*#शिवविचार_प्रतिष्ठान*
कवि कलश : एकनिष्ठ सेवक
डॉ. कदमांनी कलशाची फितुरीही ध्वनित केली आहे. मराठी कागदपत्रंच नव्हे
तर, खाफीखान, साकी मुस्तैदखान, भीमसेन सक्सेना हे तत्कालीन मोगल दरबारचे
इतिहास-लेखकही कलश फितूर झाले होते हे सांगत नाहीत. खुद्द खाफीखान कवि कलशांचा उल्लेख 'संभाजीच्या शूर सोबती सल्लागारांतील एकनिष्ठ प्रधान' म्हणून करतो. तत्कालीन मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर कलशाच्या फितुरीची
कथा सांगतो; पण त्याचा वृत्तांत या संदर्भात अत्यंत विसंगत व अनैतिहासिक विधानांनी भरलेला आहे. मनुची आणि आमच्या कलशांच्या फितुरीच्या कथा या तर बाजारगप्पाच होत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे - कलश फितूर झाले असते तर त्यांची बक्षिसी त्यास मिळाली असती; औरंगजेबाने त्यांचे असे हालहाल करून त्यास मारले नसते, हा तर्क दुर्लक्ष न करण्यासारखा आहे.सारांश, कवि कलश म्हणजे मंत्र-तंत्र करणारे, शाक्तपंथीय उत्तर प्रदेशी ब्राह्मण, फार फार तर विद्वान पंडित कवी अशी जी प्रतिमा इतिहासात नमूद आहे, ती परिपूर्ण नाही. त्यांचे पांडित्य हा त्याचा मुख्य स्वभावविशेष असला तरी केवळ पांडित्यामुळे ते संभाजीराजेंचे खास सल्लागार होते, असे नाही. त्यांच्याजवळ राजकारणी व प्रशासकीय गुण निश्चितपणे होते. म्हणूनच ते रायगडावरील राजकारणात प्रधानांच्या विरोधातही टिकून राहिले. मराठी राज्याची राजनैतिक बाजू सांभाळून त्यांनी आपले राजनैतिक गुणही सिद्ध केले आहेत. एवढेच नव्हे तर युद्धप्रयत्नांचे संयोजन व प्रत्यक्ष युद्धआघाडी याही क्षेत्रांत त्यांनीने आपली गती उत्तम प्रकारे दाखविली आहे. त्यांच्या अंगी असणाऱ्या या गुणांमुळेच संभाजी महाराजांनी त्यांला आपल्या कारभारातील प्रमुखपण (कुलयेख्तियारी) दिले. अशा प्रकारे मराठी कारभारात कोणाला ना कोणाला तरी प्रमुखपण येथून पुढे मिळत गेले आहे, ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. पुढच्या कालात महाराष्ट्रातील कारभारात रामचंद्रपंत अमात्यांना 'हुकमतपन्हा' म्हणून तर, कर्नाटकातील कारभारात प्रल्हाद निराजीस 'प्रतिनिधी' म्हणून राजाराम महाराजांनी कारभारातील प्रमुखपण दिलेले आहे. ताराबाईच्या कारकिर्दीत मराठी कारभारात त्यांचा खास विश्वासू अधिकारी म्हणून गिरजोजी यादव यास त्यांचा 'दिवाण' म्हणून प्रमुखपण मिळालेले आहे. पुढे शाहू महाराजांच्या काळात भट पेशवे राज्यकारभारप्रमुख बनले.संपूर्ण पेशवाई म्हणजे एक प्रकारची 'कुलयेख्तियारी'च आहे; पण मराठी इतिहासात उपरोक्त व्यक्तींच्या मराठी राज्याच्या कारभारातील 'कुलयेख्तियारी' ची बदनामी केली गेलेली नाही. कवि कलशाच्या कारभारातील प्रमुखपणाची मात्र ती केली गेली, यामागे तो मराठी नव्हते, परप्रांतीय होता, हेच खरे कारण होते.एका अमराठी माणसास मराठी राज्यात एवढे मोठे स्थान मिळावे, ही गोष्ट मराठी नोकरशाहीच्या पचनी पडणे शक्य नव्हते; पण आज तीनशे वर्षांनी या अमराठी माणसाने मराठी राजासाठी व मराठी राज्यासाठी केलेली एकनिष्ठ सेवा, शेवटी आपल्या धन्याबरोबर स्वीकारलेला यातनामय मृत्यू, याबद्दल निदान कृतज्ञतेची भावना व्यक्त करणे, हे मराठी माणसाचे कर्तव्य राहील असे वाटते.
#🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज