श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज जिथे असत तेथील सर्वाना या परमात्मा स्वरूपाने दोन शब्द आपल्याशी बोलावेत किंवा आपली विचारपूस करावी असे वाटत असे . दत्त महाराजांचा मितभाषी असा स्वभाव . तेव्हा त्यांनी कोणाची क्षेम कुशल चौकशी करताच त्या मनुष्याला आकाश ठेंगणे होई . गुरुचरित्रात अनेकांचे भाग्य मात्र थोर होते . सायंदेव ,गंगानुज ,तंतुक या सर्वांशी महाराजांनी अगदी भरभरून केलेल्या संवादांचा उल्लेख आहे .
गाणगापूरच्या मठात महाराज बसलेले असताना त्रिविक्रम भारती दोन मदोन्मत्त विप्राना घेऊन आले .ते विप्र महाराजांना म्हणू लागले कि शास्त्रार्थ चर्चा करा अन्यथा जयपत्र द्या . वेदशास्त्रादि व्याकरण l चर्चा करू म्हणती विप्र ll अनेकदा सांगून ब्राह्मण आपला हेका सोडेनात तेव्हा त्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने तिथून जाणाऱ्या एका मनुष्यास गुरुमहाराजांनी बोलावणे केले . महाराजांनी बोलावून आपला वृत्तांत विचारला याचे त्या मनुष्याला इतके अप्रूप वाटले कि म्हणाला ,त्वां कृपाळू गुरुमूर्ती l म्हणोनि पाचारिलें प्रीती l आपणा झाली उद्धारगती l म्हणोनि दंडवत नमन करी ll अहो महाराज ,आपण हाक मारलीत आणि बोलावून घेतलेत ,उद्धार झाला .
गाणगापूरला महाराज सकाळी संगमावर जात आणि अनुष्ठान संपवून माध्यान्ह काळी परत येत ,वाटेत असलेल्या शेतात एक शेतकरी नित्य नमस्कार करीत असे . महाराज काही बोलत नसत . नमस्काराचा स्वीकार करून पुढे जात . ऐसे कितीएक दिवस होता ll संयम हा भक्तीमार्गात अति आवश्यक आहे तो असा . महाराजांकडून प्रतिसाद मिळत नाही पण म्हणून निराश न होता याची भक्ती वाढलेली आहे . आज ना उद्या महाराज निश्चितपणे माझा उद्धार करतील .
येणेंविधि बहुकाळ क्रमिती l बराच काळ लोटला आणि उद्धाराची वेळ आली ,महाराजांनी विचारले, का गा तू कष्टतोसी l नमन करिसी येऊनिया ll महाराजांबरोबर संवादाचे भाग्य ज्यांच्या नशिबात होते ते धन्य होत . शेतकऱ्याला परमात्मा स्वरूपाची ओळख होती ,म्हणाला ,तू समस्ता प्रतिपाळिसी l अहो महाराज सामान्य म्हणून माझी उपेक्षा करू नका .
दत्त महाराज कोणाचीही उपेक्षा करीत नाहीत ,उद्धाराची वेळ मात्र यावी लागते .श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य 🌹🌼🙏
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇 #🙏शिर्डी साई बाबा #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस