🌻 *li.आनंदी°दीवस.il* 🌻
*शाश्वत सुखाच्या नवरात्रीची*
*मुंबादेवीच्या मुंबापुरीतून*
*आजचा रंग..राखाडी 🩶*
*आजची नवदुर्गा..कात्यायनी*
*कात्यायनी महामाये,*
*महायोगिन्यधीश्वरी ।*
*नन्दगोपसुतं देवी,*
*पति मे कुरु ते नमः ॥*
*नवरात्र आनंद पर्व सुरु आहे. सध्या नऊ दिवस कन्या पूजनाचा सुखद.. अनुपम.. अवर्णनीय आनंद बालिकाच नाहीतर घरातील सारेच अनुभवत आहेत. देवीच्या कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत. इच्छापूर्ती करणे ही आदिमातेची ख्याती. पण त्यासाठी तेवढी उपासना हवी.*
*कात्यायन हे विश्वप्रसिद्ध महर्षी. #आजचा रंग राखाड़ी त्यांनी देवीच्या कृपेसाठी कठोर तप केले. देवीनी आपल्या घरी कन्या रूपात जन्म घ्यावा ही त्यांची मनोकामना देवीने पूर्ण केली. आजही सर्वच कन्याना देवीस्वरूप मानल्या जाते. आपल्याला किमान एक तरी कन्या असावी ही सर्वांची इच्छा असते. महर्षी कात्यायन यांची कन्या म्हणून देवीचे नाव आहे कात्यायनी. नवरात्रात आजचा दिवस कात्यायनी नवदुर्गेच्या पूजनाचा.*
*या देवीच्या कृपेने धर्म, अर्थ.. काम, मोक्ष प्राप्ती होते. पापापासून मुक्ती देणारी.. अभय देणारी, शोक.. संताप.. भय नष्ट करणारी अशी ही कात्यायनी देवी*
*या देवीच्या उपासनेने मुलींची लग्न होतात. त्यांना मनोवांछित वरप्राप्ती होते. कात्यायनी देवीला पिवळ्या रंगाची फुले वाहतात, मध तसेच पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करतात. अमोल फलदायीनी कात्यायनी देवीची रुपे तुळजापूर.. कोल्हापूर तसेच कन्याकुमारी येथे आहेत.*
*मुंबई.. इथं विराजमान आहे मुंबादेवी. मुंबई हे जगातील असे महानगर जिथे तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात असा तुमच्या गुणांचे चिज होते. इथे सगळ्या विद्या.. कला.. क्रिडा गुणांना प्रतिष्ठा.. यश आहे. इथे कष्टाने प्रत्येकाला लवकर श्रीमंत होण्याची संधी आहे. इथे "कधी कुणी उपाशी राहणार नाही" असे वरदानच या महानगरीला मुंबादेवी कृपेने प्राप्त आहे.*
*इथे ही मुंबादेवी लक्ष्मी.. अन्नपूर्णा.. जगदंबा स्वरुपात विराजमान आहे. मुंबादेवी जनतेच्या उदरनिर्वाहाचीच काळजी करते असे नाही, तर महानगरीचे संरक्षणही करते. इथे मुंबादेवीचे मंदिर ४०० वर्षे जुने आहे. एवढेच नाही तर समुद्र किनारी महालक्ष्मीचे २५० वर्षे जुने मंदिरही प्रसिध्द आहे.. भाविकांचे श्रद्धास्थान आहे.*
*मुंबई हे लक्ष्मीचे माहेर घर असल्याने तिला देशाची आर्थिक राजधानीचा सन्मान प्राप्त आहे. मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता असल्याने मुंबईकर शुभकार्य प्रसंगी पहिले तिचे स्मरण करतात.*
*महालक्ष्मीची कृपा लाभली की जीवन सुरळीत चालते. आपणा सर्वांवर महालक्ष्मी कृपा निरंतर राहो, यासाठी नवरात्रात या परब्रह्म रुपिणी, दुःख निवारिणी, त्रिपुरसुंदरी महालक्ष्मीचे स्तवन करुया.*
*परब्रह्म रूपिणी माते*
*महालक्ष्मी जय जय जय*
*सुखकारिणी भव दुु:ख निवारिणी*
*पाप विनाशिनी जय जय जय*
*ब्रह्मादिक तुज ध्याती*
*गुण संकिर्तन करिती*
*सुरवर अवघे संकट काळी*
*तुझ्याच नामे तरती*
*भक्तजनावर निज छाया धरी*
*हे भुवनेश्वरी जय जय जय*
*रत्नमण्यांची कांती*
*राजस वदनावरती*
*गरुडारूढ जगन्मातेची*
*भव्य शोभते मूर्ति*
*बैस येऊनी ह्रदय आसनी*
*हे जग जननी जय जय जय*
*प्रणव रूपिणी जय जय जय*
*त्रिपुरसुंदरी जय जय जय*
*मूलाधारनिवासिनी जय*
*महालक्ष्मी जय जय जय*
*गीत : पारंपारिक*
*संगीत : यशवंत देव*
*स्वर : उषा मंगेशकर*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*‼️या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता‼️*
*‼️नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः‼️*
*या विश्वात लक्ष्मी रूपात सर्वत्र वास करणाऱ्या देवी मातेला आमचा त्रिवार नमस्कार.*
# जागर - मराठेशाहीचा - जागर - स्रीशक्तीचा
💐आजच्या तिसर्या महादुर्गा महाराणी येसूबाई राणीसाहेब .
तिसरी माळ महाराणी येसूबाई राणीसाहेब यांच्या चरणी अर्पण 💐
महाराणी येसूबाई साहेब, ह्या छत्रपती शिवरायांच्या जेष्ठ सूनबाई तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या राजमाता होत्या.
कोकणातल्या शृंगारपूरच्या पिलाजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या जिऊबाई म्हणजेच महाराणी येसूबाईसाहेब .
सन.१६६५ च्या दरम्यान त्यांचा विवाह शिवपुत्र छत्रपती संंभाजी राजांशी संपन्न झाला. विवाहाच्या वेळी त्यांचे वय जेमतेम ६-७ वर्ष होते.
त्यामुळे त्यांची जडण-घडण छत्रपती संभाजी राजांसमवेत जिजाऊ माँसाहेब यांच्या देखरेखीखाली झाली. त्याचा एकंदरीतच परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला दिसून येेतो.
सन १६७४ ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे पाहिले छत्रपती बनले. छत्रपती संभाजीराजे युवराज व येसूबाई साहेब युवराज्ञी बनल्या.
. महाराणी येसूबाई रणरागिणी नसल्या तरी त्या धैर्यशील, कर्त्यव्यदक्ष, कणखर वृतीच्या होत्या. सन १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणा नंतर छत्रपती संंभाजीराजे छत्रपती पदावर आरूढ झाले आणि येसूबाई हिंदवी स्वराज्याच्या महाराणी बनल्या .
या काळात स्वराज्यावर चहुबाजुनी संकटे घोंगवू लागली, खासा शहेनशहा औरंगजेब पाच लाख सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला, आशा वेळी हाती समशेर घेऊन छत्रपती संभाजीराजे सतत ९ वर्षे पराक्रमाचे उग्र रूप घेऊन रणतांडव करीत झुंज देत होते .ज्या छत्रपती शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार माँसाहेब सांभाळत तसा छत्रपती संभाजी राजांच्या अनुपस्थितीत सर्व कारभार महाराणी येसूबाई राणीसाहेब सांभाळत असत.त्याकरता त्यांच्या नावाचा शिक्काही ’स्त्री सखी राज्ञी जयती’ "असा छत्रपती संभाजी महाराजांनी करवून दिला होता. छत्रपती संभाजीराजे यांच्या सारख्या निखार्याला पदरात बांधून त्यांच्यावर मायेचे पांघरून घालणार्या त्या पतिव्रता होत्या. पायाला तुफान बांधून अवघ्या महाराष्ट्र व दक्षिणेत गरुड भरारी मारणार्या छत्रपती संभाजी महाराजांच्या माघारी रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालवणार्या त्या कुशल राजनेत्या होत्या.शहेनशहा औरंगजेब पाच लाख सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला, आशा वेळी हाती समशेर घेऊन छत्रपती संभाजीराजे सतत ९ वर्षे पराक्रमाचे उग्र रूप घेऊन रणतांडव करीत झुंज देत होते .ज्या शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार माँसाहेब सांभाळत तसा छत्रपती संभाजी राजांच्या अनुपस्थितीत सर्व कारभार महाराणी येसूबाई राणीसाहेब सांभाळत असत.
गडावर येणारे वाद आणि तंटे येसूबाई राणीसाहेब स्वत: सदरेवर बसून कुशल रीतीने हाताळत. पुढे इ.स.१६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा कट कारस्थान करून औरंगजेबाने त्यांचा घात केला, आणि तुळापूर येथे त्यांना हाल हाल करून ठार केले. हिंदवी स्वराज्याचा दुसरा छत्रपती हरपल्या नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला आपले वैयक्तिक दुःख बाजुला सारून येसूबाई राणीसाहेबांनी मोठ्या निर्धाराने तोंड दिले व महत्वाचे निर्णय घेतले.
छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती संभाजी पुत्र शाहू हे स्वराज्याचे दोन्ही वारस एकत्र शत्रुच्या हाती सापडू नयेत म्हणून येसूबाई राणीसाहेबांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहुला आपल्या जवळ ठेवून छत्रपती राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास भाग पाडले. बाहेरून रायगडला मदत करा, प्रसंगी जिंजीकडे जा,असे त्यांनी सुचवले ,येसूबाईं राणीसाहेब यांनी अत्यंत संयमाने आणि दुरदर्शीपणे घेतलेल्या या निर्णयामुळे मराठ्यांचा इतिहास त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे .
पण शेवटी राजमाता येसूबाई साहेब व स्वराज्याचे तिसरे छत्रपती मोगलांच्या जाळ्यात सापडल्याने हिंदुराष्ट्र संकटात आले. आयुष्यातील उमेदीची २९ वर्षे त्यांनी मोगल कैदेत घालवली. त्यांत अनेक अडचणी आल्या. त्या त्यांनी मोठ्या धैर्याने सोडविल्या. औरंगजेबाने युवराजांचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न येसूबाईंनी राणीसाहेब यांनी सर्वशक्ती पणाला लावून हाणून पाडला .त्यांच्या आत्मबलिदानाला तोड़ नाही. सतत २९ वर्षे मोघलांच्या कैदेत राहून औरंगजेबाचे नीच इरादे उधळून लावत आपला मान,सन्मान,अभिमान आणि स्वाभिमान कायम त्यांनी जपला.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वराज्यात भांडणे लावण्याच्या हेतूने त्यांच्या वारसांनी युवराज शाहूची मुक्तता केली. शाहूंनी सातारा येथे राजधानी स्थापन करून छत्रपती पद धारण केले, परंतु मातोश्रींचा कारावास त्यांना बेचैन करत होता. त्या वेळचे स्वराज्याचे सेनापती खंडेराव दाभाडे आणि बाळाजी विश्वनाथ यांनी मोगल सरदार हुसेनअली आणि हसन अली या सय्यद बंधूंची मदत घेऊन मराठे सैन्य दिल्लीत दाखल झाले. औरंगजेबाचा नातू म्हणून एका तरुणाला पुढे करायला लावले, त्यामुळे दिल्लीचा बादशाह फरखंसिअर घाबरला, परंतु तो मागण्या मान्य करत नव्हता म्हणून त्याला तख्तावरून खाली काढले व राफीहुद्रातजत याला बादशहा बनवून मराठ्यांनी आपल्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या आणि राजमाता येसुबाई राणीसाहेब यांची सुटका करवून घेतली.
४ जुलै १७१९ ला राजमाता येसूबाई २९ वर्षें मोगलाच्या कैदेत राहून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या
व नंतर सातारा येथे त्यांचे निधन झाले .
🙏जेष्ठ महादुर्गा म्हणून तिसरा मान महाराणी येसूबाई राणीसाहेब यांच्या कडे जातो.🙏
लेखन डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
# जागर - मराठेशाहीचा - जागर - स्त्रीशक्तीचा
# राष्ट्रीय - क्षत्रीय - जनसंसद # महाराष्ट्र #घटस्थापना
# जागर - मराठेशाहीचा - जागर स्रीशक्तीचा
💐आजच्या दुसऱ्या महादुर्गा महाराणी सईबाई राणीसाहेब दुसरी माळ सईबाई राणीसाहेब यांच्या चरणी अर्पण 💐
"राव वणंगपाळ बारा वजीराचा काळ".अशी म्हण ज्यांच्या शौर्यामुळे पडली ,त्या शूर वणंगपाळ नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पोटी सईबाईं राणीसाहेबांचा जन्म झाला होता.
फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक घराणे होय.त्यांची सोयरीक कायमच भोसले घराण्याशी होत राहिल्याने ,राजकीय व सामाजिकदृष्ट्या हे घराणे फार महत्वाचे मानले गेले.
एका हिंदवी सम्राटाची पत्नी व एका छाव्याची आई म्हणून महाराष्ट्र वारंवार ज्यांची सई (आठवण) काढेल त्या म्हणजे सईबाई राणीसाहेब .
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेब म्हणजे राजांचे पहिले प्रेम. शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणी कडे व मार्गदर्शनाकडे जाते ,तेवढेच श्रेय सईबाईराणीसाहेब यांच्या त्यागाकडे जाते.
सईबाईराणीसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी,गृहिणी ,सचिव व प्रिया होत्या. सईबाईराणीसाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना एकोणीस वर्षे अत्यंत समर्थपणे साथ दिली. स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांचे लग्न सईबाई राणीसाहेब यांचे बरोबर झाले होते. लग्नात राजे १० वर्षाचे तर सईबाई राणीसाहेब ७ वर्षाच्या होत्या.
स्वराज्य उभे करण्यासाठी झुंजणाऱ्या, प्रखर राष्ट्रीय लढा देणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांना आपल्या पत्नीच्या पाठिंब्याशिवाय लढता येणे शक्य नव्हते. सईबाई राणीसाहेब या अत्यंत शांत, सोशिक व सामर्थ्यवान होत्या .त्यांचे बालपण फलटणमध्ये नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यात गेल्यामुळे व माहेरच्या संस्कारामुळे त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात व जिजाऊसाहेबांचे व राजांचे मन सांभाळण्यात समर्थ बनल्या होत्या. आपल्या माहेरच्या चांगल्या संस्कारामुळे त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राजकीय , सामाजिक व कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल दृष्टीने स्वराज्य विषयीच्या कर्तुत्वाने नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले होते. स्वराज्याविषयी कर्तव्य पार पाडण्याचे काम जिजाऊ माँसाहेबांच्या बरोबर सईबाईराणीसाहेबांनी तितक्याच समर्थपणे पार पाडले होते.
हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या सुखातच सईबाई राणीसाहेब आपले सुख मानत होत्या".जर छत्रपती शिवाजीमहाराज श्रीराम असतील तर सईबाईराणीसाहेब सीता असतील ,जर छत्रपती शिवाजीमहाराज विष्णूं असतील ,तर सईबाईराणीसाहेब लक्ष्मी असतील,जर छत्रपती शिवाजीमहाराज शंकर असतील तर सईबाई राणीसाहेब पार्वती असतील ,इतके घट्ट प्रेम होते दोघांचे.राणीसाहेबांच्या आठवणीसाठी शिवरायांना एखादे भव्यदिव्य स्वप्न कधीच पहावे लागत नव्हते. चैत्रातील पालवलेली चिंच जरी पाहिली किंवा भर उन्हाळ्यात आकाशातून कापुस पिंजत जाणारा मेघ जरी एकाकी पाहिला तरी शिवाजीराजांना सईबाई राणीसाहेबांची आठवण येत होती व आठवणीने राजांचा जीव व्याकुळ होत होता.
राजे मोहिमेवर असताना ज्या ज्या ठिकाणी ते सुंदर काही पाहायचे तिथे तिथे राजांना उत्कटतेने सईबाई राणीसाहेब यांची आठवण येत होती. राजांच्या या प्रेमामुळेच राणीसाहेबांचे जीवन अनेकविध रंगांनी शोभणाऱ्या इंद्रधनुष्यासारख्या किंवा नवरसयुक्त काव्यासारखे भासत होते.राजे जेव्हा जेव्हा मोहीम फत्ते करून परतत असत त्यावेळी एखाद्या सामान्य माणसासारखेच राजांनासुद्धा आपल्या घरची ओढ लागत होती .कारण सईबाईराणीसाहेबांना आपल्या विजयाची गाथा ऐकवून त्यांना चकित करण्यासाठी राजे उत्सुक असत. गेल्या सतरा - अठरा वर्षाचा राजांचा हा अनुभव होता .स्वभावाने गोड आणि लाखात एक या राणीसाहेब होत्या. प्रथमदर्शनीच राजांना त्या खूप आवडल्या होत्या त्याचे कारण म्हणजे राणीसाहेबांचा मधुर ,प्रेमळ स्वभाव.राजांनाच काय सार्या राणीवशालाच त्यांची भुरळ पडली होती. राजे तर आपले सर्वस्वच हरवून बसले होते .
सईराणीसाहेब म्हणजे राजांचे पहिले प्रेम, राजांची पहिली सखी, किंबहुना सुख-दुखःच्या हिंदोळ्यात साथ देणारी जन्मोजन्मांची अर्धांगीणी स्वराज्य निर्मितीपासून पुढच्या काही वर्षांपर्यंतच्या प्रवासात आपल्या पतीच्या सुखातच सुख मानीत सईबाईसाहेबांनी राजांना समर्थपणे साथ दिली शिवछत्रपतींच्या सुरवातीच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये एक आई म्हणून ज्याप्रमाणे जिजाऊंसारख्या खंबीर मार्गदर्शक त्यांना लाभल्या त्याचप्रमाणे एक पत्नी म्हणून सईराणींसारख्या एका शांत संयमी व्यक्तीमत्वाची सोबतदेखील त्यांच्या पाठीशी नेहमीच होती.. सईबाईराणीसाहेब व राजांची साथसोबत अवघ्या १८-१९ वर्षांची.. परंतु हा कालखंड म्हणजे राजांच्या आयुष्यातील उमेदीचा व स्वराज्य निर्मितीच्या ध्येयाचा महत्वपूर्ण असा कालखंड चढ-उतारांच्या या कित्येक प्रसंगात राजांनी आपल्या मनातील हलक्या व नाजूक गोष्टींचा उलगडा अनेकदा राणीसाहेबांसमोरच केला असेल...
शिलेदारीचे व्रत पत्करलेले राजे स्वराज्य संस्थापक म्हणून मानाने मिरवत होते .दौलतीच्या विस्तारासाठी मुलूखगिरी करून ,मोहिमा राबवत होते. मोहिमा जिंकून ,यश मिळवत असताना सारे बंध ,सारे पाश तोडून टाकल्यासारखे राजे फक्त आणि फक्त स्वराज्यासाठीच झटत होते, तळहातावर प्राण घेऊन काफर यवनावर तुटून पडत होते .राजकारणातील चढ-उतार गुंते सोडवताना कधीकधी स्वतःलाही विसरत होते .स्वराज्यासाठी आपल्या मुलखापासून दूर दूर जात होते; पण तरीसुद्धा सईबाईराणीसाहेबांना ते कधीच विसरू शकत नव्हते .
कारण या राणीसाहेब म्हणजे राजांची स्फूर्ती होत्या ,स्वामिनी होत्या , देवता होत्या. सईबाईसाहेबांचे प्रेमळ वागणे, लोभस सुंदर रूप यांच्या आठवणीने राजे नव्या त्वेषाने, नव्या जोमाने दुष्मनावर तुटून पडत होते. राजांना वाटे की, सईबाईं यांच्या लक्ष्मीच्या पावलां मुळेच तर आम्हाला कायम यश मिळत आले आहे .यशश्री आमच्या गळ्यात कायमच हार घालत आहे.भविष्यात हिंदवी स्वराज्याला भरभक्कम आधार देण्यासाठी माझी खंबीर साथ म्हणजे सईबाईसाहेबच होत्या. म्हणूनच राजांचे आणि दौलतीचे ,स्वराज्याचे सारे लक्ष या राणीसाहेबांकडेच होते.
सईबाईराणीसाहेब जास्त काळ जगल्या असत्या तर कदाचित संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहासच बदलला असता .राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षाचे शंभुराजे आईविना पोरके झाले.छत्रपतींच्या
संसाराची कथा जीवाला चटका लावणारी ठरली. राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षाचे शंभूराजे पोरके झाले .वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी सईबाई राणीसाहेब हे जग सोडून निघून गेल्या.पण जातांना त्यांनी या हिंदवी स्वराज्याला एक छावा अर्पण केला.या छाव्याने पुढे रूद्रावतार धारण करून ओरंगजेबाला नाकी नऊ आणले.
छत्रपती शिवाजीराजांवर व स्वराज्यावर सईबाई राणीसाहेब यांची असणारी निष्ठा, प्रेम , शांत व साधेपणाचा गुण यामुळेच त्या इतिहासातील अजरामर राजस्री ठरल्या .आज साडेतीनशे - चारशे वर्षांनंतरही निश्चितपणे असे म्हणता येईल की ,काळाने समोर ठेवलेले आव्हान छत्रपती शिवाजीराजांनी झेलले , इतकेच नव्हे तर सक्षम आणि समर्थपणे पार पाडले. या त्यांच्या सुरुवातीच्या कठीण काळात सईबाई राणीसाहेबांनी नक्कीच मोलाची साथ दिली .
सईबाई राणीसाहेब म्हणजे "एक पावन पणती जिने छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात असंख्य सुखाचे दिप उजळले.....
एक हवेची सुखद झुळूक जिच्या पोटी छत्रपती शंभूराजे नावाचे तुफान जन्मले........
🙏 जेष्ठ महादुर्गा म्हणून माँसाहेब जिजाऊ यांच्यानंतर दुसरा मान महाराणी सईबाई राणीसाहेबांकडे जातो.🙏
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर #घटस्थापना
#जागर -स्री -शक्तीचा
💐आजच्या पहिल्या महादुर्गा राजमाता जिजाऊसाहेब .आजची पहिली माळ माँसाहेबांच्या चरणी अर्पण 💐
छत्रपती शिवाजीराजांना प्रत्येक वेळी यशच का मिळत गेले ? असा प्रश्न पुष्कळवेळा आपणापुढे उभा राहतो, याचे कारण एकच आहे आणि ते म्हणजे उत्तम असे नेतृत्व. खुद्द छत्रपती शिवाजीराजांच्या अंगी धडाडी, सारासार विचार, शौर्य आणि अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे लोकांच्या गुणांची पारख करणे हा होता. छत्रपती शिवाजीराजांनी केवळ या गुणावरच घोडखिंड पावन करणारे शंभूसिंह जाधवराव ,बाजी व फुलाजी बांदल यासारखे शूर योद्धे मिळवले होते. पुरंदरला शीर तुटून खाली पडलेले असतानाही शत्रूची मुंडकी उडविणारे मुरारबाजी लाभले होते. त्याचप्रमाणे अफजलखान भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजीराजांचे संकट ते आपले संकट म्हणून तेथे जवळच उभे राहणारे जिवाजी ही काही कमी नव्हते.
'आधी लगीन कोंढाण्याचे ' सांगणार्या आणि लगेच स्वराज्यात कोंढाणा किल्ला सामील करून आत्मबलिदान करणारे तानाजी मालुसरे हे देखील कोठेही उणे नव्हते हे त्यांनीच दाखवून दिले होते.
चारी पादशाहींनी हाय खाऊन कित्येक वेळा ज्याच्या हातून माती खाल्ली व प्रतिशिवाजी म्हणवून घेतले ते नेताजी पालकर म्हणजे तर साक्षात विजांचा कडकडाट होते. याशिवाय प्रतापराव गुजर,अण्णाजी दत्तो, रघुनाथराव ,मोरोपंत पिंगळे असी अनेक माणसे छत्रपती शिवाजीराजांनी वेचून काढली होती. फक्त निवडली असे नव्हे तर त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांच्यावर कामगिरी छत्रपती शिवाजीराजांनी सोपवली होती.
शतकांच्या मर्यादांना खिंडार पाडून स्वकर्तृत्वाने जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना घडविले. महाराष्ट्राला मुस्लीम जोखडातून स्वतंत्र करावयाचे विचार त्यांच्यात जागृत केले. जागतिक पातळीवर शौर्याची तुलना व्हावी असा ध्यास या माऊलीने जोपासला व अतुलनीय धैर्याचा परिचय देऊन कार्य सिद्धीला पोहोचविले. अफजलखान नावाचे भयंकर संकट आले तरी जिजाऊमातेने मोलाची सल्लामसलत करून आशीर्वाद दिला .' यश देईल भवानी, तुम्ही कामगिरीला सिध्द व्हा.'
'वाघाएवढे काळीज लागते ,पोटच्या गोळ्याला मृत्यूसमोर उभे करणे ही सोपी गोष्ट नव्हती. राजमाता
जिजाऊंना ध्यास लागला होता तो स्वराज्य स्थापनेचा.
इ.स.१६६६ ला घात करणारे संकट ओढवले.औरंगजेब बादशहाला आग्र्याला जाऊन भेटायचे होते. पण याहीवेळी मातेने पुत्राला हिंम्मत दिली. युक्तीचा सल्ला दिला व आशीर्वादही दिला. ही कामगिरीही पार पडेल, आई भवानी राहील तुझ्या पाठीशी.
मार्च ते सप्टेंबर असा सहा महिने आई जिजामातेने चोखपणे राज्याचा कारभार पाहिला .शत्रूच्या हाती एकही किल्ला दिला नाही ; उलट शत्रूच्या ताब्यातील ' रांगणा किल्ला ' स्वराज्यात सामील करायचे राजकारण केले. स्वतंत्र विचारसरणी व कर्तृत्वाची जाण राजमाता जिजाऊ मातेमध्ये सक्षम होती. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडू शकले. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याच्या कारभारामध्ये अधिकाधिक लक्ष घातले.छ. शिवाजी महाराजांच्या बद्दल राजमाता जिजाऊंना अत्यंत प्रेम आणि जिव्हाळा वाटत असला तरी त्या कधी पुत्रप्रेमाने आंधळ्या होऊन राजांना कधी कोणत्या सवलती देत नसत. उलट त्यांची करडी नजर सर्वांच्यावर होती.
गुणांची पारख कशी करावी, लोकसंग्रह कसा करावा, केलेला लोकसंग्रह कसा टिकवावा हे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना शिकवले होते.छत्रपती शिवाजीराजांनी मुसलमानांचा ही विश्वास संपादन केला होता. राजांच्या सैन्यात कितीतरी पठाण मुसलमान होते. त्यांना नोकरीवर ठेवून योग्य मोबदला दिला होता.
छत्रपती शिवाजीराजे म्हटले की , मोगली आणि आदिलशाही दोन्ही तख्ते रागाने दात-ओठ खात .प्रत्येक जण आपापल्या परीने शिवाजीराजांना पकडून देऊ पाहत होते. पण ते त्यांना जमले नाही . मरणासारखी संकटे समोर उभी होती, तरीदेखील तू शरण जा आणि आपली सुटका करून घे असे राजमाता जिजाऊ त्यांना कधीच सांगत नसत.
राजमाता जिजाऊंनी आपले स्वतःचेच मन इतके घट्ट केले होते की कोणत्याही संकटप्रसंगी मोठ्या धीराने त्या मार्गदर्शन करीत.माँसाहेबांमुळेच छत्रपती शिवाजीराजे हे पन्हाळ्यावर स्वराज्याच्या दृष्टीने निर्धास्त होते. कारण राजगडावरून स्वतः माँ जिजाऊ जातीने सर्व पाहत होत्या. कोंढाणा किल्ला घ्यायला लावणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब अत्यंत विचारी व दुरदर्शी होत्या. राजमाता जिजाऊंचे व्यवहारचातुर्य एवढे आघात होते की केवळ त्यांच्याच प्रेरणेने , शिकवणीमुळे शहाजी राजांच्या गैरहजेरीत देखील प्रत्येक गोष्टी त्यांनी छत्रपती शिवाजी राजांकरवी करून घेतल्या ,यातच त्यांची मुत्सद्देगिरी पारखण्यासारखी होती.
वास्तविक छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनात शहाजीराजांचा संपर्क किंवा सानिध्य खूपच कमी होते ; परंतु आऊसाहेबांनी आईची जागा भरून काढलीच परंतु त्याशिवाय वडिलांची भूमिका सुद्धा कित्येक वेळा त्यांना करावी लागली. कारण शहाजीराजांच्या आयुष्यातील बहुतेक वेळ स्वारीवर व दगदगीत दक्षिणेकडे गेल्यामुळे प्रत्यक्ष शिवाजीराजांकडे लक्ष देणे त्यांना कधी जमलेच नाही.
शहाजीराजे जरी फार काळ छत्रपती शिवाजीराजांजवळ नव्हते तरी आपल्या पित्या बद्दल त्यांना खूपच आदर होता.कारण जिजाऊंनी आपल्या वडिलांबद्दल कसे वागावे याचे खुप चांगले संस्कार केले होते.
महाभारतामध्ये पांडवांना निरनिराळ्या संकटकाळी भगवान श्रीकृष्णाने मार्गदर्शन केले, तर शिवशाहीमध्ये तसेच मार्गदर्शन जिजाऊंनी केले .
स्वराज्यस्थापनेच्या काळी जिजाऊंनी सर्वतोपरी कंबर कसली होती. त्यामुळेच शहाजीराजांच्या मृत्युने सती जाण्यास जेंव्हा जिजाऊ निघाल्या तेव्हा शिवाजीराजे पूर्णपणे हादरून गेले होते. कारण त्यांना माहीत होते की जिजाऊ या स्वराज्याची देवता आहेत.छत्रपती शिवाजीराजांचे जिजाऊंशी वागणे हे अत्यंत आदरणीय व विनम्रतेचे होते. शिवाजीराजे आईसाहेबांच्या इच्छेविरुद्ध काहीही करत नसत. उलट राजे कोणतेही काम करताना आईना विचारून ,त्यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा करूनच निर्णय घेत. कारण छत्रपती शिवाजीराजांच्या पहिल्या सल्लागार म्हणजे जिजाऊसाहेब होत्या.
छत्रपती शिवाजी राजांच्या गैरहजेरीत जिजाऊ जातीने राज्याचा डोलारा सांभाळीत.शिवाजीराजे स्वारीवर गेले की जनतेचा न्याय निवाडा
जिजाऊच करत असत.
लांबून लांबून लोक जिजाऊंना पाहण्यास, भेटण्यास ,नमस्कार करण्यास येत असत .प्रत्येकाची योग्य ती विचारपूस करून, प्रत्येकाच्या तक्रारीकडे त्या लक्ष देत.
