नागपंचमी #
92 Posts • 650K views
गोरक्षनाथ आणि नागपंचमी आत्तापर्यंतच्या सर्व योग्यांमध्ये ताऱ्याप्रमाणे चमकणारे एक नाव म्हणजे गोरक्षनाथ. प्रचंड योगसामर्थ्यामुळे आणि कठोर तपसाधनेमुळे यांची तुलना साक्षात “शिवा”बरोबर केली जाते. नवव्या शतकाच्या कालखंडात गोरक्षनाथ भारत परिक्रमा करत असताना ‘श्रीयाळ पूर’ /’श्रीयालय’/’शिराळे’/’बत्तीस शिराळा ‘ येथे आले होते. तो काळ श्रावण महिन्याचा होता. दिवसा शिराळा गावामध्ये भिक्षा मागून पुरेसे अन्न गोळा झाल्यानंतर नाथ आपल्या साधनेत लीन होत असत. शिराळा गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या टेकड्यांवर तसेच आजूबाजूच्या परिसरात त्यांचे वास्तव्य होते. आज अस्तित्वात असलेला गोरक्षनाथ मठ जेथे दोन ओढ्यांचा संगम आहे तेथे, तसेच दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या ओढापात्रातील कातळात (काळे पाषाण) ते ध्यानधारणा करत असत. नाथ मंदिराच्या दक्षिणेला असणारा भाटशिरगाव येथील चंद्राकार डोंगराला ‘नाथाचा डोंगर ‘ असे संबोधतात. तेथे पायथ्याला भैरवाचे तर वर पठारावर नाथाचे दुर्गम मंदिर आहे. या पावन परिसरात कठोर तपश्चर्या करून गोरक्षनाथानी अनेक सिद्धी प्राप्त केल्या. त्या काळात अष्टांग साधना प्रचलित होती. त्या मधील ‘यम’ आणि ‘नियम’ हि साधनेची अंगे वगळून नाथांनी ‘षडंग’ साधना म्हणजेच ‘हटयोग’ साधला. ज्या काळात भारतीय अध्यात्मिक साधना ‘मद्य मांस मैथुन मुद्रा आणि मत्स्य’ या पंच म’कारात अडकून पडली होती ,तेंव्हा तिला नैतिक आविष्काराचा मार्ग गोरक्षनाथांनी दाखविला. ‘अलख निरंजन’ चा बोध प्राप्त करून नाथ पंथाच्या गुरु-शिष्य परंपरेत चैतन्य निर्माण केले. पशु पक्षी प्राणी आणि निसर्ग यांच्याशी ते समरूप झाले. त्यांची दुखे जाणून त्यावर मार्ग काढला. ‘जिवंत नागांची पूजा’ हि त्यापैकीच एक परंपरा. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मळभ गळत असताना म्हणजेच प्रचंड पाऊस पडत असताना, ‘वारणा’ आणि ‘पंचगंगा’ या नद्या दख्खनचे अश्रू बनून दुथडी भरून आवेशात वाहू लागतात. अनेक वृक्ष प्राणी सरीसृप निवार्या सहित वाहून जातात. पाण्याचा वाढत्या पातळी बरोबर अनेक नाग साप किनाऱ्यापासून दूर सरकू लागतात. पण शेवटी नाईलाज होतो , निसर्गाच्या या रुद्र रुपासमोर हे बिचारे जीव हतबल होतात. सर्पांच्या अनेक बिळांमध्ये पाणी शिरते. बिळाची तोंडे पावसाच्या माऱ्याने ढासळतात आणि परिणामी बिळे मुजतात. कित्येक दिवस हे सरीसृप त्यात अडकून राहतात. बाहेर पडता न आल्याने मरून जातात तर काही प्रवाहाबरोबर वाहून जातात. निसर्गाचे अगदी बारकाईने निरीक्षण करणाऱ्या गोरक्ष नाथांच्या ध्यानात शेकडो वर्षांपूर्वी हा प्रकार आला , त्यांच्यातील भूतदया करुणा जागृत झाली. आणि त्यांनी या जीवांना अभय देण्याचे ठरवले. भीतीपोटी लोक नागांना मारतात त्यामुळे लोकांमधील भय नष्ट करणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी जीवदान दिलेला एक नाग आपल्या झोळीमध्ये घेतला आणि नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्यासाठी ते शिराळा गावात आले. सुदैवाने तो नागपंचमीचा दिवस होता. शिराळ्यातील महाजनाच्या घरासमोर येवून त्यांनी भिक्षा मागण्यासाठी ‘अलख नाद’ केला...बराच वेळ घरातून कोणी बाहेर येईना...गोरखनाथांनी पुन्हा एकदा मोठ्याने ‘अलख निरंजन’ असा आवाज दिला...तेवढ्यात एक स्त्री बाहेर आली. तिने नाथांना सांगितले कि आज नागपंचमीचा दिवस असल्याने ती मातीच्या नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यात व्यस्त होती. त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणाले ‘माई तू जिवंत नागाची का पूजा करत नाहीस?’ असे म्हणून त्यांनी आपल्या झोळीतील नाग बाहेर काढला आणि त्याची पूजा करण्यास सांगितले. हा नवखा प्रकार पाहून अनेक लोक जमा झाले. तेंव्हा गोरखनाथांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले. तो नाग पुन्हा आपल्या झोळीत टाकला आणि प्रत्येकाच्या घरी घेवून गेले , आणि नंतरच भिक्षा ग्रहण केली. लोकांच्या मनातले भय नष्ट झाले. तेंव्हापासून आत्तापर्यंत घरोघरी ‘जिवंत नागांची पूजा’ करण्याची हि परंपरा गेल्या १२०० वर्षांपासून सुरु आहे. त्यानंतर दर बारा वर्षांनी गोरक्षनाथ या स्वयंभू ठिकाणी आपल्या शिष्यांसमवेत अनेक दशके येत होते. गोरक्षनाथ आपल्या मार्गात परिक्रमा करत निघून गेले पण त्यांच्या अनेक आठवणी आजही शिराळा येथील गोरक्षनाथ मठात जिवंत आहेत. त्यांनी १२०० वर्षापूर्वी लावलेले “गोरक्ष चिंचेचे” दुर्मिळ औषधी झाड आजही त्यांच्या आठवणीची साक्ष देत दिमाखात उभे आहे. त्यांच्या पश्चात दर बारा वर्षांनी येथे भारत परिक्रमा करत नाथ पंथीय दर्शनी साधूंची झुंड येते. त्यांच्या दृष्टीने हे स्वतः गोरक्षनाथांच्या तप सामर्थ्याने पावन झालेले अतिशय महत्वाचे तीर्थ आहे. दर बारा वर्षांनी झुन्डीतील एका अनुभवी आणि सक्षम साधूंची मठाधिपती म्हणून नेमणूक होते. जुने मठाधिपती राजसिक मोह सोडून पुन्हा ‘आदेश’ करून झुन्डीतील साधूंबरोबर मार्गस्थ होतात. जर बारा वर्षांचा कालावधी संपण्या अगोदर एखाद्या मठाधिपती चे निर्वाण झाले तर मठाच्या प्रांगणातच त्यांची समाधी निर्माण केली जाते. अशा अनेक सिद्ध पुरुषांच्या समाध्या गोरक्षनाथ मंदिर परिसरात आहेत आणि हे सर्व गुरु येथे सूक्ष्म रूपाने वास करतात अशी लोकांची धारणा आहे. येथेच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. एकादशीच्या दिवशी गोरक्षनाथांची भेट घेण्यासाठी ‘विठ्ठल’ म्हणजेच पांडुरंग येथे येतात. पंचक्रोशीत हे क्षेत्र ‘प्रतीपंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध आहे. या चैतन्याचा अनेकांनी अनुभव घेतला आहे. शिराळ्याचे मुळ नाव ‘श्री आलय’ होते. श्री म्हणजे लक्ष्मी आणि आलय म्हणजे निवासस्थान . कोल्हापूरची आदिशक्ती अंबामाता हिचे मुळ ठिकाण म्हणजे श्रीयालय . कोल्हासुराचा वध केल्यानंतर ती करवीरनिवासिनी झाली. या अंबामातेचे हेमाढ पंथी बांधणीचे मंदिर शिराळा येथे असून ती शिराळ्याची ग्राम दैवत आहे. या मंदिरात अम्बामातेला तेल वाहण्यासाठी गोरक्षनाथ येत होते. आजही त्यांच्या शिष्यामधील एक शिष्य (कि गोरक्षनाथच? ) अंबामातेच्या दर्शनासाठी झुंडीच्या वेळेस आवर्जून येतात. अनेक संत महंत जसे कि समर्थ रामदास ,निवृत्तिनाथ ,जंगली महाराज येथे येवून गेल्याचे दाखले आहेत. आणि त्यांनी आपल्या अभंगातून ,डफ गाण्यातून या लक्ष्मीच्या शिराळ्याची आणि येथील नागपंचमीच्या परंपरेची महती वर्णिली आहे. मुस्लीम शासकांनीही या परंपरेला दिलेले संरक्षण अनेक शिलालेखातून सापडते. “करवीर महात्म्य :करवीर खंड” ,”पद्मपुराण” , आदिनाथानी लिहिलेला “नाथ लीलामृत” अशा अनेक ग्रंथांमध्ये नागपंचमीचा उल्लेख आढळतो. ‘पन्नग’ या शब्दाचा अर्थ ‘नाग’ असा होतो. दहाव्या शतकात शिलाहार राजांनी बांधलेल्या ‘पन्नग गडावर ‘ म्हणजेच ‘पन्हाळ गडावर’ , पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ ‘नागझरी’ नावाचे तीर्थ आहे. या कुंडाजवळ असणाऱ्या शिलालेखात शिराळा येथील ‘नागपंचमी’ उत्सवाचा उल्लेख आहे. शिराळा ते पन्हाळा यामधील घनदाट जंगलाचा भाग हा या नागांचा नैसर्गिक अधिवास आहे. येथे हजारोंच्या संख्येने नाग सापडतात. शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या हजारो नागांचे, हि परंपरा आजही रक्षण करत आहे. या दिवशी स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची मनापासून पूजा करतात. या दिवशी स्वयंपाकामध्ये काहीही कापले किंवा चिरले जात नाही. नाग सूक्ष्म रूपाने आला तर मारला जाईल अशी सर्व स्त्रियांची भावना असते. ‘नाग हा प्राणी नसून आमचे दैवत आहे’ हि प्रत्येक शिराळकराची भावना असते. नाग पकडण्यापासून ते पुन्हा मूळ जागेवर आसर्याच्या ठिकाणी सोडण्यापर्यंत शिराळकर नागांची जीवापाड जपणूक करतात. त्याला कसलीही इजा होऊ देत नाहीत. जर एखादा नाग जनावरांचा पाय पडून जखमी झाला असेल ,किंवा मोर ,मुंगुस यांनी त्याला इजा पोहोचवली असेल तर त्याच्यावर उपचार केले जातात आणि नंतरच त्याला सुरक्षित अधिवासात सोडले जाते. येथे कधीही नागाला मारले जात नाही , त्यांचे दात किंवा विष काढले जात नाही . एकाच बांधाला पाच ते सहा नाग सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत. येथे शेतकरी आणि नाग गुण्या गोविंदाने नांदतात असेच आपणास म्हणावे लागेल. नाग पकडणे हि एक कला आहे. आणि तो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपारिक ज्ञानाचा अविष्कार आहे. त्याला भावनेची जोड आहे. या भावनेने भारीत होवून ,जंगलातून रानावनातून , काट्या-कुट्यातून दिवसभरात तीस ते चाळीस किलोमीटर चे अंतर तुडवून अनवाणी पाय कधी विसावतात ते कळतही नाही. नाग पकडताना होणारी भटकंती एक वेगळाच आनंद देते. हातामध्ये काठी घेवून एक वेगळ्याच प्रकारचे सम्मोहन पांघरून आम्ही शिराळकर नाग धरायला बाहेर पडतो. सगळा आशेचा आणि आस्थेचा खेळ आहे. जेंव्हा उन्हाची तिरीप पडते तेंव्हा नाग बाहेर पडण्याची शक्यता वाढते. हा उन पावसाचा लपंडाव आमच्यासाठी फलदायी असतो. दूरवर घोळक्याने किलबिलाट करणारे पक्षी आमचे लक्ष वेधून घेतात. माग (नागाच्या जाण्याचे चिखलात उठलेले ठसे किंवा व्रण ) शोधण्यासाठी ग्रुप केले जातात, बांध वाटून घेतले जातात. आणि शोध मोहीम सुरु होते. प्रत्येक निवाऱ्याचे ठिकाण, बीळ पालथे घातले जाते. शेतातला एक इंचही आमच्या नजरेतून सुटत नाही. नागाने तोंड दाखवल्यास किंवा ताजा माग सापडल्यास आपोआपच तोंडातून बाहेर पडते “अम्बाबाई च्या नावानं ,चांगभलं’...कि लगेच सगळे बांध सोडून त्या दिशेने वेड्यासारखे पळत सुटतात...हि घोषणा आमच्या साठी प्राण आहे....जेथे माग सापडला तेथे थोडा गुलाल टाकला जातो ...आणि ‘बीळ चालवायला’ सुरुवात होते...तशी आमची शिराळकरांची एक वेगळीच परिभाषा आहे ...माग काढणे, बीळ चालवणे, अवती लावणे...नागाडी ..हे त्या शब्दावलीतले काही शब्द...पण खरा सांगू का ,लय भन्नाट मज्जा असते ....आणि ती अनुभवण्यासाठी शिराळाला जायाला लागतं.... आदेश @top fans नाथ चैतन्य #नागपंचमी व श्रावण सोमवारच्या शुभेच्छा #नागपंचमी # #नागपंचमी #नागपंचमी #नागपंचमी
11 likes
24 shares