच्यापर्यंत पोहोचले....त्यातील एकानेही तोंड उघडले नाही...परंतु त्यातील एकाचे डोळे एका विशिष्ट घराकडे एकदा वळालेले मेजरसाहेबांनी चाणाक्षपणे टिपले...त्याच डोळ्यांनी मेजरसाहेबांच्या नजरेला नजर दिली...सावज त्या घरात लपले होते तर! साहेबांनी त्वरीत धाव घेतली...निवडक साथीदार सोबतीला घेतले...त्या घराभोवती फास आवळायला सुरुवात केली. त्या दुमजली घराच्या सीमाभिंतीपाठी आपल्या जवानांनी आपापल्या जागा घेतल्या! भारतीय सैन्याच्या नीतीनुसार मेजर ऋषी साहेबांनी आकीबला ‘शरण ये..अभय देतो’ असे आवाहन केले...या आवाहनाला आकीबच्या रायफलने दुस-या मजल्यावरून गोळीबाराने आव्हान दिले...त्या घरातून एकाच वेळी दोन रायफल्स धडाडू लागल्या! आकीब एकटा नव्हता...पाकिस्तानी जैश-ए-मोहम्मदचा सैफुल्ला उर्फ उसामा सुद्धा होता..आज दोन शिकारी गवसणार होत्या! आता सी.आर.पी.एफ.,जम्मू-काश्मीर पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्स यांनी त्या घरावर नेम धरले...तीन तास गोळीबार सुरु होता! ते दोघे शस्त्रसज्ज होते..आधुनिक रायफली आणि भरपूर गोळाबारूद! ही मोहीम दिवसाउजेडी संपली तर बरे...त्या घरावर छोट्या तोफांनी मारा करणे शक्य होते..मात्र परिसरातील इतर घरांचे नुकसान,नागरीकांच्या जीविताला धोका नको म्हणून आर्टीलरी फायरचा पर्याय निवडला गेला नाही. त्याऐवजी त्या घरात स्फोटके लावून ते उडवून लावण्याची योजना आखली गेली. मेजर ऋषी साहेबांनी फोनवरून सीओ साहेबांची परवानगी मिळवली आणि पंधरा किलोचे एक स्फोटक हातात घेऊन ते त्या घराकडे निघाले...इतर सैनिक त्यांना कवरिंग फायर देऊ लागले...साहेबांचा जीवाभावाचा साथीदार लान्स नायक आवेश कुमार साहेबांसोबत होता...त्या घरावर अधून मधून एक एक फैर झाडत आवेश कुमार पुढे सरकत होते...सायंकाळचे साडेसहा वाजले होते...अंधार झाल्यावर मोहीम आणखी किचकट व्हायची शक्यता होती. आय.ई.डी. अर्थात इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोजीव डिवाईस घराच्या दरवाजाजवळ लावायचे...रिमोटने त्याचा स्फोट घडवून आणायचा...त्या घराला भगदाड पडले की त्यातून आत शिरायचे आणि अतिरेक्यांना शोधून ठार मारायचे! अर्थात अतिरेकी सुद्धा प्रशिक्षित असतात...त्यांनी भारतीय सेनेची ही चाल ओळखली...त्यांचा गोळीबार एक मिनिट थांबला...याचाच अर्थ ते दोघे जागा बदलण्याच्या प्रयत्नात होते...स्फोटक लावल्यावर साहेब आणि आवेश कुमार तिथून मागे सरले...कानठळ्या बसवणारा मोठा स्फोट झाला....त्या घराचा दरवाजा उध्वस्त झाला...पण या गडबडीत एक अणकुचीदार दगड उडाला तो थेट मेजर साहेबांच्या हेल्मेटच्या अगदी खालच्या भागात डोक्याला लागला...मोठी जखम झाली...कारण दगडाने नेमकी एक रक्तवाहिनी फोडली होती...आवेश कुमार यांनी साहेबांना तेथून औषधोपचारासाठी हलवण्याचा मनोदय बोलून दाखवताच...साहेबांनी त्यास नकार दिला! एका सैनिकाने त्यांच्या डोक्याला मलमपट्टी केली. पंधरा मिनिटे गेली...वरून पुन्हा दोन रायफली धडाडू लागल्या! अंधार झाला होता. आता आणखी काहीतरी करणे भाग होते! यावेळी मेजर ऋषी साहेबांनी एक वेगळे शस्त्र हाती घेतले...पेट्रोल भरलेल्या आणि त्यात घासलेटमध्ये भिजवलेल्या कापडी वाती. जगभरात हिंसक निदर्शनात हे आयुध भलतेच प्रभावी ठरले आहे..याला मोलोटोव कॉकटेल म्हणतात! या बाटल्या आत फेकल्या की फुटतील आणि त्यातून निर्माण होणारी आग आणि धूर यांमुळे आत थांबणे अशक्य होईल...