🌹🌹बेंदुर🌹🌹
पूर्वी सणवार म्हटले की बाजारपेठा या आल्याच आल्या. बाजारपेठांशिवाय सणवार साजरे तरी कसे होणार. बरं आजच्या सारखी वाहन व्यवस्था तेव्हा समृद्ध नसल्यानं गावखेडी हि शहरापासून खूप दूर असायची. शहराला सगळ्यांनाच जायला जमेलच असे ही नाही. मग अश्यावेळी पंचक्रोशीतीलच एखादे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी बाजारपेठ असलेले गाव सगळ्यांना उपयोगी पडायचे.
याच धर्तीवर आमच्या खटाव तालुक्यातील औंध हे बाजारपेठ असलेले संस्थानी गाव होते. त्यामुळे औंध आणि त्याच्या परिसरातील गावे ही बाजारपेठ दृष्ट्या औंधशी जोडलेली होती. औंधचा आठवडी बाजार हा मंगळवारी भरत असे. विशेष असे की दसरा दिवाळी सण असो की आपला देशी बेंदूर. प्रत्येक सणाच्या अगोदर दोन तीन दिवसांच्या फरकाने मंगळवार हा आठवडी बाजार म्हणून अगोदरच भरत असे. त्यासाठी व्यापारी मंडळी सणासुदीला लागणारे लहानमोठे रंगांचे डब्बे, सुक्के रंग, विविधरंगी बेगड, गळयातील घुंगरमाळा, लहान मोठे सुती कासरे, वेसणी, झुली, जे जे म्हणून असेल ते ते साहित्य मोठ्या प्रमाणात भरून बाजारपेठा सजवून ठेवत. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीला लागणारे साहित्य हे शेतकरी वर्गाकडून अगोदरच खरेदी करून ठेवले जायचे. मनाजोगी खरेदी करून शेतकरी हा आपल्या कामात मग्न राहून येणाऱ्या सणाची आतुरतरने वाट पहात आपली कामे हातावेगळी करत असे.
शेतकऱ्यांना बेंदूर सण हा अतिशय प्रिय असे. कारण याच बेंदूर सणानिमित्त आपल्या शेतात वर्षभरापासून राबणाऱ्या आणि पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळ केलेल्या बैलांचा बेंदूर हा खास सण असे. वेळेत पाऊसपाणी पडल्यामुळे सारं शिवार हिरवेगार झालेले असे. पिके वाऱ्याच्या झोकावर डुलत असतात. आनंदाने पानातून आवाज काढत असतात. मध्येच एखादी पावसाची सर येऊन जायची. दूर वारूळ किंवा टेकडीवर बसून चितुर पक्षी आपल्या कर्णकर्कश आवाजात सारे वातावरण सावध करून टाकत. तर मोर ही क्याह क्याह ओरडत असे. अश्या आनंदी वातावरणात बेंदुर हा मुळाचा सण येऊन ठेपत असे.
आमच्या गणेशवाडीमध्ये ही बेंदराची जोरदार तयारी असे. सणानिमित्त गावी येण्यासाठी पुण्या मुंबईत पोटापाण्यासाठी राहिलेल्या आपल्या मुलाबाळांना आठवडाभरापूर्वीच सांगावा, चिठ्ठ्या, पत्रे गेलेली असायची. त्याप्रमाणे एकेक करून पुणे मुंबईकर मिळेल त्या वाहनाने गावी गणेशवाडीला हजर व्हायचा.
औंधमध्ये उगम पावलेल्या नांदणी नदीच्या पाण्याचा चोरटा प्रवाह छोट्या मोठ्या ओढ्याने वाहत करांडेवाडी आणि खरशींगे यांच्या नजीक असलेल्या सरकारी मळ्यातील पाण्याच्या मोठ्या डोहात समाविष्ट होतो. याच डोहाला नांन्नीचा डोह म्हटले जायचे. याच नांदणीच्या डोहावर जनावरे धुण्यासाठी गणेशवाडीकरांची मोठी गर्दी व्हायची. त्यासाठी खास मुंबईवरून आणलेला गोदरेजचा वारंवार चावीबार असलेला 501 बार साबण आणि घरातल्या वाळक्या दोडक्याच्या घासणीने बैलं बळीच्या पकावानी म्हणजे बगळ्या सारखी पांढरी शुभ्र धुवून काढली जात. गाई म्हैशी रेडकं, वासरे धुवून झाल्यावर स्वतःही वाहत्या डोहात मनसोक्त डुबक्या मारून सारा लवाजमा माळाच्या नागमोडी वळणाच्या पाऊलवाटेने डुलत डुलत जाताना पाहून वाटे कुण्या राजाचाच लवाजमा जात आहे.
सारी जनावरे परड्यात स्वच्छ जागेत बांधून त्यांना खायला वैरण टाकून पोरं घरी जेवायला धावत. दीड दोन किलोमीटरच्या तकाट्याने, जनावरे धुवून शिवाय डोहात मस्तपैकी पोहोण्याने पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात. मग काय गरमागरम भाकरी आणि कालवणाचा काला करून जेवणावर आडवा हात मारला जाई.
