एका छोट्याशा घरात गरीब मायलेकी राहत होत्या. खूप गरीब होत्या, पण त्यांच्याकडे मनाचा मोठेपणा होता.
एके रात्री दरवाज्यावर टकटक झाली. मुलीने दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. तिने खाली पाहिलं, तर एक चिठ्ठी पडलेली होती. ती उचलून वाचायला लागली, पण वाचताच तिचे हात थरथर कापू लागले. ती घाबरून जोरात ओरडली,
“आई! इकडे ये लवकर! बघ ना, यात काय लिहिलंय!”
आई पटकन आली आणि चिठ्ठी वाचली. त्यात लिहिलं होतं —
"बेटी, मी उद्या तुझ्या घरी येणार आहे, तुझ्या आणि तुझ्या आईला भेटायला.
– देव"
आईने चिठ्ठी वाचून हसत म्हणाली, “ही कोणाची मस्करी असावी, कुणीतरी चेष्टा करतंय.”
पण मुलीला तो विनोद वाटला नाही. ती म्हणाली,
“आई, मला वाटतं हे खरं आहे. मला खात्री आहे देव नक्की येणार.”
त्या दोघींनी ठरवलं, घरात पाहुण्यांचं स्वागत उत्तम करायचं. घरात फक्त एक जुनी चटई होती, ती धुऊन नीट पसरली. पण स्वयंपाकघरात काहीच खायला नव्हतं.
मग प्रश्न असा... देव आले तर त्यांना काय खाऊ घालायचं?
मुलीने आपल्या बचतीतील ₹३०० काढले आणि म्हणाली, “आई, चल काहीतरी चांगलं आणू.”
त्या बाजारात गेल्या. बाहेर पाऊस पडण्याची शक्यता होती, म्हणून त्यांनी छत्री आणि शॉल घेतली.
बाजारात त्यांनी दूध, मिठाईचा एक डबा आणि थोडं सामान घेतलं — ₹२५० खर्च झाले, ₹५० उरले. दोघी आनंदाने घरी परतू लागल्या, मनात विचार — कदाचित देव आधीच आले असतील.
घराजवळ आल्या, तेवढ्यात पाऊस सुरू झाला. रस्त्याच्या कडेला एक गरीब दांपत्य दिसलं — त्यांच्या हातात एक लहान मूल होतं, ते रडत होतं. दोघंही पूर्ण भिजलेले, थंडीने थरथरत होते.
मुलीचं मन भरून आलं. तिने रिक्षावाल्याला सांगितलं, “दादा, थोडं थांबा.”
ती उतरली आणि पाहिलं — त्या मुलाला ताप होता, आणि त्यांच्या जवळ ना खाणं होतं, ना उबदार कपडे.
मुलीने काही क्षणही विचार केला नाही. ती म्हणाली,
“देव कधीही येतील, पण यांना असं सोडून देणं पाप आहे.”
तिने त्यांना सगळं दिलं — दूध, मिठाई, उरलेले ₹५०, शॉल आणि छत्री.
ती म्हणाली, “हे सगळं देवाच्या वतीने आहे. तुम्ही घ्या.”
त्या दांपत्याने भरल्या डोळ्यांनी आभार मानले.
आई-मुलगी पावसात भिजतच घरी पोहोचल्या. पण घरात कोणीच नव्हतं — फक्त दरवाज्यावर आणखी एक चिठ्ठी पडली होती.
मुलीने ती उघडली आणि वाचली —
"बेटी, आज तुला भेटून खूप आनंद झाला. तू थोडी अशक्त झाली आहेस, पण अजूनही तितकीच गोड दिसतेस.
मिठाईचा स्वाद अप्रतिम होता, शॉलने खूप उब दिली.
आणि पावसात दिलेल्या छत्रीसाठी धन्यवाद.
पुढच्या वेळी भेटू, तेव्हा सगळं परत देईन."
चिट्ठी वाचून मुलीला आश्चर्य वाटलं. ती घराबाहेर पळत गेली आणि इकडे तिकडे पाहू लागली. पण कोणीच दिसलं नाही तिला. एवढ्यात तीने चिट्ठीमधील शेवटची ओळ वाचायला घेतली,
"मला बाहेर शोधू नकोस, बेटी.
मी प्रत्येक ठिकाणी आहे — जिथे पवित्र विचार आणि निःस्वार्थ भाव असेल, तिथेच मी असेन.
जेव्हा कुणाला मदत करशील, तेव्हा समज की तु मला भेटलीस."
मुलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने आईला सगळं सांगितलं.
मायलेकी त्या रात्री झोपूच शकल्या नाहीत — मनात फक्त एक विचार —
"आपण गरीब नाही, कारण आपल्याकडे दयाळू मन आहे."
🌸 शिकवण :
खरी श्रीमंती पैशात नसते, तर आपल्या कर्मात असते.
पैसे आपण या जगात सोडून जातो, पण चांगले कर्म आपल्यासोबतच राहतात.
म्हणून आयुष्यात नेहमी प्रयत्न करा की पैशाने नव्हे, तर मनाने आणि कृतीने श्रीमंत व्हा.
#मनाचामोठेपणा #🎭Whatsapp status