s
271 Posts • 2M views
नमस्कार मी सौ.मेघना शेळके कुलकर्णी राहणार नवी मुंबई. आज मला एका अश्या नाजूक विषयावर बोलायचे आहे जो प्रत्येक स्त्रीला बाहेरगावी जाताना सतावतो. आणि तो म्हणजे शरीरातील मळमूत्र विसर्जन. आपल्यापैकी बऱ्याच जणी शासनाच्या मोफत किंवा अर्ध्या दरात एस टी ने प्रवास करत असतील, प्रवास करताना खरंच खूप मजा येते, पण जर का अचानक लघवी,संडास किंवा पाळी आली तर. तर मात्र खरंच खूप राग येतो किँवा किळस घृणा वाटते स्त्री असल्याची. पुरुषाचं एक बार आहे, लघवी आली की कडेला जाऊन मोकळ व्हायचं. संडास आली तरी जास्ती काही चिंता नाही, कोपऱ्यात किंवा झुडपात गेलं तरी चालतं, आणि पाळी ची तर कटकट नाहीच. पण स्त्रियांचं काय. स्त्रियांना निसर्गतःच जन्मजात एक प्रकारची लज्जा किंवा न्यूनगंड असतो. कितीतरी बस स्थानकात शौचालय नसतेच आणि असले तरी त्याची भयाण अवस्था असते. दार नाहीत, असली तरी मोडलेली,आतमध्ये सगळी घाण तशीच पडलेली, ना पाणी ना स्वच्छ्ता. भरीस भर म्हणून महिलांच्या शौचालयात भिंतीवर जी एक मवाली लोकांकडून चीत्रकारीता केलेली असते ती बघून किळसच येते. अश्या अवस्थेत लघवी किंवा संडास करणे म्हणजे किंवा पाळी आली तर पॅड बदलणे म्हणजे दिव्यच. आणि जरी एखादीला हे सगळं जमलं तरी कालांतराने मुत्रमार्गाचा संसर्ग हा ठरलेलाच आहे. सरकार दरबारी कितीही करोडोंच्या मोठ्या घोषणा,योजना केल्या तरी स्त्रियांसाठी ही साधी गोष्ट कोणत्याच सरकारला करावीशी वाटत नाही. नुकतीच राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे, या योजनेचे आम्हाला कौतुक आहेच कारण पंधराशे रुपये का होईना पण ते गरीब होतकरू महिलांच्या अडीअडचणीला हाताशी येतील त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. परंतु जर आम्ही सन्माननीय,आदरणीय मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या लाडक्या बहिणी आहोत मग आमच्या साठी सगळीकडे एक साधे सुरक्षित शौचालय का नसावे. किती बरे आम्ही कुचंबणा सहन करावी आणि का करावी. त्यांच्या घरात पण आई,बहीण,मुलगी पत्नी स्त्रियाच आहेत ना, मग त्यांना विचारा की, त्या जातील का सार्वजनिक शौचालयात. एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीला पण जर लघवी,संडास करायची असेल तर ती पण प्रायव्हसी शोधते, उगाच वेश्या शरिरविक्रय करणारी आहे म्हणून जगासमोर उघड्यावर नाही बसत. मग आम्हाला लाज नाही का, का बरे आम्ही जगासमोर साडी वर करायची, का बरे आम्ही आमचे अंग परक्याना दाखवायचे, लोक पण निर्लज्ज होऊन बघत असतात. आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री साहेब तुम्ही इतका पैसा खर्च करणारच आहात मग अजून थोडेफार पैसे खर्च करून सर्व बहिणींना कृपया एक चांगल सुरक्षित शौचालय द्या. प्रत्येक गावात,बस स्टँड वर निदान एक तरी शौचालय बांधून द्या. खरंच सांगते इतके पुण्य मिळेल ह्याची तुम्हाला मोजदाद पण करता येणार नाही. आयुष्यात कायम पैसा,संपत्ती,किंवा राजकीय प्रतिष्ठा कामाला येत नाही, पण जनतेने दिलेले आशीर्वाद मात्र कायम कधीतरी कुठे ना कुठे उपयोगी पडतात. बघा विचार करा, आमचे काय आम्ही तर कायम सोसायलाच जन्माला आलो आहोत, जमलं तर आमचे हे दुःख कमी करा. आपली लाडकी बहिण मेघना शेळके कुलकर्णी. नवी मुंबई. 🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏 सदर लेख आवडल्यास हा नावासकट पोस्ट किंवा शेअर करावा ही विनंती. #s
4 likes
13 shares