बेंदराची तयारी म्हणून अगोदरच माळ्यावर ठेवलेल्या घुंगराच्या माळांची डागडुजी करून त्या धुवून सजवून सोप्यातील खुटीला टांगलेल्या असायच्या. बैतेकरी मांगांनी सकाळीच आंब्याच्या पानांची तोरण माळ घरात आणून दिलेल्या असतात. त्या तोरणमाळ घराभोवती बांधून परड्यात शेणाने सारवून ठेवलेल्या कुरी, कुळव, रासणी, डूबी, कोळपी, काढवान अश्या छोट्या मोठ्या औतकाठीला बांधली जाई. संध्याकाळी खांदेमळणीसाठी गरम मिठाच्या पाण्याने शेक देऊन नंतर कडविलेल्या तेलात हळद टाकून त्या तेलाने बैलांच्या खांद्यांचा चांगलाच चोळून मोळून मशाज केला जाई. सर्व लहान मोठ्या जनावरांची खांदमळणी झाल्यावर त्यांना घमेले भरून घुगरया खायला घातल्या जात. तेल पाजले जाई. नंतर सर्व जनावरांना खायला वैरण टाकून परड्याचा झाप लावून गडी माणसं घरी जेवायला येत. गरमगरम गुळवण्यात बाजरीचे उकडलेले उंडे कुस्करून त्यावर ताव मारला जात असे. जेवण झाल्यावर लहान मुले सोप्यात झोपून जात. तर गडी माणसं देवळाकडे गप्पा मारायला जात.
उद्या सणाचा दिवस म्हणून बायका तांबडं फुटायच्या आणि कोंबडं आरवायच्या आतच उठून चुली पेटवायच्या. अंगुळा पांगुळा उरकून बायकांनी पुरण शिजवून पोळ्यांचे नैवद्य तयार केलेले असायचे. तोवर गडी माणसं, पोरं ही तयार झालेली असायची. ज्यांची बैलं धुवायची राहिलेली असायची. अशी माणसं आपली बैलं धुण्यासाठी आडावर गर्दी करायची. सगळ्यांची नुसती धांदल उडून जायची. अंडील बैलांच्या डरकाळ्यानी सारा परिसर दुमदुमून जायचा.
तोपर्यंत स्त्रियांनी नैवेद्य तयार करून ठेवलेला असायचा. पोरांची नैवेद्य घेऊन जाण्यासाठी चढाओढ लागायची. मग एकाने हातात पाण्याचा तांब्या घ्यायचा. तर दुसऱ्याने नैवेद्याचे ताट घेऊन ते नैवद्य सगळ्या शिवारात, गणेश मंदिर, मारूती मंदिर, लक्ष्मी मंदिर, म्हसोबा, यताळबा, आडाला या सगळ्या ठिकाणी नेवून दाखवायचा. बैलांच्या, गाईंच्या अंगाला पिवळ्या रंगाने रंगवून त्यावर पणती, वाटीचे ठसे विविध रंगामध्ये बुडवून ते गाई बैलांच्या अंगावर उठवले जात. अशी काढलेली मेहंदी पांढया शुभ्र जनावरांच्या अंगावर उठून दिसायची. वाडीत सकाळी सकाळीच मांगांच्या हलगीने आरोळी दिलेली असायची. पुरण पोळीवर बेत मारून ते देखील आरामासाठी मारुतीच्या देवळात बसलेले असायचे. बेंदूर सण प्रत्येक घराघरातला मातीचा, शेतीचा, बळीराजाचा आणि त्याच्या सर्जा राजाचा सगळं वातावरण आनंदानं भरलेले असायचं. चाकरमान्यानी पुण्या मुंबईहुन येताना हौसेने आणलेल्या झुली, बाशिंगे, गळ्यातील घाटया आज बैलांच्या अंगावर चढणार होत्या. हक्कानं त्यांना पुरणपोळीचा नैवद्य मिळणार होता. बैलं कधी रंगवायची ? म्हणून लहान लहान मुले मागे लागली असायची. त्यांना रंगवून राहिलेला रंग आपल्या घरातील देव्हाऱ्यात पुजलेला बैलांना, शेरडांना, लहान वासरं, रेडकांच्या इवल्या इवल्याश्या शिंगांना लावायचा होता. उलीसा रंग ठेवावा. म्हणून पोरं मोठया माणसांना अगदी भंडावून सोडत असायची.