अशी योजना होती. बिळात लपलेल्या विषारी सापाला असे धुराने बाहेर काढावे लागते! साहेबांनी पुन्हा घराकडे धाव घेतली...किचनमध्ये एक बाटली फेकली...आतमध्ये आणखी काही बाटल्या फेकल्या...घरातील कारपेट,कापडाने पेट घेतला...आता अतिरेक्यांना दुस-या मजल्यावरून उड्या घेतल्याशिवाय गत्यंतर राहणार नव्हते! त्यांच्या स्वागतास भारतीय रायफल्स सज्ज होत्या! पण त्या घराची आग विझली! हा प्रयत्न वाया गेला होता! आता आणखी काहीतरी केलेच पाहिजे! मध्यरात्र उलटून गेली होती. कर्नल पांडे साहेबही तिथे पोहोचले होते. ऋषीसाहेबांनी त्या घरात घुसून आणखी आय.ई.डी. लावण्याचा निर्धार केला. डोके रक्ताने भिजलेले...बराच रक्तस्राव झालेला...पण साहेब कुठेही थकलेले दिसले नाहीत...दुस-या कुणाला आय.ई.डी.लावायला आत पाठवावे हा सल्ला त्यांनी मानला नाही...म्हणाले...हे माझे मिशन आहे...मीच संपवणार! हे दोघे अतिरेकी निसटून जाता कामा नयेत! मेजर ऋषी साहेबांनी पंधरा किलोचे दोन आय.ई.डी. नेण्याचे ठरवले...पहिला आय.ई.डी.हातात घेताच...त्यांना त्यांच्या मातोश्रींची आठवण आली....कसे कुणास ठाऊक त्या मध्यरात्रीही मातोश्री राजलक्ष्मी जाग्याच होत्या...साहेबांनी मोबाईलवरून घरचा नंबर डायल केला...पण त्यांचे बोलणे आईच्या कानांना ऐकूच गेले नाही...पण हृदयाला मात्र गेले असावे! वरच्या मजल्यावरून येणारा फायर आता सातत्याने येऊ लागला...दोघे आलटून पालटून भयावह गोळीबार करीत होते...साहेब दोन्ही हातात पंधरा पंधरा किलोचे आय.ई.डी.घेऊन सावधपणे पोटावर सरपटत त्या उध्वस्त झालेल्या दरवाज्यातून शिरले...आवेश कुमार सोबत येऊ पहात होते...त्याला त्यांनी बाहेरच थांबायला भाग पाडले..मोहिमेत त्याला काही झाले तर? त्याच्या घरच्यांना काय सांगणार? सोबतच्या कुणाही जवानाच्या जीविताला धक्का लागणार नाही, अशी खात्रीच साहेबांनी मोहीम सुरु करताना दिली होती..! लढ्यात सर्वांत पुढे मीच असणार! ऋषीसाहेब आत शिरले...तळमजल्यावर एका जागी आय.ई.डी.लावले आणि मागे फिरले...तीस सेकंद होताच स्फोट होणार होता...सुरुवातीला लावलेल्या एका आय.ई.डी.पेक्षा या दोन स्फोटकांचा परिणाम दुप्पट होणार होता...वीस सेकंद झाले आणि ऋषी साहेबांच्या मनात आणखी काहीतरी आले...आपण लावलेले आय.ई.डी. त्या घरात आणखी आत लावले तर अपेक्षित परिणाम साधला जाऊ शकेल...त्यांनी स्फोट घडवून आणू नका असा आदेश दिला! साहेब सरपटत पुन्हा आत शिरले...ती स्फोटके उचलणार इतक्यात त्या अंधारात वरच्या मजल्यावरून खाली सरकणारी एक सावली त्यांना दिसली...तोंडाच्या अगदी जवळ...रायफल धडाडली...एका गोळीने डोक्यावरचे हेल्मेट उडवून लावले...दुसरी गोळी साहेबांच्या नाकाचा डावा भाग भेदून गेली...तिसरीने जबडा तोडला..नाक राहिलेच नाही...डोळा अगदी थोडक्यात बचावला....पण डोळयांखालचा चेहराच राहिला नव्हता...त्याही स्थितीत साहेबांनी त्या आकृतीवर एक मोठी फैर झाडली...एक अतिरेकी खतम झाला होता! बाहेर उभे असलेले आवेश कुमार आत धावले...साहेबांनी त्यांना खुणेनेच थांबवले...दुसरा अतिरेकी अजून जिवंत आहे! तो अतिरेकी खाली येऊ शकतो...त्याचा गोळीबार सुरूच आहे...कवर फायर घेत , आपल्या हातात आपला चेहरा घेऊन मेजर ऋषी रांगत,सरपटत बाहेर आले...! निसर्गाची किमया म्हणावी...मोठी जखम झालेली शरीराला लगेच जाणवत नाही..वेदना जणू काहीकाळ थबकून राहतात! एका कोपरावर सरपटत साहेब पुढे आले...एक मीटर उंचीच्या कुंपणावरून त्यांनी स्वत:ला खाली लोटून दिले! आणि उभे राहिले! त्यांना सावरण्यासाठी पुढे आलेल्या सैनिकांनी आ वासला...साहेबांचा चेहरा? तिथे फक्त मांसाचा गोळा होता! प्राथमिक उपचार करण्याच्या पलीकडे परिस्थिती होती...वैद्यकीय साहाय्यक हादरून गेले होते...मेजर साहेबांना लष्करी जीपमधून जवळच्या हेलिपॅडपर्यंत नेण्यात आले...रात्रीची वेळ असल्याने लष्करी वाहने अडवून धरणारे दगडफेकी लोक सुदैवाने तिथे नव्हते...रूग्णालयापर्यंतचा प्रवास वेदनेने चिंब भिजलेला होता...लष्करी रुग्णालयात निरोप गेला होता...९२,बेस हॉस्पिटल,श्रीनगर येथे मेजर सौ.अनुपमा नायर त्या रात्री ड्युटी करून घरी गेल्या होत्या...आणि ऋषी साहेबांच्या गुड नाईट फोनची प्रतिक्षा करीत होत्या...त्यांनी त्वरीत गणवेश चढवला आणि त्या रुग्णालयात पोहोचल्या..! मेजर ऋषी चक्क बसलेल्या अवस्थेत रुग्णवाहिकेतून आले होते....त्यांच्या जखमा पाहून डॉक्टर्स विचारात पडले होते...इथे यावर काहीही उपचार करणे अशक्य आहे...अशी त्यांची खात्री होती..पण त्याहीपेक्षा तो चेहरा पाहून तेही हबकून गेले होते! मेजर साहेबांनी त्यांना थम्स अप केले! आणि डॉक्टरांचा हात हाती घेतला...जणू सांगत होते...मी ठीक आहे..मी ठीक होईन..तुम्ही चिंता करू नका! डोक्याला झालेल्या जखमेतून आधी झालेला रक्तस्राव आणि आता झालेल्या भयावह जखमांतून होत असणारा रक्तस्राव डॉक्टरांना काळजीत पाडणारा होता. हा रुग्ण बेशुद्ध झाला तर समस्या वाढणार होती. त्याला झालेल्या जखमा जर त्याने पाहिल्या असत्या,त्याला समजल्या असत्या तर त्याचा मानसिक ताण येऊन अधिक रक्तस्राव होण्याची शक्यताही अधिक होती. रक्तस्राव थांबवण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न झाले आणि दिवस उजाडताच हवाई दलाच्या विशेष विमानाने मेजर साहेबांना दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात धाडण्यात आले! याच दिवशी पाकिस्तानी अतिरेकी संघटनांनी त्यांचे दोन खासे जिहादी हाफिज मोहम्मद आकीब उर्फ आकीब मौलवी आणि सैफुल्ला उर्फ उसामा हे भारतीय सैन्याकडून मारले गेल्याचे जाहीर केले...मेजर ऋषी यांनी केलेल्या या शिकारी होत्या...एक मोठे यश होते हे! दिल्लीच्या रुग्णालयात ऋषी साहेबांनी कित्येक दिवस प्रचंड वेदना सहन केल्या...त्यांच्या चेह-यावर तब्बल २८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर किमान दोन महिने लागायचे त्या जखमा ब-या व्हायला...वेदनांचा लांबचा प्रवास होता हा. त्यांच्या शरीरातील एक हाड काढून ते जबड्यात बसवण्याचाही प्रयत्न झाला. पंचेचाळीस दिवस ते एक शब्दही उच्चारू शकले नाहीत. दातांनी चावून अन्न खाण्याची तर सोयच नव्हती...अन्न रबरी नळीतून पोटात घातले जात होते. पण हे सर्व होत असताना साहेबांचा दिसू शकणारा चेहरा कधी उदास दिसला नाही. इतरांना त्यांच्या त्या भगदाड पडलेल्या चेह-याकडे पाहणेही अवघड होते पण साहेब मनातून पुन्हा काश्मीरमध्ये परतण्याचा विचार करीत होते....कारण सैनिक खरा शोभतो तो रणांगणामध्येच. मातोश्री राजलक्ष्मी त्यांना भेटायला रुग्णालयात आल्या तेंव्हा त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही...डोळ्यांतून आसवे गाळली नाहीत...लेकाला वाईट वाटू नये म्हणून. पण पुढे कधीतरी मॉडेलिंगच्या क्षेत्रात नशीब आजमावून बघण्याची स्वप्ने पाहिलेल्या मुलाच्या चेह-याची अशी दुरवस्था पाहून त्या मनातून खचल्या मात्र असतील...पण आपल्या मुलाचा जीव वाचला याचे समाधानसुद्धा त्यांना होतेच. मेजर साहेबांच्या तब्येतीची चौकशी करणारे शेकडो फोन त्राल गावातून केले जात असत....हमारे खान साहब को वापस भेजो..हम उन्हें ठीक कर लेंगे! अशी आर्जवे लहान मुलं करीत असत...इतका विश्वास ऋषी साहेबांनी प्राप्त करून ठेवला होता! भारताचे तत्कालीन सेनाप्रमुख आणि पुढे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी विराजमान झालेले दिवंगत बिपीनजी रावत साहेब मेजर ऋषी यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले असताना...ऋषी साहेबांच्या डोळ्यांत आसवे तरळली...कारण आपले सेनाप्रमुख उभे आहेत आणि आपण त्यांना उभे राहून सल्यूट करू शकत नाही! मेजर साहेबांची कहाणी समजावून घेतल्यानंतर रावत साहेबांनी उत्स्फूर्तपणे त्यांना ‘सर्वांत नीडर सैनिक’ अशी उपाधी दिली! ऋषी यांनी या दुखण्यातून सावरण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेतले...आणि सैनिकी सेवेत पुन्हा पाऊल ठेवले...फक्त एकच बदल झाला होता...चेह-याचा हनुवटी ते नाकापर्यंतचा संपूर्ण भाग झाकणारा मुखवटा त्यांनी कायमचा अंगिकारला! हाच मुखवटा परिधान करून त्यांनी सेना मेडल पुरस्कार स्वीकारला! मेजर साहेबांना बढती मिळून ते लेफ्टनंट कर्नल झाले असून त्यांना काश्मिरात पुन्हा जायची आंतरिक इच्छा आहे....त्राल गाव आणि तेथील नागरीकांवर त्यांचा जीव जडला आहे. सध्या त्यांना त्यांच्या जन्मभूमीची, केरळची राजधानी असलेल्या थिरूवनंतपुरम येथील पान्गोडे लष्करी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक केली गेली आहे. तिथे ते लष्करी जवानांना प्रशिक्षित करत असतात. गेल्या वर्षी ऑगस्ट,२०२४ मध्ये वायनाड गावात भयावह भूस्ख्लन झाले. त्या गावात बचाव कार्य करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी लेफ्ट.कर्नल ऋषी राजलक्ष्मी साहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पाडली गेली. ऋषीसाहेब स्थानिक जनतेमध्ये,विशेषत: तरुणांमध्ये खूप प्रिय असून ते महाविद्यालये,सामाजिक संस्थांमध्ये अजून स्फूर्तीदायक व्याख्याने देत असतात...त्यांनी त्यांची शरीरसंपदा अतिशय उत्तम राखली असून त्यांच्यापासून युवक प्रेरणा घेत आहेत...काळा मुखवटा (मास्क) परिधान केलेला असला तरी भारतीय सेनेचा हा सर्वांत सुंदर चेहरा राष्ट्रप्रथम भावनेच्या तेजाने लखलखत असतो...जयहिंद साहेब...तुम्ही ऋषी आहात..तुम्हांला राजलक्ष्मी प्रसन्न आहे...आणि नायर म्हणजे नायक हे कुलनाम तुम्ही यथार्थ ठरवलेले आहे! खूप खूप शुभेच्छा! संभाजी बबन गायके. 9881298260.) (विविध स्रोतांतून माहिती घेतली आहे. यात विविध मुलाखती,विडीओज,बातम्या,इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव थरूर,राहुल सिंग लिखित पुस्तकातील माहितीचा समावेश आहे. छायाचित्रे सुद्धा याच माध्यमांतून घेतली आहेत. याचे सारे स्वामित्व आणि श्रेय संबंधित लेखक,छायाचित्र यांचेच आहे. सैन्यविषयक साहित्य हे बहुतांशपणे इंग्रजी भाषेत आहे. मराठी तरुणांना प्रेरणादायी व्हावे म्हणून मी हे साहित्य मराठीत आणण्याचा अशा लेखाद्वारे प्रयत्न करीत असतो. यात माझे आर्थिक हितसंबंध अजिबात नाहीत. फेसबुक व इतर समाजमाध्यमांमधून दिसणा-या बातम्या अपु-या वाटतात...म्हणून इतके सविस्तर लिहावे लागते.) कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉🇮🇳 #भारतीय सैनिक
14 likes
14 shares