क्षात्रतेजाला अपरिहार्य असणारे युद्धकौशल्य त्यांनी शिवबांना शिकवले होते. लढाईचे प्रकार माहीत करून दिले होते. शत्रूशी दोन हात कधी करावेत व प्रसंग बिकट असेल तर गनिमी कावा वापरून शत्रूला नामोहरम कसे करावे याचे शिक्षण त्यांनी शिवरायांना दिले होते.शक्तीची, बळाची लढाई केव्हा व बुद्धिचातुर्याची लढाई केव्हा करावी, याचे शिक्षणही जिजाऊ यांनी शिवबाला दिले होते. क्षात्रतेजाने इतिहास निर्माण केलेल्या सातवाहन ,राष्ट्रकूट ,चालुक्य, वाकाटक व यादव घराण्यातील श्रेष्ठ आदर्श पुरुषांच्या पराक्रमाच्या व कर्तृत्वाच्या गोष्टी त्यांनी नेहमीच शिवबाला सांगितल्या .या थोर युगपुरुषांप्रमाणेच शिवाजीराजांनी आलौकिक कर्तुत्व करावे ,असे जिजाऊंना मनोमन वाटत होते. शिवाजीराजांना विरक्ती, वैराग्य व त्याग इत्यादींची शिकवण दिली. लोकांच्या सामर्थ्यावर मिळवलेले राज्य लोकांच्या कल्याणासाठीच चालविले पाहिजे,अशी जिजाऊंची धारणा होती. लोकांचे दुःख ओळखून प्रजा व राजा यांच्यात भावनिक ,वैचारिक, प्रेमाचे नाते असेल तर जीव्हाळा टिकून राज्यात सुव्यवस्था नांदते, असे जिजाऊंचे ठाम मत होते. रयतेचे रोजचे प्रश्न, समस्या त्यांच्या कुटुंबाची अवस्था, मुलाबाळांचे प्रश्न यावर राजाचे लक्ष असायला हवे ,असा जिजाऊंचा दंडक होता. शिवाजीराजांच्या लहान वयातच त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकण्यास जिजाऊनी सुरुवात केली होती .त्यांना आपल्या मांडीवर बसवूनच राजकारण ,लोकसंघटन, संरक्षण, प्रशासन ,नीतिमूल्ये आदींचे डोळस ज्ञान दिले. यातूनच खर्या अर्थाने शिवाजीराजांची जडणघडण झाली होती .
जिजाऊ म्हणत, " शिवबा ! तुमचे आजोबा मालोजीराजे ,लखुजीराजे अत्यंत पराक्रमी होते .वडील शहाजीराजे तर आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीवरती दरारा असणारे पराक्रमी सिंहच ! अशा सिंहाचा तुम्ही पुत्र आहात. शिवबा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे. दैववाद, कर्मकांड ,अनिष्ट रूढी परंपरा यांच्यामुळेच आदिलशाही, निजामशाही ,मुघलशाहीचे फावले आहे .सैन्यबळ ,दुर्गबळ, द्रव्यबळाचा मुकुटमणी म्हणजे शहाजीमहाराज ! भोसले - जाधव घराण्याचा पराक्रमाचा वारसा तुम्हाला लाभलेला आहे .तुम्हाला रयतेचे स्वराज्य निर्माण करायचे आहे.शिवबा,मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे ऊभी आहे, अशी प्रेरणा जिजाऊंनी शिवरायांना दिली.
इतिहास बदलणे जिजाऊंच्या हाती नव्हते ; परंतु नवा इतिहास घडविणे जिजाऊंना शक्य वाटले. स्वराज्य स्थापनेचे कार्य एकटे शिवबा करू शकणार नाहीत .त्यासाठी त्यांनी शिवबासोबत त्यांच्या इतर सहकारी मावळ्यांना ही घडविले .
जातीधर्माच्या पलीकडे जाऊन रयतेच्या स्वातंत्र्याचा ,सुख - समृद्धीचा आणि भविष्याचा विचार राजमाता जिजाऊंच्या स्वराज्य कल्पनेत होता. राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजीराजांची माताच नव्हत्या तर सर्वांची त्या प्रेरक शक्ती होत्या. जिजाऊंनी भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व दिल्याने छत्रपती शिवरायांची मजबूत जडणघडण झाली होत गेली.
🙏त्यामुळे जेष्ठ महादुर्गा म्हणून पहिला मान जिजाऊ माँसाहेबांकडे जातो🚩
लेखन ✒️
डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर #जागर_मराठेशाहीचा_जागर_स्त्रीशक्तीचा
#नवरात्री_विशेष
🙏🙏 #घटस्थापना