प्रत्येक परड्यात जनावरांच्या रंगरंगोटीची लगबग उसळलेली दिसे. लोहाराकडून बैलांच्या नख्या खुडून घेतल्या जात. पत्र्या मारल्या जात. तर शिंगे घोळून घेतली जात. बैलांच्या पायाला रंगीत पट्ट ओढलेले असायचं. त्यावर काळा गोप बांधला जायचा. शिंगाना भगवा, लाल, पिवळा, निळा, हिंगूळ लावून त्यावर रंगीबिरंगी बेगड चिटकवली जाई. एखाद्या नवऱ्याला मेकअप करून नटवावा तशी बैलं नटवली जायची. बैलांच्या शिंगामध्ये पितळी शेंब्या घातल्या जायच्या. शेंब्यामध्ये कुडबळी अडकविली जायची. कपाळावर आरश्याची नक्षी असलेली बाशिंगे बांधली जायची. त्यावर विविधरंगी रेबणीची फुले बांधली जायची. एवढा सगळा नट्टापट्टा झाल्यावर बैलांना कोणाची नजर लागू नये. म्हणून त्यांच्या दोन्ही शिंगाच्या मधोमध काळ्या गोपात लिंबू ओवून ते शिंगांना बांधले जायचं.
दुपारच्या सुमारास एकेक करून साऱ्या वाडीतील बैलं श्री मारुती मंदिरासमोर जमायला सुरुवात व्हायची. एखादया फुलाच्या बागेत रंगीबेरंगी फुलपाखरे जमा व्हावीत. त्याप्रमाणे रंगवून सजविलेली बैलं भासत असायची. एकदाची मिरवणुकीला सुरुवात व्हायची. मिरवणूक पहाण्यासाठी सभोवताली माणसांची गर्दी जमलेली. मारुती आणि लक्ष्मीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून ढोल, तासें, सनई, चौघडयाच्या गजरात, फटाक्यांच्या आवाजात बैलांची वाजत गाजत मिरवणूक निघायची. यावेळी मुंबईकर मंडळी आणि वाडीतील तरूण मंडळी आपापल्या तालात नाच धरायची. अधून मधून पावसाच्या जलधारा बळीराजाच्या नंदिवर पावसाचा अभिषेक करायच्या. आपल्या बैलाचा रूबाब पाहून शेतकरी राजा जाम खुष व्हायचा. आणि वर्षभर केलेल्या ढोर मेहनतीला विसरून जायचा.
मिरवणूक संपल्यावर बैलजोड्या आपापल्या घरापुढे अंगणात यायच्या. मग घराची मालकीण ओवाळणीचे ताट घेऊन ओसरीवर उभी असायची. तिच्या डोळ्यात आनंदाचं पाणी उभे राहायचे. बैलांची पूजा करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जाई. अशीच आमच्या संसारात आम्हाला साथ ध्या. म्हणून बैलांना प्रार्थना केली जायची. मुकी जनावरं ही आपल्या मालकीणीच्या डोळ्यातले पाणी पाहून हंबरून आवाज द्यायची. नकळतपणे त्याच्याही डोळ्यात पाणी यायचं. सणच आहे तसा. मुक्या प्राण्याचा जीव आपल्यासारख्या कळत्या सवरत्या माणसावर लागतो तेव्हा फक्त भाषा ही संवादाची नसते. तेव्हा आपणही मूक होवून जातो. हा प्रसंग सगळ्यांच पारणे फेडणारा असतो.
तर असा हा सार्वजनिकरित्या साजरा केला जाणारा बेंदूर सण शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा असतो.
इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. आपल्या पूर्वजांना ठाऊक असावे, कि आपली पुढची पिढी ही आपले सणवार, रीतिरिवाज, व्यवस्थित साजरे करील की नाही. जितराबं पाळणे त्यांना जमेल की नाही. आणि म्हणूनच त्यांनी दावणीच्या जिवंत बैलांबरोबरच निर्जीव असणाऱ्या कुंभारी बैलांची पूजा ही आपल्या देव्हाऱ्यात करायला सुरुवात केली असावी. जेणेकरून दावणीला जिवंत बैल राहिले नसले तरी निदान कुंभारी बैलांची तरी पूजा देव्हाऱ्यात केली जावी. आणि पूर्वजांचे भाकीत आज सत्यात उतरताना दिसते आहे. आज दावणीला बैलं राहिली नाहीत. अपवाद सोडले तर कित्येकांनी कुंभारी बैलं आपल्या देव्हाऱ्यात पूजलेत की नाहीत. ही शंकाच आहे. एकवेळ अशी होती. ज्यांना जमीन जुमला नव्हता ते भूमिहीन लोकं ही मोठ्या श्रद्देने बेंदरासारखे सण साजरे करत असंत. कारण त्यांना चांगलेच ठाऊक होते. की शेतकरी जगला तरच आपण ही जगू. कारण त्याने पिकविले तरच आपणास खायला मिळणार आहे. त्यासाठी शेती बरोबरच शेतकरी ही टिकला पाहिजे. एवढेच बेंदूर सणाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते.
#🌹☕️ गुड मॉर्निंग स्पेशल ☕️🌹 #बेंदूर# महाराष्ट्रीयन बेंदूर# बैलपोळा
#💐महाराष्ट्रीय बेंदुर सणाच्या खूप खुप शुभेच्छा💐 #आपली संस्कृति आपले संस्कार #☞★Post आवडल्यास नक्की लाइक❤❤
☞★➡️ फाॅलो करा 🙏🏻
☞★❤ लाईक ☑ कॉमेंट्स
☞★*⃣ टॅग 👍
☞★🔃 share करा